Sanjay Raut : प्रदीप पूर्णेकर प्रकरण गृहमंत्री आणि पालकमंत्र्यांना महागात पडणार; संजय राऊत असं का म्हणाले?
प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरणी संजय राऊत यांनी गृहमंत्री आणि ठाण्याच्या पालकमंत्र्यांना गंभीर इशारा दिला आहे. राजेंद्र शिंदे आणि मीनाक्षी शिंदे हेच मुख्य सूत्रधार असल्याचा दावा राऊत यांनी केला. या प्रकरणात पोलीस आरोपींना वाचवत असल्याचा आणि पूर्णेकर कुटुंबीयांवर अन्याय होत असल्याचा आरोप करत, हे प्रकरण सरकारला महागात पडेल असा इशारा राऊत यांनी दिला आहे.
प्रदीप पूर्णेकर यांच्या हत्या प्रकरणात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते संजय राऊत यांनी गृहमंत्री आणि ठाण्याच्या पालकमंत्र्यांवर गंभीर आरोप केले आहेत. राऊत यांच्या म्हणण्यानुसार, हे प्रकरण त्यांना भविष्यात महागात पडणार आहे. राजेंद्र शिंदे आणि मीनाक्षी शिंदे हेच या हत्येचे मुख्य सूत्रधार असल्याचा दावा राऊत यांनी केला आहे. मीनाक्षी शिंदेने आपल्या पती राजेंद्र शिंदेला सुपारी दिली आणि नंतर राजेंद्र शिंदेने इतरांना सुपारी देऊन ही हत्या घडवून आणली, असे राऊत यांनी म्हटले आहे.
ठाणे पोलीस आणि राज्याचे पालकमंत्री यांना या घटनेची पूर्ण माहिती असूनही आरोपींना वाचवण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा आरोप राऊत यांनी केला. काल विरोध करण्याचा प्रयत्न करणाऱ्यांना लाज वाटली पाहिजे, असेही ते म्हणाले. निष्पाप राजकीय कार्यकर्त्याची हत्या दडपण्याचा प्रयत्न सुरू आहे. बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना इतकी अमानुष नव्हती, मात्र डुप्लिकेट लोकांना पीडितांचे दुःख कळणार नाही, असे राऊत यांनी नमूद केले. पूर्णेकर यांचा मुलगा पालकमंत्र्यांना निवेदन देण्यासाठी जात असताना पोलिसांनी त्याला रिक्षात कोंबले, या घटनेचाही राऊत यांनी तीव्र शब्दात निषेध केला. या प्रकरणी गृहमंत्री आणि पालकमंत्र्यांना गंभीर परिणाम भोगावे लागतील, असा इशारा राऊत यांनी दिला आहे.
