पवार आजोबा आणि नातू एकाचवेळी राज्यसभेवर?
महाविकास आघाडीकडून शरद पवार यांच्या राज्यसभेवरील उमेदवारीवर एकमत झाल्याचे वृत्त आहे. सर्वाधिक आमदार असूनही ठाकरेंच्या शिवसेनेने ही जागा पवारांना देण्याची तयारी दर्शवली आहे. दुसरीकडे, अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडून पार्थ पवारांच्या नावावर शिक्कामोर्तब झाल्याची चर्चा आहे. यामुळे पवार आजोबा-नातू एकाचवेळी राज्यसभेत जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
राज्यसभा निवडणुकीच्या अनुषंगाने महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या मोठी चर्चा सुरू आहे. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, महाविकास आघाडीने शरद पवार यांच्या नावावर राज्यसभेसाठी एकमत केले आहे. महाविकास आघाडीकडे एकूण 46 आमदारांचे संख्याबळ असून, एका जागेसाठी 36 आमदारांची आवश्यकता आहे. त्यामुळे मविआकडून एक उमेदवार सहज निवडून येऊ शकतो.
यामध्ये ठाकरेंच्या शिवसेनेकडे सर्वाधिक 20 आमदार आहेत. काँग्रेसचे 16 आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे 10 आमदार आहेत. आदित्य ठाकरे यांनी सुरुवातीला अधिक संख्याबळामुळे शिवसेनेने ही जागा लढवावी अशी भूमिका घेतली होती. मात्र, शरद पवारांसाठी ही जागा सोडण्याची तयारी महाविकास आघाडीमध्ये झाल्याचे समजते. सर्वात कमी आमदार असतानाही शरद पवारांच्या राष्ट्रवादीला ही संधी मिळत असल्याचे दिसत आहे.
दुसरीकडे, अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेसने पार्थ पवारांच्या नावावर राज्यसभेसाठी शिक्कामोर्तब केल्याचे कळते. त्यामुळे जर शरद पवार आणि पार्थ पवार दोघांनाही उमेदवारी मिळाल्यास, पवार कुटुंबातील आजोबा आणि नातू एकाच वेळी राज्यसभेत खासदार म्हणून दिसू शकतात. मात्र, अद्याप महाविकास आघाडीची अधिकृत बैठक झालेली नाही आणि काँग्रेसही आपला दावा सोडण्यास तयार नसल्याचे चित्र आहे.
