CJP Protest : सीजेपीचं उद्या दिल्लीत आंदोलन, रेल्वे, मेट्रो बंदच्या निर्णयाविरोधात कोर्टात सुनावणी; कोर्टाने केंद्राला काय सांगितलं?
दिल्लीतील सीजेपी आंदोलनामुळे मेट्रो आणि रेल्वे सेवा पूर्णपणे बंद करण्याच्या सरकारच्या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिली आहे. सर्वसामान्यांची गैरसोय टाळण्यासाठी सार्वजनिक वाहतूक सुरू ठेवण्याचे निर्देश कोर्टाने दिले आहेत. आंदोलनासंदर्भात योग्य निर्बंध लादले जाऊ शकतात, परंतु सेवा पूर्णपणे बंद करणे अयोग्य असल्याचे न्यायालयाने म्हटले आहे.
दिल्लीत उद्या होणाऱ्या सीजेपी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर रेल्वे आणि मेट्रो सेवा पूर्णपणे बंद करण्याच्या सरकारच्या निर्णयावर सर्वोच्च न्यायालयाने हस्तक्षेप केला आहे. केंद्र सरकारला दिल्लीकडे जाणाऱ्या रेल्वे सेवा आणि शहरातील मेट्रो स्टेशन पूर्णपणे स्थगित न करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
आज रात्री नऊ वाजल्यापासून ५७ मेट्रो स्टेशन्स बंद करण्याचा निर्णय सरकारने घेतला होता, तसेच दिल्लीकडे जाणाऱ्या मेल एक्सप्रेस रद्द करण्यात आल्या होत्या. या निर्णयाविरोधात सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली होती. याचिकेवर सुनावणी करताना न्यायालयाने म्हटले की, सार्वजनिक वाहतूक बंद केल्यामुळे लोकांना मोठ्या गैरसोयीचा सामना करावा लागू शकतो. त्यामुळे मेट्रो आणि रेल्वे सेवा सुरू राहायला हवी.
आंदोलनासंदर्भात योग्य निर्बंध लादले जाऊ शकतात, असेही कोर्टाने स्पष्ट केले. कोणते रस्ते बंद केले आहेत, याची माहिती वृत्तपत्रातून प्रसिद्ध करण्याचे निर्देशही न्यायालयाने सरकारला दिले आहेत. सर्वसामान्यांची गैरसोय टाळण्यासाठी वाहतूक सेवा सुरू ठेवणे आवश्यक आहे, असे मत सर्वोच्च न्यायालयाने व्यक्त केले.
