Supriya Sule | शरद पवारांकडे कोणताही प्रस्ताव नाही; NCP-काँग्रेस विलिनीकरणावर सुप्रिया सुळेंचा मोठा खुलासा काय?
राज्यात राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट आणि काँग्रेसच्या संभाव्य विलिनीकरणाच्या चर्चांना उधाण आले असताना खासदार सुप्रिया सुळे यांनी यावर महत्त्वपूर्ण भूमिका स्पष्ट केली आहे. विलिनीकरणाबाबत कोणताही प्रस्ताव आलेला नसल्याचे सांगत त्यांनी सुरू असलेल्या चर्चांना पूर्णविराम देण्याचा प्रयत्न केला.

माध्यमांशी संवाद साधताना सुप्रिया सुळे म्हणाल्या की, राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलिनीकरणाबाबत त्यांच्याशी किंवा पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्याशी कोणत्याही पक्षाने संपर्क साधलेला नाही. “शरद पवार यांच्याकडे कोणताही प्रस्ताव आलेला नाही आणि त्यांनीही कोणालाही असा प्रस्ताव दिलेला नाही,” असे त्यांनी स्पष्ट केले.
देशातील सध्याच्या परिस्थितीवर भाष्य करताना सुळे म्हणाल्या की, महागाई, बेरोजगारी आणि भ्रष्टाचार यांसारख्या गंभीर प्रश्नांमुळे देशासमोर मोठी आव्हाने उभी आहेत. अशा परिस्थितीत राजकीय आरोप-प्रत्यारोपांपेक्षा नागरिकांचे प्रश्न सोडवणे अधिक महत्त्वाचे असल्याचे त्यांनी सांगितले.
दरम्यान, आमदार रोहित पवार यांच्या पंढरपूरमधील अन्नत्याग आंदोलनाबाबतही त्यांनी प्रतिक्रिया दिली. सुरुवातीपासूनच आपण रोहित पवार यांना उपोषण न करण्याचा सल्ला दिला होता, असे सांगत त्यांनी त्यांच्या शेतकरीप्रेमाचे कौतुक केले. “शेतकऱ्यांच्या न्यायासाठी रोहित पवार मोठा लढा उभारत आहेत, याचा मला अभिमान आहे,” असे त्या म्हणाल्या.
तसेच, 24 तासांहून अधिक काळ अन्न न घेताही रोहित पवार शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी संघर्ष करत असल्याचे सांगत त्यांनी त्यांच्या आंदोलनाला पाठिंबा दर्शवला. या सर्व घडामोडींमुळे राज्यातील राजकारणात विलिनीकरणाच्या चर्चांसह शेतकरी प्रश्नही पुन्हा एकदा चर्चेच्या केंद्रस्थानी आले आहेत.