सत्तासंघर्षाचा केंद्रबिंदू असलेले राज्यपाल भगत सिंग कोश्यारी यांची कारकीर्द

राज्यपाल भगतसिंग कोश्यारी हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघात कार्यरत असून भाजपच्या वरिष्ठ फळीतील नेते आहेत.

सत्तासंघर्षाचा केंद्रबिंदू असलेले राज्यपाल भगत सिंग कोश्यारी यांची कारकीर्द

मुंबई : महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवटीच्या दिशेने हालचाली सुरु आहेत. राज्यपालांनी राष्ट्रपती राजवट लागू करण्याची शिफारस केलेली आहे. या सर्व घडामोडींमध्ये महत्त्वाची भूमिका बजावतात ते राज्यपाल. महाराष्ट्राचे राज्यपाल भगत सिंग कोश्यारी (Maharashtra Governor Bhagat Singh Koshyari) यांच्या कारकिर्दीविषयी बरेच जण अनभिज्ञ आहेत.

1 सप्टेंबर 2019 पासून भगत सिंग कोश्यारी यांनी महाराष्ट्राच्या राज्यपालपदाची धुरा खांद्यावर घेतली. सी. विद्यासागर राव यांचा कार्यकाळ संपल्यानंतर भगत सिंग कोश्यारी यांची नियुक्ती करण्यात आली.

कोण आहेत भगत सिंग कोश्यारी?

भगत सिंग कोश्यारी यांचा जन्म 17 जून 1942 रोजी झाला. कोश्यारी हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघात कार्यरत असून भाजपच्या वरिष्ठ फळीतील नेते आहेत. आणीबाणीच्या काळात 1977 मध्ये त्यांनी तुरुंगवारीही भोगली आहे.

उत्तराखंड राज्याच्या निर्मितीनंतर भगत सिंग कोश्यारी यांच्याकडे भाजपच्या प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी सोपवण्यात आली होती. 2001-2002 या काळात ते उत्तराखंडचे मुख्यमंत्री होते. 2002 ते 2007 या काळात उत्तराखंड विधानसभेच्या विरोधीपक्ष नेतेपदी त्यांची वर्णी लागली होती. 2008 ते 2014 या काळात ते राज्यसभेचे खासदार होते.

77 वर्षीय भगत सिंग कोश्यारी (Maharashtra Governor Bhagat Singh Koshyari) यांनी इंग्रजी साहित्य विषयात पदवी संपादन केली आहे. व्यवसायाने ते शिक्षक आणि पत्रकारही होते.

राज्यपालांकडे कोणती जबाबदारी?

भारतीय राज्यपाल हे एक संवैधानिक पद असून त्याला संवैधानिक महत्त्व आहे. राज्याचा संकटकालीन निधी हा राज्यापालांच्या हाती असतो. राज्यपालाची नियुक्ती राष्ट्रपतींद्वारे होते. राष्ट्रपतींचा प्रतिनिधी म्हणून संबंधित घटकराज्याचं काम राज्यपाल पाहतो.

राज्यपालाच्या नेमणुकीसाठी पुढील पात्रता आवश्यक

1. ती व्यक्ती भारतीय नागरिक असावी
2. त्या व्यक्तीने वयाची 35 वर्षे पूर्ण केलेली असावीत

राज्यपालांचा कार्यकाळ

सर्वसाधारणपणे राज्यपालांचा कार्यकाळ 5 वर्षांचा असतो. मुदतीपूर्वी तो राजीनामा देऊ शकतो. पाच वर्षांची मुदत संपल्यावर त्याची त्याच पदावर पुन्हा नियुक्ती राष्ट्रपती करु शकतात.

राज्यपालांकडून सत्तास्थापनेची विचारणा, भाजप कोअर कमिटीच्या बैठकीत निर्णय घेणार

मुख्यमंत्री आपल्या पदाचा राजीनामा राज्यपालांकडे सुपूर्द करतात. विधानसभेचा कालावधी संपण्यापूर्वी देवेंद्र फडणवीस यांनीही मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा शुक्रवारी राज्यपालांकडे सोपवला होता. त्यानंतर राज्यपालांनी फडणवीसांना काळजीवाहू मुख्यमंत्री म्हणून काम पाहण्याची विनंती केली.

राष्ट्रपती राजवट लागू करण्याचा अधिकार

देशातील कोणत्याही राज्यात शासकीय कारभार संविधानानुसार चालणे शक्य नसल्याचा अहवाल संबंधित राज्याच्या राज्यपालांनी राष्ट्रपतींना दिला किंवा तसा अहवाल नसतानाही राष्ट्रपतींची स्वत:ची तशी खात्री पटली, तर राष्ट्रपती त्या राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करु शकतात.

  • राष्ट्रपती राजवटीत न्यायालयीन वगळता राज्याची सर्व सत्ता राष्ट्रपतींच्या हाती असते.
  • राष्ट्रपतींचे प्रतिनिधी म्हणून बहुतांश वेळा राज्यपालच राज्याचे शासन चालवतात.
  • राज्यपाल राज्याच्या मुख्य सचिवांच्या सहाय्याने शासन चालवतात.

(Maharashtra Governor Bhagat Singh Koshyari)

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *