नितेश राणे कणकवलीचे भाजप उमेदवार, नारायण राणेंची घोषणा

राज्यसभेचे खासदार नारायण राणे यांनी आपला महाराष्ट्र स्वाभिमान पक्ष भाजपमध्ये विलीन करण्याआधीच पुत्र आणि काँग्रेस आमदार नितेश राणे यांना भाजपच्या तिकीटावर कणकवली विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी जाहीर करुन टाकली आहे

नितेश राणे कणकवलीचे भाजप उमेदवार, नारायण राणेंची घोषणा

सिंधुदुर्ग : काँग्रेसच्या तिकीटावर आमदारपदी निवडून आलेले नितेश राणे हे कणकवली विधानसभा मतदारसंघातून भाजपचे उमेदवार (Nitesh Rane BJP Candidate) असतील, अशी घोषणा खासदार नारायण राणे यांनी केली आहे. विधानसभा निवडणुकीत शिवसेना-भाजप युती आणि जागावाटपाचा तिढा अद्याप सुटलेला नसतानाच राणेंनी आपल्या मुलाला भाजपकडून उमेदवारी (Nitesh Rane BJP Candidate) जाहीर करुन टाकली आहे.

नारायण राणे आपला महाराष्ट्र स्वाभिमान पक्ष भाजपात विलीन करणार आहेत. भाजपमध्ये लवकरच प्रवेश करणार असल्याचं सांगतानाच नारायण राणे यांनी नितेश राणेंना उमेदवारी जाहीर केली. पक्ष विलीन करण्याचा निर्णय नारायण राणे यांचा असून आम्ही कार्यकर्ते म्हणून त्यांच्या आदेशाचं पालन करणार आहोत, अशी प्रतिक्रिया नितेश राणे यांनी सिंधुदुर्गात ‘टीव्ही9 मराठी’शी बोलताना दिली.

नारायण राणे यांचं भाजपच्या ज्येष्ठ नेत्यांशी बोलणं झालं असेल. त्यामुळेच त्यांनी याबाबतचा निर्णय जाहीर केला असेल. आपल्याला वरिष्ठ पातळीवरील चर्चेबाबत काही कल्पना नाही, असं उत्तर नितेश राणेंनी दिलं.

नितेश राणेंना कणकवली मतदारसंघातून उमेदवारी जाहीर (Nitesh Rane BJP Candidate) झाल्यामुळे भाजपमधील इच्छुक उमेदवारांचा हिरमोड झाल्याची शक्यता आहे.

शिवसेनेच्या विरोधाचा संबंध नाही, येत्या काही दिवसात मुंबईत भाजपमध्ये प्रवेश करेन : नारायण राणे

‘विद्यमान आमदाराला तिकीट दिल्यास तो पुन्हा जिंकून येण्याची शक्यता अधिक असते. सत्तेसाठी जादूई आकडा गाठताना ते आवश्यक असतं. सत्ताधारी पक्षाने अंतर्गत सर्वेक्षणातून कोणाची किती ताकद आहे, कोणाला जनतेने स्वीकारलं आणि कोणाला नाकारलं, हे तपासलं असेल. त्यामुळेच आपल्याला उमेदवारीचा निर्णय झाला असेल’ असं नितेश राणे यांनी सांगितलं.

आमदारकीचा राजीनामा 2014 पासूनच तयार ठेवला आहे. मी पक्षाच्या आदेशाचं पालन करणारा कार्यकर्ता आहे. त्यामुळे नारायण राणे सांगतील तेव्हा राजीनामा सादर करेन, असं नितेश राणेंनी स्पष्ट केलं.

महाजनादेश यात्रा सिंधुदुर्गात असताना मुख्यमंत्र्यांचं स्वागत स्वाभिमान पक्षाचे अध्यक्ष नारायण राणे आणि त्यांचे पुत्र नितेश राणेंकडून करण्यात आलं. ‘मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे कुठल्या पक्षाचे नव्हे, तर राज्याचे प्रमुख आहेत. त्यांनी आपल्या मतदारसंघाला नेहमीच न्याय दिला आहे. असा सहकार्य करणारा मुख्यमंत्री जेव्हा आपल्या मतदारसंघात येतो, तेव्हा त्यांचं स्वागत करणं आपलं कर्तव्य आहे’, असं स्पष्टीकरण नितेश राणेंनी दिलं.

“माझा भाजपप्रवेश हा मुंबईत व्हावा अशी इच्छा मी प्रगट केली आहे. येत्या काही दिवसात माझा भाजपात प्रवेश होईल. त्यामुळे शिवसेनेच्या विरोधाचा काही प्रश्न नाही. शिवसेना-भाजप युतीमध्ये काहीही झाले. तरी माझा मुख्यमंत्र्यांवर विश्वास आहे. त्यामुळे माझा भाजप प्रवेश निश्चित आहे’ असं नारायण राणे महाजनादेश यात्रेच्या वेळी म्हणाले होते.

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *