हा व्यक्ती अदानी आणि अंबानींपेक्षा जास्त श्रीमंत, मात्र जगाला अद्याप तोंडही दाखवलं नाही
भारतातील सर्वात श्रीमंत लोकांमध्ये मुकेश अंबानी आणि गौतम अदानी यांचा समावेश आहे. मात्र असा एक अब्जाधीश आहे, ज्याच्या चेहरा अद्याप जगाने पाहिलेला नाही. त्याच्याबाबत माहिती जाणून घेऊयात.

भारतातील सर्वात श्रीमंत लोकांमध्ये मुकेश अंबानी आणि गौतम अदानी यांचा समावेश आहे. मात्र असा एक अब्जाधीश आहे, ज्याच्या चेहरा अद्याप जगाने पाहिलेला नाही. या व्यक्तीने नाव सातोशी नाकामोतो असून तो बिटकॉइनचा संस्थापक आहे. तो जगासमोर न आल्याने तो कुठला आहे? त्याचा देश कोणता आहे? तो कसा दिसतो याबाबत कोणालाही माहिती नाही, मात्र ताज्या आकडेवारीनुसार तो जगातील बारावा सर्वात श्रीमंत व्यक्ती आहे. त्याने अदानी आणि अंबानींनाही मागे टाकलेले आहे.
बिटकॉइनची गगनभरारी
बिटकॉइन ही जगातील जगातील सर्वात जुनी आणि लोकप्रिय क्रिप्टोकरन्सी आहे. या करन्सीची किंमत दिवसेंदिवस वाढत आहे. सध्या एका बिटकॉइनचा दर 118000 डॉलर म्हणजे सुमारे 98 लाख रुपये आहे. गेल्या एका वर्षांत त्याची किंमत 55 टक्क्यांनी वाढली आहे. बिटकॉइनच्या या वाढलेल्या किमतीचा फायदा सातोशी नाकामोतोला झाला आहे. नाकामोतोकडे सुमारे 1 दशलक्ष बिटकॉइन आहेत. त्यामुळे नाकामोतोची एकूण संपत्ती 129 अब्ज डॉलर्स (सुमारे 10.7 लाख कोटी रुपये) आहे.
अंबानी आणि अदानींना टाकले मागे
नाकामोतो हा जगातील 12 वा सर्वात श्रीमंत व्यक्ती बनला आहे. त्याची एकूण संपत्ती अदानी आणि अंबानींपेक्षा जास्त आहे. मुकेश अंबानी यांची एकूण संपत्ती 109 अब्ज डॉलर्स आहे, तर गौतम अदानी यांची एकूण संपत्ती 84.2 अब्ज डॉलर्स आहे. नाकामोतोची संपत्ती बिल गेट्स याच्या 123 अब्ज डॉलर्स पेक्षाही जास्त आहे.
नाकामोतो कधीही जगासमोर आला नाही
नाकामोतोने ऑक्टोबर 2008 मध्ये बिटकॉइनचा व्हाईटपेपर सादर केला होता. त्यानंतर जानेवारी 2009 मध्ये पहिला बिटकॉइन ब्लॉक माइन करण्यात आला होता. 2009 पासून बिटकॉइन आणि ब्लॉकचेन तंत्रज्ञानाची सुरुवात झाली. 2010 मध्ये संशोधक सर्जियो डेमियन लर्नर यांच्या दाव्यानुसार, नाकामोतोने सुरुवातीला 10 लाख बिटकॉइन माइन केले होते, जे कधीही खर्च केलेले नाहीत, म्हणजेच ते नाकामोतोच्या मालकीचे आहेत.
बिटकॉइन काय आहे?
बिटकॉइन हे एक डिजिटल चलन आहे, म्हणजे ते रुपयाप्रमाणे थेट अस्तिस्वात नाही. ते फक्त ऑनलाइन ट्रान्सफर करता येते किंवा खात्यावर जमा ठेवता येते. हे पूर्णपणे डिजिटल आणि गुप्त प्रणालीवर चालते. सुरुवातीला बऱ्याच देशांनी याला विरोध केला होता, मात्र आता अमेरिकेसह काही देशांनी याला समर्थन दिले आहे.
