Gold Price Crash Drops: उच्चांकावर गेलेलं सोनं आतापर्यंत किती स्वस्त? यापूर्वी सोन्याचे भाव कधी आणि किती कोसळले होते?
Gold Price Crash Drops : मल्टी कमोडिटी एक्सचेंजवर सोने आणि चांदीच्या दरात मोठी घसरण झाली आहे. सोन्याचा भाव आतापर्यंतच्या उच्चांकाच्या खाली घसरला आहे. यापूर्वी अशी घसरण कधी आणि कितीपर्यंत झाली होती, ते जाणून घेऊया.

Gold Price Crash Drops : सध्या सोन्या-चांदीच्या किमतींनी गुंतवणूकदारांना मोठा धक्का दिला आहे. बऱ्याच काळापासून स्थिर असलेल्या या किमतींमध्ये आता ऐतिहासिक घसरण झाली असून, अनेक दशकांपूर्वीचे विक्रम मोडीत निघाले आहेत. भू-राजकीय तणाव आणि वाढत्या कच्च्या तेलाच्या किमतींच्या पार्श्वभूमीवर सोन्याच्या झालेल्या घसरणीने सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिला आहे. आंतरराष्ट्रीय बाजारातील दबाव आणि मजबूत डॉलरमुळे देशांतर्गत बाजारात सोन्याच्या किमती तळात पोहोचल्या आहेत, ज्यामुळे खरेदीदार संभ्रमात पडले आहेत. अशा पद्धतीने सोन्याच्या किमती एवढ्या कधी घसरल्या होत्या, जाणून घेऊया.
एमसीएक्सवर सोनं धाराशयी
सोमवारी बाजार उघडताच सोन्याच्या दरात सुळक्कन घसरण झाली. मल्टी कमोडिटी एक्सचेंज (MCX) वरील सोन्याचे वायदे मागील सत्राच्या तुलनेत प्रति 10 ग्रॅम 1382 रुपयांनी खाली घसरले. गेल्या गुरुवारी सोनं 1 लाख 49 हजार 680 रुपयांवर बदं झालं होतं. तर सोमवारी सकाळी बाजार सुरू झाल्यावर सोनं 1 लाख 48 हजार 298 वर उघडलं. या घसरणीमुळे जास्त दरात सोने खरेदी केलेल्या गुंतवणूकदारांमध्ये चिंता वाढली आहे. बाजार तज्ज्ञांच्या मते, ही घसरण आणखी वाढू शकते.
उच्चांकावर गेलेलं सोनं आतापर्यंत किती स्वस्त?
सोन्याच्या किमतीतील ही घसरण म्हणजे साधासुधा चढउतार नाही. एमसीएक्सवर सोन्याचा आत्तापर्यंतच म्हणजे लाईफ टाईम उच्चांक गाठला तेव्हा प्रति 10 ग्रॅमसाठी सोन्याचे दर 2 लाख 02 हजार 984 रुपयांवर पोहोचलं होतं. मात्र या विक्रमी पातळीच्या तुलनेत, सध्याची किंमत प्रति 10 ग्रॅम ₹ 54 हजार 686 ने घसरली आहे. टक्केवारीच्या दृष्टीने पाहिल्यास, जानेवारी 2026 मधील विक्रमी उच्चांकापासून किमतींमध्ये सुमारे 25% ची लक्षणीय घट झाली आहे.
चांदीच्या किंमतीतही खळबळ
सोन्यासोबतच चांदीच्या बाजारातही मोठी अस्थिरता दिसून आली. आठवड्याच्या पहिल्याच दिवशी चांदीच्या दरात प्रति किलो 2800 रुपयांपेक्षा जास्त घसरण झाली. चांदीच्या दरातील ही अचानक झालेली घसरण म्हणजे औद्योगिक मागणीतील घट आणि जागतिक अस्थिरतेचे द्योतक आहे. मौल्यवान धातूंच्या बाजारातील या त्सुनामीमुळे लहान व्यापाऱ्यांपासून ते मोठ्या गुंतवणूकदारांपर्यंत सर्वांनाच बचावात्मक भूमिका घेण्यास भाग पडलं आहे.
शेवटची एवढी मोठी घसरण कधी ?
मार्च 2026 मध्ये सोन्याच्या किमतीतील घसरण ही गेल्या 50 वर्षांतील विक्रमाच्या जवळपास पोहोचली आहे. 1975 नंतरची ही सोन्याची सर्वात वाईट मासिक कामगिरी मानली जात आहे. 2008 साली आलेल्या जागतिक मंदीच्या काळातही सोन्याच्या किमती 16.8 % नी घसरल्या होत्या, परंतु मार्च 2026 मध्ये हा आकडा 19.5 % च्या पुढे गेला आहे. या घसरणीमुळे 2013 मधील मोठ्या घसरणीच्या आठवणी ताज्या झाल्या, जेव्हा सोन्याच्या किमती जवळपास 29% नी घसरल्या होत्या.
सतत का घसरतंय सोनं ?
मध्यपूर्वेत जेव्हा युद्धसदृश परिस्थिती किंवा भू-राजकीय तणाव निर्माण होतो, तेव्हा सोन्याच्या किमती वाढणं हे खरंतर सामान्य आहे. मात्र, यावेळी परिस्थिती अगदी उलट आहे. इराण आणि मध्यपूर्वेतील वाढता तणाव असूनही, सोन्याच्या किमती घसरत आहेत. याचे मुख्य कारण म्हणजे कच्च्या तेलाच्या किमती प्रति बॅरल 110 डॉलरच्या जवळ पोहोचल्या आहेत. वाढत्या महागाईच्या धोक्यामुळे गुंतवणूकदारांना रोख रक्कम जवळ बाळगण्यास भाग पडलं असून त्यामुळेच मौल्यवान धातूंची मागणी लक्षणीयरीत्या कमी झाली आहे.
