भारतीयांनी वर्षभर सोनं खरेदी केलं नाही तर काय होईल? PM मोदींनी का केलं आवाहन?
PM Modi Gold Appeal : जर नागरिकांनी वर्षभर सोनं खरेदी केलं नाही तर त्याचा परिणाम देशाच्या अर्थव्यवस्थेसह विविध घटकांवर होऊ शकतो. याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज देशवासियांना वर्षभर सोनं न खरेदी करण्याचे आवाहन केले आहे. आता जर नागरिकांनी वर्षभर सोनं खरेदी केलं नाही तर त्याचा परिणाम देशाच्या अर्थव्यवस्थेसह विविध घटकांवर होऊ शकतो. कारण भारत हा जगातील सर्वात मोठ्या सोन्याच्या ग्राहक देशांपैकी एक आहे. लग्नसमारंभांपासून गुंतवणुकीपर्यंत भारतीयांचे सोन्याशी अतिशय घट्ट नाते राहिले आहे. मात्र वर्षभर सोनं खरेदी केलं नाही तर काय होईल ते जाणून घेऊयात.
समोर आलेल्या आकडेवारीनुसार, भारतीयांची वर्षभराची एकूण सोन्याची मागणी साधारणपणे 600 ते 800 टनांच्या दरम्यान असते. 2025 मध्ये भारताची एकूण सोन्याची मागणी सुमारे 710.9 टन होती. यामध्ये सर्वात मोठा वाटा दागिन्यांच्या खरेदीचा असतो, तर गोल्ड बार, नाणी आणि ETF मधील गुंतवणूकही झपाट्याने वाढत आहे. 2026 च्या पहिल्या तिमाहीत भारताची सोन्याची मागणी 151 टन होती, ज्यामध्ये गुंतवणुकीचा हिस्सा दागिन्यांपेक्षा अधिक होता.
भारतात सोन्याचे आकर्षण किती मोठे?
भारतात सोने हे केवळ धातू नसून परंपरा आणि सुरक्षिततेचे प्रतीक मानले जाते. दरवर्षी देशात शेकडो टन सोन्याची खरेदी केली जाते. सण, लग्न आणि गुंतवणुकीच्या नावाखाली लोक मोठ्या प्रमाणात सोने खरेदी करतात. भारत आपल्या गरजेपैकी बहुतांश सोने परदेशातून आयात करतो. त्यामुळे जेव्हा सोन्याची आयात वाढते, तेव्हा देशातून मोठ्या प्रमाणात परकीय चलन बाहेर जाते.
एक वर्ष सोनं खरेदी न केल्यास काय होईल?
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आवाहनानुसार जर भारतीयांनी एक वर्षासाठी सोन्याची खरेदी कमी केली किंवा पूर्णपणे थांबवली, तर त्याचा सर्वात मोठा परिणाम देशाच्या आयात खर्चावर दिसून येईल. सोन्याची आयात कमी झाल्यामुळे सरकारला परकीय चलनाची बचत करण्यास मदत होऊ शकते. त्यामुळे डॉलरची मागणी कमी होईल आणि रुपयावरील दबावही घटू शकतो. यामुळे भारताचा करंट अकाउंट डेफिसिट म्हणजेच व्यापार तूट कमी करण्यास मदत होऊ शकते. म्हणजेच देशातील पैसा परदेशात जाण्याऐवजी देशांतर्गत गुंतवणूक आणि विकासकामांमध्ये अधिक वापरला जाऊ शकतो.
बँका आणि शेअर बाजाराला फायदा
भारतात मोठ्या प्रमाणात पैसा सोन्यात गुंतवला जातो, ज्यामुळे ती रक्कम निष्क्रिय होते. जर लोकांनी सोने खरेदी करण्याऐवजी बँक FD, SIP, शेअर बाजार किंवा सरकारी योजनांमध्ये गुंतवणूक करण्यास सुरुवात केली, तर अर्थव्यवस्थेला अधिक फायदा होऊ शकतो. यामुळे बँकांकडे अधिक भांडवल उपलब्ध होईल आणि उद्योगांना कर्ज मिळेल. त्यामुळे रोजगारही वाढू शकतो.
दागिने उद्योगावर परिणाम
दुसरीकडे सोन्याची खरेदी थांबवल्यास दागिने उद्योगावर याचा परिणाम होऊ शकतो. कारण भारतातील दागिने उद्योग लाखो लोकांना रोजगार देतो. जर एका वर्षासाठी सोन्याची मागणी अचानक कमी झाली, तर ज्वेलरी दुकानदार, कारागीर आणि लहान व्यावसायिकांना मोठे नुकसान सहन करावे लागू शकते. म्हणजेच सोनं खरेदी न करण्याचा निर्णय घेतल्यास त्याचा फायदा आणि तोटाही होऊ शकतो.
