RBI MPC: रिझर्व्ह बँकेकडून नवे पतधोरण जाहीर, जाणून घ्या चार महत्त्वाच्या गोष्टी

RBI Policy | रिझर्व्ह बँकेची पतधोरण समिती दर दोन महिन्यांनी आर्थिक परिस्थितीचा आढावा घेऊन नवे व्याजदर जाहीर करते. यावेळी रिझर्व्ह बँक रेपो रेटमध्ये कपात करेल, असा अंदाज होता. मात्र, RBIकडून रेपो रेट जैसे थे ठेवण्यात आला आहे.

RBI MPC: रिझर्व्ह बँकेकडून नवे पतधोरण जाहीर, जाणून घ्या चार महत्त्वाच्या गोष्टी
रिझर्व्ह बँक

मुंबई: भारतीय रिझर्व्ह बँकेच्या पतधोरण समितीने शुक्रवारी जाहीर केलेल्या निर्णयानुसार रेपो रेटमध्यो कोणताही बदल करण्यात आलेला नाही. सलग आठव्यांदा रेपो रेट 4 टक्क्यांवर स्थिर ठेवण्यात आला आहे. तर रिव्हर्स रेपो रेट 3.35 टक्के इतका ठेवण्यात आला आहे. रिझर्व्ह बँकेची पतधोरण समिती दर दोन महिन्यांनी आर्थिक परिस्थितीचा आढावा घेऊन नवे व्याजदर जाहीर करते. यावेळी रिझर्व्ह बँक रेपो रेटमध्ये कपात करेल, असा अंदाज होता. मात्र, RBIकडून रेपो रेट जैसे थे ठेवण्यात आला आहे.

1. सलग आठव्यांदा रेपो रेट स्थिर

रिझर्व्ह बँकेने अपेक्षेप्रमाणे रेपो रेटमध्ये बदल केला नाही. रेपो रेट 4 टक्क्यांवर स्थिर ठेवण्यात आला आहे. सलग आठव्यांदा रिझर्व्ह बँकेने रेपो रेटमध्ये कोणताही बदल केलेला नाही. रेपो दर 4 टक्क्यांवर कायम आहे. त्यानुसार रिव्हर्स रेपो दरही 3.35 टक्के ठेवण्यात आला आहे.

2. IMPS मर्यादेत वाढ

भारतीय रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी IMPS सेवेबाबत मोठी घोषणा केली आहे. आता ग्राहक एका दिवसात 5 लाख रुपयांपर्यंतचे व्यवहार करू शकतील. पूर्वी ही मर्यादा दोन लाख रुपये होती.

3. महागाई दराच्या अंदाजात घट

गव्हर्नर शक्तिकांत दास म्हणाले की, केंद्रीय बँकेने आपले FY22 CPI चलनवाढीचे लक्ष्य 5.7 टक्क्यांपेक्षा कमी करून 5.7 टक्के केले आहे. यामध्ये जुलै-सप्टेंबर सीपीआय महागाई देखील पूर्वीच्या 5.9 च्या तुलनेत 5.1 टक्के होती. ऑक्टोबर-डिसेंबर सीपीआय महागाई 4.5 टक्के असल्याचा अंदाज आहे जो पूर्वी 5.3 टक्के होता.

4. विकासदर वाढण्यावर ठाम

रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी म्हटले की, 2021-22 या आर्थिक वर्षात अर्थव्यवस्थेचा विकासदर 9.5 टक्के इतका कायम राहील, असा अंदाज आहे. दुसऱ्या तिमाहीत 7.9 टक्के, तिसऱ्या तिमाहीत 6.8 टक्के आणि चौथ्या तिमाहीत 6.1 टक्के राहण्याचा अंदाज आहे. आर्थिक वर्ष 2022-23 च्या पहिल्या तिमाहीत वास्तविक जीडीपी वाढ 17.2 टक्के राहील, असा अंदाज आहे.

रेपो दर म्हणजे काय?
रेपो दर किंवा रेपो रेट म्हणजे बँका रिझर्व्ह बँकेकडून ज्या दराने कर्जाऊ पैसे घेतात तो दर. रेपो दर वाढल्यास, बँकांना रिझर्व्ह बँकांना वाढीव व्याजदराने पैसे द्यावे लागतात. त्याचा परिणाम म्हणून बँक आपल्या कर्जदारांचं व्याजदर वाढवते. त्यामुळे रेपो दरात कपात झाल्यास, बँकाही आपल्या कर्जदारांचं व्याजदर कमी करतात. रेपो रेट कमी होणं म्हणजे बँकेला स्वस्तात पैसे मिळतात. त्यामुळे बँका कर्जदारांना पैसे देताना कमी दरात देऊ शकतात.

रिव्हर्स रेपो म्हणजे काय?
रिव्हर्स रेपो रेट म्हणजे रेपो रेटच्या अगदी उलट. जशा बँका आरबीआयकडून कर्ज घेतात, तसं आरबीआयही बँकाकडून कर्ज घेते, ठेवी ठेवल्या जातात. तो दर म्हणजे रिव्हर्स रेपो दर होय. रेपो दरामध्ये बदल झाल्यानंतर तोच दर रिव्हर्स रेपो दराला लागू होतो.

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI