Beed Crime Govind Barge Death : उपसरपंच गोविंद बर्गेच्या मृत्यूनंतर आता पूजाने तोंड उघडलं, दिली मोठी कबुली
बीडच्या गेवराई तालुक्यातील लुखमसलाचे माजी उरपसरंपच गोविंद बर्गे यांच्यावर पूजाचा दबाव सतत वाढत होता. जिच्यावर जीवापाड प्रेम केलं तिच्याकडून सतत मिळणाऱ्या धमक्या, ब्लॅकमेलिंगमुळे गोविंद बर्गे तणावात होते. आपली व्यथा त्यांनी मित्रांपाशीही बोलून दाखवली होती.

ती नृत्यांगना तर तो विवाहीत माणूस.. घरी बायको, पोरं, कुटुंबीय सगळेच.. पण तरी तो तिच्या प्रेमात पडला आणि तिनेही त्याच्याशी प्रेमसंबंध ठेवले. एखाद्या चित्रपटाच्या कथेलाही लाजवेल अशी कथा बीडच्या गेवराई तालुक्यातील लुखमसलाचे उपसरपंचासोबत घडली. मात्र या स्टोरीचा शेवट अतिशय धक्कादायक आणि तितकाच दु:खद झाला. माजी उपसरपंच गोविंद बर्गे (Govind Barge) पूजाच्या (Pooja Gaikwad) प्रेमात पडले, तिने जे मागितलं ते त्यांनी तिला दिला. पैसा म्हणू नको, मोबाईल म्हणू नका. सोनं-नाणं, एवढंच नव्हे तर गावातल घर बांधण्यासाठीही त्यांनी तिला पैसे दिले. मात्र एवढं सगळं होऊनही तिच्या मागण्या संपेना. गेवराईतला बंगला आणि भावाच्या नाववर जमीन यासाठी तगादा लावत पूजाने गोविंद बर्गेंना ब्लॅकमेल करण्यास सुरूवात केली. तुझ्यावर बलात्काराचा गुन्हा लावेन अशी धमकीही दिली. आपण जिच्यावर जीवापाड प्रेम केलं तिचं हे रूप पाहून ते हादरले, त्यांना ते सहनच झालं नाही. तिची समजूत काढायला तिच्या गावी गेलेल्या माजी उपसरंपचाने घरासमोरच गाडीत बसून आयुष्य संपवलं.
माजी उपसरपंच गोविंद बर्गेच्या धक्कादायक मृत्यूमुळे मोठी खळबळ माजली असून याप्रकणात रोज नवनवे दावे केले जात आहेत. कोणी म्हणतं ही आत्महत्या तर त्यांचे नातेवाईक म्हणतात की हा तर घातपात आहे. मृत बर्गे यांचे नातेवाईक, मित्रांनी डान्सर पूजा गायकवाड( वय 21) हिच्यावर अनेक आरोप केले आहत. सध्या 3 दिवसांच्या पोलीस कोठडीत असलेल्या पूजाने आता मोठी कबुली दिली आहे.
पूजाने दिली मोठी कबुली
गोविंद बर्गे यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या भावाने, मेहुण्याने आणि मित्रांनी बरीच माहिती देत पूजावर अनेक आरोप केले. कुटुंबियांच्या आरोपानंतर वैराग पोलिसांनी पूजावर बर्गे यांना आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करत तिला बेड्या ठोकल्या. न्यायलयासमोर हजर केल्यावर तिला 3 दिवसांची पोलीस कोठडी ठोठावण्यात आली आहे. मात्र आता या प्रकरणाला एक वेगळंच वळण मिळालं आहे. पूजा गायकवाडने एक कबुली दिली आहे. पोलिसांनी केलेल्या चौशीदरम्यान पूजा गायकवडाने तोंड उघडलं असून तिने कबुली दिली. माजी उपसरपंच गोविंद बर्गे यांच्यासोबत आपले प्रेमसंबंध होते, असं पूजाने आता पोलिसांसमोर कबूल केलं आहे. पोलिसांकडून तिची अजून सखोल चौकशी सुरू असून, त्यातून आता काय माहिती समोर येते याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.
5-6 दिवस तणावात होते, मोबाईलही बंद
गोविंद बर्गेच्या मृत्यूमुळे सगळ्यांनाच मोठा धक्का बसला असून ही आत्महत्या नसून घातपात झाल्याचा संशय नातेवाईक, कुटुंबिय आणि मित्रांनी व्यक्त केला असून सखोल तपासाची मागणी सातत्याने केली जात आहे. गोविंद यांच्या मित्रांनीही पोलिसांना बरीच माहिती दिली आहे. पूजा सतत पैसे मागायची. गेवराईचा बंगला दे, तसेच गोविंद यांच्या नावावर असलेली जमीन भावाच्या नावे कर अशा अनेक मागण्या तिच्या होत्या. मात्र गोविंद यांना ते मान्य नव्हते. ते मागण्या ऐकत नाहीत म्हटल्यावर पूजाने खरं रूप दाखवलं. तिने त्यांच्याशी बोलणं कमी केलं, सतत धमक्या द्यायची, बलात्काराचा गुन्हा टाकेन अशी धमकी तिने गोविंद यांना दिली.तसेच त्यांना ब्लॅकमेलही करत होती.
यामुळेच गोविंद तणावात होते. गेल्या 5-6 दिवसांपासून तर त्यांचा तणाव खूप वाढला होता, ते मानसिकरित्या खचले होते . हे सगळं त्यांनी त्यांच्या मित्रापाशी बोलून दाखवत मन मोकळं केलं होतं. मी खूप निराश झालोय असंही ते म्हणाल्याचे गोविद यांच्या मित्राने सांगितलं. या सर्व घटनांमुळे गोविंद निराश होता, असं मित्रांनी सांगितलं. आम्ही रोज त्यांच्यासोबत होतो, गोविंद बर्गे आत्महत्या करतील असं वाटत नाही असं मित्रांनी सांगत घातपाताचा संशय व्यक्त करत सखोल चौकशीची मागणी केली. हा ब्लॅकमेलिंगचा प्रकार असू शकतो असेही ते म्हणाले.पाच ते सहा दिवसांपासून गोविंदचा कुणाशीही संपर्क नव्हता. त्यांचा फोनही लागत नव्हता अशी माहितीही मित्रांनी पोलिसांसमोर उघड केल्याचे समजते.
