तायक्वांदोमध्ये दोन सुवर्ण, इंडियन आयडॉलमध्येही टॅलेंट दाखवलं, 55 मोबाईल चोरणारा सराईत गुन्हेगार अटकेत
सूरज उर्फ फायटर गुप्ता हा मूळ दिल्लीतील उत्तम नगरचा रहिवासी आहे, त्याचे वय 28 वर्षे आहे. यापूर्वी दिल्लीतील विविध पोलीस ठाण्यांमध्ये त्याच्यावर 30 हून अधिक गुन्हे दाखल आहेत.

नवी दिल्ली : दिल्लीच्या मोती नगरमध्ये पोलिसांनी एका गुन्हेगाराला अटक केली असून त्याच्यावर जवळपास 30 गुन्हे दाखल आहेत. विशेष बाब म्हणजे या गुन्हेगाराने तायक्वांदोमध्ये राष्ट्रीय स्तरावर सुवर्णपदक पटकावले आहे आणि इंडियन आयडॉल या टीव्ही रिअॅलिटी शोमध्येही सहभाग घेतला होता.
55 मोबाईल आणि पिस्तूलही जप्त
दिल्ली पोलिसांचे एएसआय नरेंद्र, कॉन्स्टेबल राजेंद्र यांनी सूरज उर्फ सेनानी नावाच्या हिस्ट्री शीटरला अटक केली आहे. आरोपीकडून चोरीचे 55 मोबाईल आणि एक पिस्तूलही जप्त करण्यात आले आहे.
दिल्लीच्या विविध भागात चोऱ्या
चौकशी दरम्यान सेनानीने मोबाईल चोरीसोबतच अडीच किलो सोने लुटल्याचीही कबुली दिली आहे. दिल्लीच्या विविध भागांमध्ये विशेषतः पश्चिम, बाह्य, मध्य, उत्तर जिल्ह्यात 100 हून अधिक मोबाईल आणि सोनसाखळ्या चोरी केल्याची कबुली त्याने दिली.
30 हून अधिक गुन्हे
सूरज उर्फ फायटर गुप्ता हा मूळ दिल्लीतील उत्तम नगरचा रहिवासी आहे, त्याचे वय 28 वर्षे आहे. यापूर्वी दिल्लीतील विविध पोलीस ठाण्यांमध्ये त्याच्यावर 30 हून अधिक गुन्हे दाखल आहेत.
इंडियन आयडॉलमध्येही झळकला
सूरजने अरविंद कॉलेजमधून पदवी शिक्षण पूर्ण केलं आहे. विशेष म्हणजे त्याने तायक्वांदोमध्ये राष्ट्रीय स्तरावर दोन वेळा सुवर्णपदकं पटकावली आहेत. तर इंडियन आयडॉल या रिअॅलिटी शोच्या चौथ्या सिझनमध्ये सहभागी होऊन त्याने टॉप 50 मध्ये स्थान मिळवलं होतं.
पुण्यात ज्वेलर्सच्या दुकानात चोरी
दुसरीकडे, मुंबईहून दागिने विक्रीसाठी आलेल्या व्यावसायिकाकडील तब्बल 1 कोटी 20 लाख रुपये किंमतीचे दागिने लांबवण्यात आल्याची घटना काही दिवसांपूर्वी उघडकीस आला होता. सुमारे 3 किलो वजनाचे सोन्याचे दागिने लहान मुलासह आलेल्या दोन महिलांनी लांबवल्याचा आरोप आहे. पुण्याच्या रविवार पेठेतील ज्वेलर्सच्या दुकानात हा प्रकार घडला होता.
काय आहे प्रकरण?
ही घटना रविवार पेठेतील राजमल माणिकचंद आणि कं. ज्वेलर्स सराफ दुकानात घडली होती. या घटनेमुळे प्रचंड खळबळ उडाली असून पोलिस प्रकरणाचा युद्ध पातळीवर तपास करत आहेत. त्यांना सीसीटीव्ही फुटेज मिळाले असून त्या आधारे महिलांचा शोध घेत आहेत.
जिग्नेश नरेश बोराणा (33, रा. घाटकोपर, मुंबई) यांनी फरासखाना पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी घटनेची खातरजमा करुन गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांचा तपास सुरू आहे.
नेमकं काय घडलं?
दरम्यान, प्राप्त झालेल्या माहितीनुसार, बोराणा आणि मुकेश चौधरी हे मुंबईहून पुण्यात दागिने विक्रीसाठी आले होते. ते रविवार पेठेतील एका ज्वेलर्सच्या दुकानात गेले. त्यांच्याकडे एक दागिन्यांची पेटी होती. त्यामध्ये सुमारे 1 कोटी 20 लाख रूपये किंमतीचे 3 किलो वजनाचे सोन्याचे दागिने होते.
लहान मुलगा आणि दोन महिलांनी ती सोन्याचे दागिने असलेली पेटी पळवली. बोराणा यांच्या लक्षात आल्यानंतर त्यांची भंबेरी उडाली. फिर्याद दाखल करण्यात आली असून गुन्ह्याचा तपास फरासखाना पोलिस करीत आहेत.
संबंधित बातम्या :
पाच महिलांची हातचलाखी, बसमध्ये बँक मॅनेजरच्या बॅगेतून अडीच लाख लांबवले, पुढे काय घडले?
VIDEO | ज्वेलरकडे खरेदीला आलेल्या ग्राहकाच्या पाटल्यांची चोरी, तीन महिला चोरांसोबत लहान मुलगाही
गाडीतून ऑईल गळती, लहान मुलाने गंडवलं, बँक कर्मचाऱ्याच्या सतर्कतेने 50 लाखांची लूट टळली
