Beed Crime Govind Barge Death : चॅटिंगदरम्यान अनेकदा दिली धमकी, गोविंद बर्गे मृत्यूप्रकरणात मोठा खुलासा
बीडमधील गेवराई तालुक्यातील माजी उपसरपंच गोविंद बर्गे यांच्या रहस्यमय मृत्यूने एकच खळबळ उडाली आहे. त्यांच्या प्रेयसी पूजा गायकवाडवर आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा आरोप आहे. पोलिसांनी पूजाची अटक केली असून तिची न्यायालयीन कोठडी वाढवण्यात आली आहे. पोलिसांनी फोन कॉल डिटेल्स आणि चॅट तपासले असून त्यात धमकीचे संदेश आढळले आहेत.

बीडमधील गुन्हेगारी सत्र काही थांबताना दिसत नसून सतत काही ना काही घटना कानावर येतच आहेत. गेल्या आठवड्यात बीडच्या गेवराई तालुक्यातील लुखमासला गावचे माजी उपसरपंच गोविंद बर्गे (Govind Barge) यांच्या मृत्यूमुळे तर अख्खा जिल्हा पुन्हा हादरला. नर्तिका पूजा गायकवाडच्या (Pooja Gaikwad) प्रेमात असलेल्या गोविंद बर्गे यांनी तणाव, ब्लॅकमेलिंगला कंटाळून स्वत:चा जीव दिल्याचे बोलले जात असले तरी ही आत्महत्या नव्हे तर घातपात असल्याचा आरोप गोविंद बर्गेच्या नातेवाईकांनी केला आहे. त्यामुळे संशयाची सुई पूजा गायकवाडच्या दिशेने वळाली. सासुरे गावात पूजाच्या घरपासून काही अंतरावरच कारमध्ये गोविंद यांचा मृतदेह सापडला होता. याप्रकरणात पोलिसांच्या ताब्यात असलेल्या पूजाच्या अडचणी वाढल्या असून तिची पोलीस कोठडी संपल्यानंतर आतात 14 दिवसांसाठी न्यायालयीन कोठडीत रवानगी झाली आहे.
गोविंद बर्गेच्या आत्महत्येनंतर मेहुण्याने पोलिसात तक्रार दाखल केली. त्याआधारे गुन्हा दाखल करत पोलिसांनी पूजा गायकवाडला बेड्या ठोकल्या. सोमवारी पूजाची पोलिस कोठडीची मुदत संपली होती, त्यानंतर तिला कोर्टासमोर हजर केले असता तिला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी ठोठावण्यात आली आहे. बार्शी न्यायलयाने पूजाला न्यायालयीन कोठडीत पाठवलं असून आता तिची नवरात्र तुरूंगाच्या गजाआडच जाईल.
चॅटिंगमधून धमक्यांचा खुलासा
दरम्यान याप्रकरणी आता पोलिसांकडून कसून तपास सुरू असून त्यांनी अनेक महत्वाच्या गोष्टींचा उलगडा केला आहे. पूजा आणि गोविंद बर्गे यांचे फोन कॉल् डिटेल्स आणि चॅटिंगही पोलिसांनी तपासले असून त्यातून महत्वाचा खुलासा झाला आहे. त्यामध्ये गोविंद बर्गे याने आत्महत्या करण्याची धमकी दिल्याचे उघड झाले आहे. त्यामुळे पूजाच्या घरापासून काही अंतरावर कारमध्ये गोविंद बर्गे यांनी स्वत:च स्वत:वर पिस्तूलमधून गोळी झाडून घेतली असावी असा संशय व्यक्त होत आहे. त्यामुळे त्यांच्या नातेवाईकांकडून, कुटुंबियांकडून घातपाताचा जो संशय व्यक्त होतोय, त्यावर पोलिस काय भूमिका मांडतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. पोलीस सविस्तर तपास करत आहेत.
तसेच न पूजा गायकवाड आणि गोविंद बर्गे अनेक ठिकाणी एकत्र राहिल्याचेही पोलिस तपासात समोर आलं आहे. एवढंच नव्हे तर पूजा गायकवाडच्या बँक खात्यात गोविंद बर्गेच्या नावाने अनेक आर्थिक व्यवहार झाल्याचेही निष्पन्न झाले आहे. पाच दिवसांच्या पोलीस कोठडीत पोलिसांनी या प्रकरणातील अनेक गोष्टींचा छडा लावला आहे. तसेच, पूजा गायकवाड हिच्यासोबत जे काम करत होते ते सहकारी आणि तिच्या काही मैत्रिणींचेही जबाब नोंदवण्यात आले आहेत.
धाराशिव मध्ये लोकनाट्य कला केंद्राविरोधात महिला सामाजिक कार्यकर्त्या आक्रमक
माजी उपसरपंच गोविंद बार्गे आत्महत्या प्रकरणानंतर, धाराशिव मध्ये लोकनाट्य कला केंद्राच्या विरोधात महिला सामाजिक कार्यकर्त्या आक्रमक झाल्या आहेत. लोकनाट्य कला केंद्र बंद करा अन्यथा, रस्त्यावर उतरून आंदोलन करू असा इशारा त्यांनी प्रशासनाला दिला आहे. धाराशिव जिल्ह्यात डीजेच्या तालावर छम छम सुरु, नियम धाब्यावर बसवत लोकनाट्य कला केंद्र चालतात. पारंपारिक नृत्य सोडून डीजे आणि सिनेमातील गाणी वाजत असतात, तसेच वेशभूषा आणि वेळेचे बंधन पाळले जात नाही अशा अनेक तक्रारी आहेत. चौफुला, जामखेड नंतर धाराशिव हे लोकनाट्य कला केंद्राचं हब बनू पाहत आहे. त्यामुळे कला केंद्र बंद करण्याचा इशारा महिला सामाजिक कार्यकर्त्यांनी प्रशासनाला दिला आहे.
Beed Crime Govind Barge Death : तर गोविंद बर्गे यांचा जीव वाचला असता, शेवटचा व्हिडीओ कॉल कोणाला ?
सोलापूर धुळे महामार्गावरती पारगाव ते धाराशिव या परिसरामध्ये जवळपास 6 लोकनाट्य कला केंद्र सुरू असून आणखी नव्याने पाच कला केंद्राची उभारणी केली जात आहे. कला केंद्राच्या अवतीभोवती गोळीबार, गँगवार आणि गुन्हेगारीच्या अनेक घटना घडल्या आहेत. याप्रकरणी जिल्ह्यातील विविध पोलीस स्टेशनमध्ये कला केंद्र वरील भांडणाचे गुन्हे दाखल आहेत. डोक्यात गोळी घालून आत्महत्या केलेले माजी उपसरपंच गोविंद बर्गे प्रकरणातील नर्तकी पूजा गायकवाड ही धाराशिव जिल्ह्यातील कला केंद्रात काम करत होती. वेळेचं बंधन न पाळता लोकनाट्य कला केंद्र रात्रभर सुरू ठेवले जातात , पोलिसांचे दुर्लक्ष असल्याचा आरोप परिसरातील नागरिकांनी केला आहे.
