चोरट्यांचा हिवाळी बार; नाशिकमध्ये एकाच रात्री 5 मेडिकल फोडले, हजारोंची रोकड लंपास

नाशिकची गुन्हेगारी नगरीकडे प्रचंड वेगाने वाटचाल सुरू झालेली दिसते आहे. गेल्या आठवड्यात सलग तीन झालेले खून आणि त्यानंतर चोरींच्या घटनांचा धडाका. त्यामुळे सामान्य नागरिक हादरून गेले आहेत.

चोरट्यांचा हिवाळी बार; नाशिकमध्ये एकाच रात्री 5 मेडिकल फोडले, हजारोंची रोकड लंपास
प्रातिनिधीक फोटो

नाशिकः नाशिकची गुन्हेगारी नगरीकडे प्रचंड वेगाने वाटचाल सुरू झालेली दिसते आहे. गेल्या आठवड्यात सलग तीन झालेले खून आणि त्यानंतर चोरींच्या घटनांचा धडाका. त्यामुळे सामान्य नागरिक हादरून गेले आहेत. तब्बल एकाच रात्री शहरात चोरट्यांनी धुडगूस घालून एक-दोन नव्हे तर 5 मेडिकल स्टोअर्स फोडले आहेत. नाशिकरोड परिसरात ही घटना घडली आहे. त्यामुळे पुन्हा एकदा पोलीस नेमके करतायत काय, असा सवाल नागरिक उपस्थित करत आहेत.

अशी घडली घटना?

नाशिकरोड परिसरात रविवारी रात्री चोरट्यांनी तब्बल पाच मेडिकल स्टोअर्स फोडली आहेत. दुकानाचे शटर वाकवून चोरटे आत घुसले. त्यांनी या दुकानांमधून हजारो रुपयांची रोकड लंपास केली आहे. चोरीची घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली असून, पोलिसांनी तपास सुरू केल्याचे समजते. एकीकडे कोरोनाची भीती. अनेकांची रोजगार आणि व्यवसाय त्यामुळे बुडाले आहेत. त्यात चोरट्यांचा त्रास. यामुळे सामान्य नागरिक हादरून गेला आहे. चारच दिवसांपूर्वी सिन्नर तालुक्यात चोरट्यांनी प्राणघातक हल्ला करून दरोडा घातला होता. या घटनांना पोलिसांनी आळा घालावा, अशी मागणी होत आहे.

भय इथले संपत नाही

नाशिकमध्ये गेल्या आठवड्यात पोलिस पुत्राचा खून झाला. त्यानंतर एका भाजीविक्रेत्याला अतिशय निर्घृणपणे संपवण्यात आले. त्यानंतर भाजप पदाधिकाऱ्याची झालेली हत्या. शहरात एकामागून एक खून पडत असताना पोलीस आयुक्त हेल्मेटसक्ती तीव्र करण्यात गुंतले होते. विशेष म्हणजे ही मोहीम राबणारे पोलीस मात्र हेल्मेटविना फिरताना दिसत होते. त्यामुळे नागरिकांनी एका पेट्रोलपंपावर प्रचंड गोंधळही घातला होता. हेल्मेटसक्ती सामान्यांनाच. ती पोलिसांना लागू नाही का, असे म्हटल्यानंतर संबंधित पोलीस पसार झाले होते. त्यातच आता चोरट्यांनी पुन्हा एकदा चोरीचा धडाका लावला आहे.

गस्त वाढवावी

शहरात खून, चोऱ्यांचे सत्र सुरू आहे. पोलिसांनी सारी ताकद हेल्मेटसक्तीवर लावण्याऐवजी शहरातील रात्रीची गस्त वाढवावी. गुन्हेगारांचा शोध घेण्यात वेळ खर्ची घालावा. दरोड्यात प्राणघातक हल्ला होत आहे. शहरात खुनामागून खून होत आहेत. जीव महत्त्वाचा की, एखादी मोहीम याचा विचार करावा, अशी मागणी संतापलेल्या नागरिकांमधून होताना दिसत आहे.

इतर बातम्याः

संदीप-सलीलची मैफल कंपूगिरी म्हणत ट्रोल; एकाच गल्लीतील कार्यक्रम म्हणून हिणवणे सुरू, नेमकं कारण काय…?

VIDEO | हा व्हिडीओ पाहून तुमचं काळीज तीळ-तीळ तुटेल, लेकरु ओरडतंय ‘पप्पा जाऊ द्या’, नराधम बापाची लाकडी दांडक्याने अमानुष मारहाण

Published On - 11:58 am, Mon, 29 November 21

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI