अल्पवयीन मेहुणीच्या प्रेमात तरुण वेडापिसा, गळा चिरुन पत्नीची हत्या

आरोपी उत्तम डे आपल्या अल्पवयीन मेहुणीच्या प्रेमात पडला. प्रेम प्रकरणात अडथळा ठरणारी पत्नी प्रतिमा देवीचा त्याने गळा चिरुन खून केल्याचा आरोप आहे. झारखंडमध्ये ही घटना घडली आहे

अल्पवयीन मेहुणीच्या प्रेमात तरुण वेडापिसा, गळा चिरुन पत्नीची हत्या
crime News

रांची : अल्पवयीन मेहुणीच्या प्रेमात वेड्यापिशा झालेल्या मेहुण्याने बायकोचा काटा काढला. झारखंडमधील कोळसा नगरी धनबादमध्ये हे हत्याकांड घडल्याची माहिती आहे. पत्नीला जंगलात नेऊन दोघा मित्रांच्या मदतीने पतीने तिची हत्या केल्याचा आरोप आहे. हत्येसाठी वापरलेल्या शस्त्रासह पोलिसांनी आरोपी पतीला अटक केली आहे.

काय आहे प्रकरण?

ही घटना झारखंडमधील धनबाद शहरातील बलियापूर पोलीस स्टेशन परिसरातील आहे. आरोपी उत्तम डे आपल्या अल्पवयीन मेहुणीच्या प्रेमात पडला. प्रेम प्रकरणात अडथळा ठरणारी पत्नी प्रतिमा देवीचा त्याने गळा चिरुन खून केल्याचा आरोप आहे.

मेहुणीसोबत प्रेम प्रकरणात पत्नीचा अडसर

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी उत्तम डे हा त्याची पत्नी प्रतिमा देवीसोबत राहत होता. दरम्यानच्या काळात तो पत्नीच्या अल्पवयीन बहिणीच्या प्रेमात पडला होता. आरोपीला आपल्या मेहुणीशी लग्न करायचे होते, त्यात त्याची पत्नी अडसर ठरत होती. त्यामुळे उत्तमने आपल्या काही मित्रांच्या साथीने पत्नीला मार्गातून दूर करण्याचा निर्णय घेतला.

मित्रांच्या मदतीने काटा काढला

आरोपी उत्तम डे याने मुन्ना उर्फ ​​अविनाश हलदर आणि बाबा उर्फ विकास राय उर्फ यांच्यासोबत हत्येचा कट रचला. उत्तम पत्नीला रस्त्याने घेऊन जात असताना विकास राय याने रस्ता विचारण्याच्या बहाण्याने त्यांची कार थांबवली. त्यावेळी मुन्नाने प्रतिमाचा तोंड दाबून धारदार शस्त्राने तिचा गळा चिरुन खून केला.

विवाहितेवर चाकूने अनेक वेळा वार

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मारेकरी इतक्यावरच थांबले नाहीत, तर त्यानंतरही त्यांनी विवाहितेवर चाकूने अनेक वेळा वार केले. प्रतिमाचा मृत्यू झाल्यावर तिचा मृतदेह जंगलात फेकून दिला आणि ते पळून गेले.

23 नोव्हेंबर रोजी मृतदेह सापडल्यानंतर पोलिसांनी तपास केला असता सत्य उघडकीस आले. पतीने आपला गुन्हा स्वीकारल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. हत्येसाठी वापरलेला चाकूही जप्त केल्याचं पोलिसांनी सांगितलं आहे.

संबंधित बातम्या :

जुन्या वादातून पंधरा वार करुन दारुविक्रेत्या ‘मनोज’ची क्रूर हत्या, वर्धेच्या गोंडप्लॉट परिसरात घडला थरार

VIDEO : भाईंदरमध्ये ठाण्याची पुनरावृत्ती, फेरीवाल्यावर कारवाईसाठी गेलेल्या अधिकाऱ्यावर लोखंडी रॉडने हल्ला

डोंबिवलीत बिअर फुकट दिली नाही म्हणून बार मॅनेजरला मारहाण, सीसीटीव्हीसह डिव्हीआर आणि रोकड घेऊन तरुण पसार

Published On - 8:09 am, Mon, 29 November 21

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI