Kalyan Crime : तुला भरपूर बॉयफ्रेंड … नातेवाईकांनीच नात्याला लावला कलंक, अल्पवयीन मुलीवर सामूहिक अत्याचार, कल्याण हादरलं
हा किळसवाणा प्रकार तब्बल 5 महिने सुरू होता. झालेल्या अत्याचारामुळे ती अल्पवयीन मुलगी गरोदरही होती. मात्र त्या तरूणांनी तिचा गर्भपातही केला. गेले कित्येक महिन्यापासून ती मुलगी हे सगळं सहन करत होती. अखेर काही दिवासंपूर्वी तिचा तो व्हिडीओ तिच्या कुटुंबियांसमोर आला आणि..

तळपायाची आग अक्षरश: डोक्यात जाईल असा एक भयानक गुन्हा कल्याणमध्ये घडल्याचे उघडकीस आले आहे. तरूणाने एका अल्पवयीन मुलीला भुलवून, तिच्याशी शारीरिक संबंध ठेवले. त्यानंतर त्याचा व्हिडीओ रेकॉर्ड करून त्या सहाय्याने तिला ब्लॅकमेल करत तिच्यावर वारंवार अत्याचार करण्यात आला, एवढंच नव्हे तर तो व्हिडीओ आपल्या मित्रांना पाठवला, आणि त्या मित्रांनीही त्याच व्हिडीओच्या सहाय्याने तिला पुन्हा ब्लॅकमेल करत त्या अल्पवयीन तरूणीवर सामूहिक अत्याचार केल्याचा भयानक प्रकार कल्याणमध्ये घडला आहे.
तब्बल 5 महिने सुरू असलेल्या या घृणास्पद प्रकारामुळे ती मुलगी गर्भवती राहिली, मात्र आरोपींनी तिला गर्भपात करण्यासही भाग पडल्याचे उघड झाले आहे. पीडित मुलीच्या कुटुंबियांसमोर नको तो व्हिडीओ आल्यावर हा सगळा प्रकार समोर आला आणि ते हादरलेच. मात्र आपल्या मुलीला न्याय मिळवून द्यायचा हा निर्धार करत तिच्या कुटुबियांनी पोलिसांत धाव घेतली. याप्रकरणी कल्यामधील महात्मा फुले पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपींविरोधात पॉस्को अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 7 आरोपींना अटक करण्यात आली असून आठवा अद्याप फरार आहे.
इन्स्टाग्रामवर मैत्री करत भुलवलं
मिळालेल्या मााहितीनुसार, पीडित मुलगी (वय 17) कल्याणच्या महात्मा फुले पोलिस स्टेशन हद्दीतील परिसरात, तिच्या आईसोबत राहते. तिचा एक नातेवाईक तरूणही त्याच भागात राहतो. काही महिन्यांपूर्वी त्या नातेवाईक तरूणाने पीडितेला इन्स्टाग्रामवर मेसेज केला, चॅटिंग केलं आणि विचारलं तुझ्याकडे बॉयफ्रेंड आहे का ? पीडितेने नकार दिल्यानंतर, तो म्हणाला मी तुला बॉयफ्रेंड मिळवून देतो. त्यानंतर त्या तरूणाने पीडितेची एका तरूणाशी ओळख करून दिली. त्या दोघांची मैत्री झाली, प्रेम जडलं, त्या तरूणाने पीडितेशी शरीरसंबंध ठेवले आणि त्याचा व्हिडीओही रेकॉर्ड केला.
त्याच व्हिडीओच्या आधारे त्याने तिला ब्लॅकमेल करत अनेकदा संबंध ठेवले. एवढंच नव्हे तर त्या नराधमाने तो व्हिडीओ त्याच्या इतर काही मित्रांना देखील पाठवला. त्या तरूणांनी पीडितेला सरळ कॉन्टॅक्ट करत त्या व्हिडीओबद्दल सांगत तिला धमकावलं आणि तिच्यावर सामूहिक अत्याचार केला.
गर्भपातही केला
हा किळसवाणा प्रकार तब्बल 5 महिने सुरू होता. झालेल्या अत्याचारामुळे ती अल्पवयीन मुलगी गरोदरही होती. मात्र त्या तरूणांनी तिचा गर्भपातही केला. गेले कित्येक महिन्यापासून ती मुलगी हे सगळं सहन करत होती. अखेर काही दिवासंपूर्वी तिचा तो व्हिडीओ तिच्या कुटुंबियांसमोर आला, ते पाहून त्यांना धक्काच बसला. त्यांनी पीडित मुलीकडे खोदून खोदून चौकशी केल्यावर अखेर तिने कसाबसा घडलेला प्रकार सांगितला. तिच्यासोबत जे घडलं ते ऐकून घरचेही हादरले.
याप्रकरणी त्यांनी कल्याणच्या महात्मा फुले पोलिस स्टेशनमध्ये धाव घेत तक्रार दाखल केली. त्याआधारो पोलिसांनी आरोपी मुलांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. आत्तापर्यंत 7 जणांना बेड्या ठोकण्यात आल्या आहत, मात्र एक आरोपी अद्यापही फरार आहे. यामुळे संपूर्ण कल्याण शहरात प्रचंड खळबळ माजली आहे.
