काळा कोट, पांढराशुभ्र शर्ट घालून ऐटीत प्रवाशांची तिकीट तपासणी, पोलिसांना संशय येताच भंबेरी उडाली, बोगस टीसीचा भंडाफोड

काळा कोट आणि पांढरा शर्ट, हाती पावती बूक घेऊन एक टीसी प्रवाशांची तिकीट तपासणी करत होता. त्याचे हावभाव पाहून पोलिसांना संशय आला (Kalyan Railway Police arrest bogus TC)

  • अमजद खान, टीव्ही 9 मराठी, कल्याण
  • Published On - 14:47 PM, 4 May 2021
काळा कोट, पांढराशुभ्र शर्ट घालून ऐटीत प्रवाशांची तिकीट तपासणी, पोलिसांना संशय येताच भंबेरी उडाली, बोगस टीसीचा भंडाफोड
काळा कोट, पांढराशुभ्र शर्ट घालून ऐटीत प्रवाशांची तिकीट तपासणी, पोलिसांना संशय येताच भंबेरी उडाली

कल्याण : कोरोना संकटात अनेकांच्या नोकऱ्या गेल्या. तरीही नागरीक प्रामाणिकपणे संकटाचा सामना करत आहेत. मात्र, एका व्यक्तीने लॉकडाऊन काळात एलआयसी एजंटचा व्यवसाय ठप्प झाला म्हणून थेट बोगस टीसी बनून लोकांना लुबाडण्याचा डाव आखला. मात्र, त्याचा हा डाव त्याला महागात पडला आहे. रेल्वे पोलिसांनी त्याला तातडीने ओळखले. त्यामुळे त्याचा आत्मविश्वास गेला. तो पकडला गेला. पोलिसांनी आरोपी अशरफ अली याला अटक केली आहे (Kalyan Railway Police arrest bogus TC).

नेमकं प्रकरण काय?

अशरफ अली याचा लॉकडाऊन काळात एलआयसी एजंटचा व्यवसाय ठप्प पडला होता. दोन दिवसांपूर्वीच या एजंटला इगतपुरी रेल्वे स्टेशनवर टीसीने विदाऊट तिकीट पकडले. यातूनच या एजंटला आयडीया सूचली. त्याने बोगस आयकार्ड पावती बूक तयार केले आणि तो खोटा टीसी बनला. मात्र, पहिल्या दिवशीच रेल्वे पोलीसांच्या तावडीत सापडला. अखेर अशरफ अली नावाचा या एलआयसी एजंटला रेल्वे पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. काही दिवसांपूर्वीच असाच एका बोगस टीसीला कल्याण जीआरपी पोलिसांनी अटक केली होती.

पोलिसांनी आरोपीला कसे पकडले?

कल्याण रेल्वे पोलीस ठाण्यात कार्यरत असलेले पोलीस कर्मचारी राजू आखोडे आणि त्यांचे काही सहकारी कल्याण रेल्वे स्टेशनवर गस्त घालत होते. यावेळी त्यांची नजर एका टीसीवर गेली. काळा कोट आणि पांढरा शर्ट, हाती पावती बूक घेऊन हा टीसी प्रवाशांची तिकीट तपासणी करत होता. त्याचे हावभाव पाहून पोलिसांना संशय आला. अखेर पोलिसांनी एका टीसीला पाचारण केले. त्या टीसीसोबत पोलिसांनी या व्यक्तिची विचारपूस सुरु केली. काही वेळात हे समोर आले की, हा बोगस टीसी आहे.

रेल्वे पोलिसांची प्रतिक्रिया

कल्याण रेल्वे पोलिसांनी या बोगस टीसीला ताब्यात घेतले. या प्रकरणी कल्याण रेल्वे पोलीस ठाण्याच्या महिला पोलीस निरिक्षक अर्चना दुसाणे यांनी प्रतिक्रिया दिली. “अशरफ अली असे या व्यक्तीचे नाव असून तो मुंबई येथील भांडूप येथे राहतो. अशरफ हा एलआयसी एजंट आहे. हा धंदा ठप्प पडल्याने तो आर्थिक विवंचेनेत होता. दोन दिवसापूर्वी तो काही कामानिमित्त जात असताना इगतपूरी स्टेशनला अशरफ अली एका टीसीने पकडले. त्याच्याकडे तिकीट नसल्याने त्याला दंड ठोठावला”, अशी माहिती त्यांनी दिली.

“या घटनेतून त्याला युक्ती सुचली. त्याने गुगलच्या सहाय्याने बोगस आयकार्ड तयार केला. त्याच्याकडे दंडात्मक कारवाई ज्या टीसीने पावती फाडली होती. त्याच पावतीच्या आधारे बोगस पावती पूस्तक तयार केले. टीसीचे कपडे परिधान करुन कल्याण स्थानकात पोहचला. पहिल्या दिवशीच त्याच्या या कृत्याचा पर्दाफाश झाला आणि तो पकडला गेला”, अशी अर्चना दुसाणे यांनी दिली (Kalyan Railway Police arrest bogus TC).

हेही वाचा : उन्हाळ्यात मुख्य दार उघडं ठेवून झोपताय? चोरांनी मोबाईल-टीव्हीसह घर धुवून नेलं