पालकांनो सावधान, तुम्हीही मुलाला गेम खेळण्यासाठी स्मार्टफोन देताय, कोल्हापुरातील घटना वाचून फुटेल घाम
कोल्हापूर जिल्ह्यातील राधानगरी तालुक्यातील एका शेतकऱ्याच्या सहावीत शिकणाऱ्या मुलाने मोबाईलवर 'फ्री फायर' गेम खेळताना त्याच्या बँक खात्यातील पाच लाख रुपये ऑनलाइन गेममध्ये खर्च केले. हा पैसा शेतकऱ्याने म्हशींचा गोठा वाढवण्यासाठी जमा केला होता.

कोल्हापूर जिल्ह्यातील राधानगरी तालुक्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेमुळे पालकांना विचार करायला लागला आहे. म्हशींचा गोठा वाढवण्यासाठी एका शेतकऱ्याने जीवापाड कष्ट करून तब्बल पाच लाख रुपये बँकेत साठवले. पण त्याच्याच सहावीत शिकणाऱ्या मुलाने मोबाईलवर ‘फ्री फायर’ गेम खेळताना ते उडवून टाकल्याची घटना समोर आली आहे.
नेमकं प्रकरण काय?
कोल्हापुरातील राधानगरी तालुक्यातील हा शेतकरी आणि त्याची पत्नी, दोघेही काबाडकष्ट करून आपला म्हशींचा गोठा वाढवण्याचा प्रयत्न करत होते. यासाठी त्यांनी बँकेत थोडे थोडे करून सात लाख रुपये जमा केले होते. त्यांना हरियाणामधून चार म्हशी विकत घ्यायच्या होत्या. यामुळे त्यांचा व्यवसाय आणखी वाढेल आणि नफा होईल, असे त्यांनी ठरवले होते. यानुसार, मे महिन्यात ते बँकेत जमा झालेल्या पैशांची चौकशी करण्यासाठी गेले. त्यावेळी त्यांना मोठा धक्का बसला.
त्यांच्या खात्यात फक्त दोन लाख रुपये शिल्लक होते. या बँकेचे स्टेटमेंट काढल्यावर त्यांना ऑनलाईन पद्धतीने पैसे काढले गेल्याचे लक्षात आले. यानंतर बँकेने याबाबत असमर्थता दर्शवत पोलिसांकडे जाण्याचा सल्ला दिला. यानंतर हताश झालेल्या शेतकऱ्याने सायबर पोलीस ठाणे गाठले. पोलिसांनी तात्काळ तपास सुरू केला.
धक्कादायक सत्य कसं आलं समोर
पोलिसांनी सुरुवातीला शेतकऱ्यांच्या मोबाईलमधील मेसेज तपासले असता, त्यात एकही व्यवहार दिसत नव्हता. त्यानंतर पोलिसांनी बँकेच्या स्टेटमेंटमधील ट्रान्झेक्शन आयडीच्या आधारे तपास केला. तेव्हा धक्कादायक सत्य समोर आले. त्यांच्या बँकेतून गेलेली रक्कम ‘फ्री फायर’ गेममधील आभासी शस्त्रे (व्हर्च्युअल वेपन्स) खरेदी करण्यासाठी वापरली गेली होती. त्यानंतर पोलिसांना हा सर्व प्रकार लक्षात आला.
मात्र या घटनेमुळे बँक खात्याशी जोडलेला मोबाईल नंबर लहान मुलांच्या हातात दिल्यास त्याचे काय गंभीर परिणाम होऊ शकतात, याचा धडा पालकांना मिळाला. मुलांच्या हातात स्मार्टफोन देताना पालकांनी अधिक सावधगिरी बाळगणे किती महत्त्वाचे आहे, हे देखील या घटनेतून अधोरेखित होतं आहे.
