दुर्मीळ मगरीच्या सात जिवंत पिल्लांची तस्करी, ठाण्यात आरोपीला अटक

गणेश थोरात

| Edited By: |

Updated on: Jul 13, 2021 | 3:21 PM

पोलिसांनी 10 जुलै रोजी रात्री साडेअकरा वाजताच्या सुमारास मुंब्रा बायपास येथील रेतीबंदर ब्रिजखाली सापळा लावला. यावेळी एक व्यक्ती प्लास्टिक बॅग घेऊन संशयास्पदरित्या घटनास्थळी आढळून आला.

दुर्मीळ मगरीच्या सात जिवंत पिल्लांची तस्करी, ठाण्यात आरोपीला अटक
ठाण्यात दुर्मीळ मगरीच्या सात पिल्लांची सुटका

ठाणे : मगरीच्या जिवंत पिल्लांची तस्करी करणाऱ्या आरोपीला ठाणे खंडणी विरोधी पथकाने अटक केली. साकलेन सिराजुद्दीन खातीब असे अटक करण्यात आलेल्या तस्कराचे नाव आहे. तो ठाणे जिल्ह्यातील मुंब्रा भागातील रहिवासी आहे. त्याच्या ताब्यातून क्रोकोडियस पॅलेस्ट्रीयस (Crocodylus Palustris) जातीचे दुर्मिळ अशी मगरीची सात जिवंत पिल्लं हस्तगत करण्यात आली आहेत. या प्रकरणी मुंब्रा पोलीस ठाण्यात वन्यजीव संरक्षण कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मगरीच्या पिल्लांची विक्री करण्यासाठी एक जण मुंब्रा भागात येणार असल्याची माहिती ठाणे खंडणी विरोधी पथकास मिळाली होती. मिळालेल्या माहितीनुसार पोलिसांनी 10 जुलै रोजी रात्री साडेअकरा वाजताच्या सुमारास मुंब्रा बायपास येथील रेतीबंदर ब्रिजखाली सापळा लावला. यावेळी एक व्यक्ती प्लास्टिक बॅग घेऊन संशयास्पदरित्या घटनास्थळी आढळून आला.

पिंजऱ्यासारखी प्लॅस्टिक बॅग

पोलिसांनी ताब्यात घेऊन त्याची तपासणी केली असता त्याच्या जवळील बॅगेत तब्बल 7 जिवंत मगरीची पिल्ले आढळून आली. या पिल्लांना ठेवण्यासाठी तस्कराने खास पिंजऱ्यासारखी प्लॅस्टिक बॅग बनवली होती. ही सर्व मगरीची क्रोकोडियस पॅलेस्ट्रीयस या दुर्मिळ जातीची पिल्ले होती.

एकूण किंमत 2 लाख 80 हजार रुपये

पोलिसांनी या पिल्लांची सुटका करून त्यांना वन विभाग अधिकाऱ्यांच्या ताब्यात दिले आहे. अटक करण्यात आलेल्या आरोपीने ही पिल्ले प्रत्येकी 40 हजार रुपये किमतीत विक्रीसाठी आणली होती, अशी माहिती पोलिसांनी दिली. या मगर जातीच्या पिल्लांची एकूण किंमत 2 लाख 80 हजार रुपये इतकी आहे. अटकेतील आरोपीला न्यायालयात हजर केले असता त्याला 15 जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. आरोपीने ही मगरीची दुर्मिळ पिल्ले कोठून आणली आणि तो त्यांची कोणाला विक्री करणार होता याचा तपास ठाणे खंडणी विरोधी पथक करत आहे.

संबंधित बातम्या :

Video | मानवी वस्तीत मगर शिरल्याने एकच खळबळ, व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल

(Crocodylus Palustris Rare Crocodiles Smuggling Accuse arrested by Thane Anti Extortion Cell)

Non Stop LIVE Update

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI