महाविद्यालयीन तरुणावर अनैसर्गिक अत्याचार, व्हिडीओ शूट करुन धमकी, सांगलीत पोलिसावर गुन्हा

हवालदाराने तरुणाला त्याच्या वसतीगृहातील रुमवर नेले. रुमवर असलेल्या मित्राला दुसऱ्या रुममध्ये जाण्यास सांगितले. तिथे पोलिसाने त्या तरुणाशी अनैसर्गिक संबंध ठेवले आणि त्याची व्हिडीओ क्लिप तयार करुन तो तेथून निघून गेला.

महाविद्यालयीन तरुणावर अनैसर्गिक अत्याचार, व्हिडीओ शूट करुन धमकी, सांगलीत पोलिसावर गुन्हा
प्रातिनिधीक फोटो

सांगली : महाविद्यालयीन युवकासोबत अनैसर्गिक संबंध ठेवत, त्याची क्लिप व्हायरल करण्याची धमकी देत खंडणी वसूल केल्याची धक्कादायक घटना सांगलीत उघडकीस आली आहे. या प्रकरणी इस्लामपूर पोलीस ठाण्याचा हवालदार हणमंत कृष्णा देवकर याच्यावर इस्लामपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असल्याची माहिती उपविभागीय पोलीस अधिकारी कृष्णात पिंगळे यांनी पत्रकार परिषदेत दिली.

काय आहे प्रकरण?

27 ऑक्टोबरला पहाटे तीन वाजताच्या सुमारास हणमंत देवकर आणि एक कर्मचारी इस्लामपूर येथील एका रस्त्यावर पेट्रोलिंग करत होते. त्यावेळी एक महाविद्यालयीन युवक आपल्या मैत्रिणीला भेटून पुन्हा वसतिगृहात जात होता. त्यावेळी तिथे उपस्थित असलेल्या पोलिस कर्मचाऱ्यांनी त्याला अडवले.

‘आता कोठून आलास? इथे काय करतोयस?’ अशी त्याच्याकडे विचारणा केली. संबंधित युवकाने मी मैत्रिणीला भेटून येत आहे असे सांगितले. पोलिसांनी त्या युवकाकडून त्याचा फोन नंबर घेतला. 29 ऑक्टोबरला महाविद्यालयाच्या गेटजवळ येत हणमंत देवकर याने त्या युवकाला फोन करुन भेटायला येण्यास सांगितले.

प्रेम प्रकरण घरी सांगण्याची धमकी

सकाळी सव्वा अकरा वाजताच्या सुमारास संबंधित युवक पोलिसांना भेटला. त्याच्याकडे पैशाची मागणी करत पैसे न दिल्यास प्रेम प्रकरण त्याच्या आणि मैत्रिणीच्या घरी सांगेन अशी धमकी दिली. त्यावर युवकाने आपल्या मित्रांच्या कडून चार हजार रुपये उसने घेऊन हणमंत देवकर याला दिले.

आधी मैत्रिणीशी शरीरसंबंधांची मागणी

तेवढ्यावर न थांबता देवकर याने तरुणाला तुझ्या मैत्रिणीचा मोबाईल नंबर दे, तिला माझ्याबरोबर शारिरीक संबंध ठेवायला सांग, असे सांगितले. संबंधित तरुणाने ती मुलगी चांगल्या घरातील आहे. असे सांगून तसे करण्यास स्पष्ट नकार दिला. त्यावर देवकरने तू तसं न केल्यास तुझ्याबरोबर शारिरीक संबंध ठेवेन, अशी धमकी दिली.

हॉस्टेलमधील रुमवर अनैसर्गिक अत्याचार

पोलिसाच्या पवित्र्याने संबंधित तरुण घाबरला. देवकरने त्याला त्याच्या वसतीगृहातील रुमवर नेले. रुमवर असलेल्या मित्राला दुसऱ्या रुममध्ये जाण्यास सांगितले. तिथे देवकरने त्या तरुणाशी अनैसर्गिक संबंध ठेवले आणि त्याची व्हिडीओ क्लिप तयार करुन तो तेथून निघून गेला.

क्लिप व्हायरल करण्याची धमकी

21 नोव्हेंबरला दुपारी साडे बारा वाजताच्या सुमारास हवालदार देवकर याने पुन्हा त्या युवकास मोबाईलवर फोन करुन महाविद्यालयाच्या गेटवर बोलावून घेतले आणि शारिरीक संबंध ठेवण्याची मागणी केली. तसे न केल्यास मोबाईलमधील क्लिप दाखवून ती व्हायरल करण्याची धमकी दिली.

पोलिसावर गुन्हा दाखल

संबंधित तरुणाने हा प्रकार आपल्या मित्रांना सांगून हवालदार देवकर याच्या विरोधात इस्लामपूर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. पोलिसांनी तात्काळ हवालदार देवकर याला अटक केली. हवालदार देवकर याच्यावर अनैसर्गिक संबंध ठेवणे, खंडणी, अश्लील क्लिप व्हायरल करणे, धमकावणे असे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. त्याला जास्तीत जास्त शिक्षा व्हावी यासाठी पाठपुरावा करणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.

संबंधित बातम्या :

पुण्यात ‘फुकट बिर्याणी न दिल्याच्या रागातून हॉटेल मॅनेजरवर केला कोयत्यानं हल्ला

महिलेचा छतावरुन पडून मृत्यू झाल्याचा बनाव, चार वर्षांच्या मुलांनी सांगितलं बाबांनीच आईला ढकललं

‘मुलगी कमावते, तू आरामात बसून खातोस?’ बापाने लेकीचं कुंकू पुसलं, पाय कापून जावयाची हत्या

Published On - 2:23 pm, Mon, 22 November 21

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI