शिवसेना आमदार प्रदीप जैस्वाल यांची अटक टळली, पोलीस स्टेशन तोडफोड प्रकरणात जामीन

औरंगाबादच्या सत्र न्यायालयाने शिवसेना आमदार प्रदीप जैस्वाल यांना सहा महिन्यांची शिक्षा ठोठावली होती. त्यामुळे प्रदीप जैस्वाल यांच्यावर अटकेची टांगती तलवार होती.

शिवसेना आमदार प्रदीप जैस्वाल यांची अटक टळली, पोलीस स्टेशन तोडफोड प्रकरणात जामीन
pradeep jaiswal

औरंगाबाद : शिवसेना आमदार प्रदीप जैस्वाल (Pradeep Jaiswal) यांना मोठा दिलासा मिळाला आहे. औरंगाबादच्या क्रांती चौक पोलीस ठाण्यात तोडफोड केल्याप्रकरणी जैस्वाल यांना सहा महिन्यांची शिक्षा सुनावण्यात आली होती. मात्र उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने जैस्वालांना जामीन मंजूर केला आहे. (Shivsena MLA Pradeep Jaiswal gets bail in 2018 Aurangabad riot case)

औरंगाबादच्या सत्र न्यायालयाने प्रदीप जैस्वाल यांना सहा महिन्यांची शिक्षा ठोठावली होती. त्यामुळे प्रदीप जैस्वाल यांच्यावर अटकेची टांगती तलवार होती. परंतु औरंगाबाद खंडपीठाने जमीन मंजूर केल्यानंतर प्रदीप जैस्वाल यांना दिलासा मिळाला आहे. प्रदीप जैस्वाल हे शिवसेनेकडून औरंगाबाद मध्य विधानसभा मतदारसंघातून आमदार आहेत.

काय आहे प्रकरण?

औरंगाबाद शहरात 20 मे 2018 रोजी दंगल उसळली होती. या दंगलीमुळे औरंगाबाद शहरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. यावेळी एकमेकांच्या विरोधात उभे असलेल्या दोन गटांनी शहरातील अनेक दुकानांची तोडफोड तसेच जाळपोळ केली होती. यामध्ये व्यापारी तसेच दुकानदारांचे लाखोंचे नुकसान झाले होते. या प्रकरणाशी संबंधित औरंगाबाद पोलिसांनी दोन कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले होते.

खुर्च्यांची तोडफोड, पोलिसांना शिवीगाळ

ताब्यात घेतलेल्या कार्यकर्त्यांना सोडण्याची मागणी यावेळी आमदार प्रदीप जैस्वाल यांनी केली होती. त्यांनी शहरातील क्रांतीचौक पोलीस ठाण्यात जाऊन खुर्च्या तसेच काचांची तोडफोड केल्याचाही आरोप आहे. तसेच पोलिसांना शिवीगाळसुद्धा केल्याचाही दावा केला गेला.

या प्रकरणी पोलीस हवालदार चंद्रकांत पोटे यांनी फिर्याद दिली होती. त्यानंतर जैस्वाल यांच्यावरील आरोपांची चौकशी करण्यात आली. 31 मे 2021 रीजी, म्हणजे तब्बल तीन वर्षानंतर जैस्वाल यांना सहा महिन्यांची शिक्षा ठोठावण्यात आली होती.

संबंधित बातम्या :

‘लोकपत्र’चे संपादक रवींद्र तहकीक हल्ला प्रकरण, पाच जणांवर गुन्हा, मुख्य आरोपी पोलिसात शरण

2018 दंगल प्रकरण, शिवसेनेचे आमदार प्रदीप जैस्वाल यांना 6 महिन्यांची शिक्षा

(Shivsena MLA Pradeep Jaiswal gets bail in 2018 Aurangabad riot case)

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI