Mumbai Crime : पत्नीसोबत वेळ घालवता येत नव्हता, सावत्र पित्याने 4 वर्षांच्या लेकीसोबत जे केलं…
ती मुलगी बेपत्ता झाल्यापासून तिचा सावत्र पिता असलेला इमरान शेख हाही बेपत्ता झाल्याने पोलिसांचा त्याच्यावरचा संशय बळावला. अखेर पोलिसांनी कसून तपास करत इमरानला शोधून काढलं आणि..

पिता, वडील, बाप… प्रत्येक मुला-मुलीचा आधार ठरणारा हा शब्द, पित्याचा हात डोक्यावर असला की काही काळजी वाटत नाही, उलट कठीण परिस्थितीमध्येही धीर येतो. आईप्रमाणेच वडीलही आपल्या आयुष्यात मोठा, महत्वाचा वाटा बजावतात, पण हेच वडील आपल्या मुलांसाठी काळ ठरले तर. काही दिवसांपूर्वीच गुडगावमधील होतकरू, प्रसिद्ध टेनिसपटू राधिक यादव हिची तिच्या वडीलांनी गोळ्या झाडून निर्घृण हत्या केली. या घटनेमुळे संपूर्ण देश हादरला असून एखादा पिता आपल्याच मुलीला कसा मारू शकतो असा प्रश्न अनेकांच्या मनात घोळत आहे. मात्र आता यापेक्षाही अधिकच भयानक घटना मुंबईत घडली असून ती ऐकून कोणाच्याही काळजाचा थरकाप उडेल.
मुंबईतील अँटॉप हिल येथून पितृत्वाला काळिमा फासणारी अतिशय भयानक घटना उघडकीस आली आहे. आपल्या पत्नीसोबत वेळ घालवण्यात अडचण येत असल्याने तेथे एका इसमाने त्याच्या अवघ्या 4 वर्षांच्या सावत्र मुलीची हत्या केल्याचा हादरवणारा प्रकार घडला आहे. चार वर्षांची ती चिमुरडी मुलगी रात्री उशीरापर्यंत मोबाईलवर खेळत असल्याच्या रागातूनच आरोपी इमरान शेखने हे भयानक कृत्य केले. या नृशंस कृत्यामुळे प्रचंड खळबळ माजली असून परिसरातील नागरिकांमध्येही तदहशतीचे वातावरण आहे. अँटॉप हिल पोलिसांनी वरळी येथून आरोपी इमरान शेखला बेड्या ठोकून अटक केली आहे.
गळा आवळून केली हत्या, मृतदेह समुद्रात फेकला
मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी इमरान, त्याची पत्नी आणि 4 वर्षांच्या मुलीसोबत रहात होता. मात्र ती चिमुरडी मुलगी रोज रात्री उशिरापर्यंत मोबाईलवर खेळत असायची. त्यामुळे इमरानला त्याच्या पत्नीसोबत वेळ घालवता यायचा नाही, याचाच त्याच्या मनात राग होता. आणि त्याच रागातून हे भयानक हत्याकांड घडलं. इमरानने त्या अवघ्या 4 वर्षांच्या मुलीची गळा आवळून क्रूरपणे हत्या केली. मात्र हाँ गुन्हा उघडकीस येऊ नये, कोणालाही कळू नये म्हणून त्याने त्या मुलीचा मृतदेह हा कुलाबा येथूल समुद्राच्या पाण्यात फेकून दिला.
पण दुसऱ्या दिवशी सकाळी ससून डॉक जवळ चिमुरडीचा मृतदेह सापडल्याने खळबळ माजली. पोलिसांनी याप्रकरणी तपास हाती घेत शोध सुरू केला असता त्यांना संशय आला. कारण ती मुलगी बेपत्ता झाल्यापासून तिचा सावत्र पिता असलेला इमरान शेख हाही बेपत्ता झाल्याने पोलिसांचा त्याच्यावरचा संशय बळावला. अखेर पोलिसांनी कसून तपास करत इमरानला शोधून काढलं आणि खडसावून त्याची चौकशी केली असता, त्याने गुन्हा कबूल केला. अखेर अँटॉप हिल पोलिसांनी त्याला वरळी येथून अटक करत बेड्या ठोकल्या असून पुढील तपास सुरू आहे.
