Wardha Crime | संपत्तीच्या हव्यासातून आईचा शेतात खून, बाप-लेकाला आजन्म कारावास

माया गोडघाटे यांना वडिलोपार्जित शेतीतून मिळालेल्या पैशाची पती भीमराव गोडघाटे आणि मुलगा अमीर गोडघाटे (रा. खैरी कामठी) सातत्याने मागणी करीत होते. यातूनच तिला मारहाणही केली जायची.

Wardha Crime | संपत्तीच्या हव्यासातून आईचा शेतात खून, बाप-लेकाला आजन्म कारावास
वर्धा जिल्हा व सत्र न्यायालय
Image Credit source: टीव्ही9
चेतन व्यास

| Edited By: अनिश बेंद्रे

Mar 25, 2022 | 9:24 AM

वर्धा : पैशांसाठी आईचा जाळून खून केल्याप्रकरणी (Mother Murder) वर्ध्यात (Wardha Crime) बापासह मुलाला (Father Son) आजन्म कारावासाची शिक्षा सुनावण्यात आली आहे. माया गोडघाटे यांचे दोन्ही हात-पाय दोरीने बांधून त्यांच्या तोंडात कापडाचा गोळा कोंबण्यात आला होता. त्यानंतर घरालगत असलेल्या शेतात नेऊन त्यांना जिवंत जाळण्यात आले होते. आईच्या हत्येप्रकरणी बापलेकास आजन्म कारावासाची शिक्षा सुनावण्यात आली आहे. याशिवाय 25 हजार रुपये दंड, आणि दंड न भरल्यास एक वर्ष सश्रम कारावास तसेच कलम 201 भादंविनुसार 7 वर्षे सश्रम कारावास आणि 10 हजार रुपये दंड, तसंच दंड न भरल्यास 6 महिने सश्रम कारावासाची शिक्षा ठोठावण्यात आली. जिल्हा आणि अतिरिक्त सत्र न्यायाधीश मोनिका आरलैंड यांनी हा निकाल दिला.

काय आहे प्रकरण?

माया गोडघाटे यांना वडिलोपार्जित शेतीतून मिळालेल्या पैशाची पती भीमराव गोडघाटे आणि मुलगा अमीर गोडघाटे (रा. खैरी कामठी) सातत्याने मागणी करीत होते. यातूनच तिला मारहाणही केली जायची. या प्रकरणी माया यांनी खरांगणा पोलिसांत तक्रारही दाखल केली होती.

नेमकं काय घडलं?

याच कारणावरुन आरोपी बापलेकाने संगनमत करुन आईचे दोन्ही हात-पाय दोरीने बांधले. त्यानंतर तोंडात कापडाचा बोळा कोंबून घरालगत असलेल्या प्रशांत खेडकर यांच्या शेतात नेले. तिथे माया गोडघाटेंना जिवंत पेटवून देत त्यांचा खून करण्यात आला होता. माया 93 टक्के जळाल्याने मृत्युमुखी पडल्या होत्या. यानंतर आरोपी भीमरावने माया यांनी आत्महत्या केल्याता बनाव रचून तक्रार दाखल केली होती.

खरांगणा पोलिसांत तक्रार दाखल केल्यामुळे आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. चौकशीअंती प्रकरण न्यायप्रविष्ट करण्यात आले. वर्धा येथील जिल्हा आणि अतिरिक्त सत्र न्यायाधीश मोनिका आरलैंड यांच्या न्यायालयात सरकार पक्षाच्या बाजूने वीस साक्षीदार तपासण्यात आले. या प्रकरणात प्रत्यक्षदर्शी साक्षीदार फितुर झाले तरी सरकार पक्षाने दिलेला पुरावा आणि केलेला युक्तीवाद ग्राह्य धरून जिल्हा आणि अतिरिक्त सत्र न्यायाधीश आरलैंड यांनी आरोपी भीमराव विठोबाजी गोडघाटे आणि अमीर भीमराव गोडघाटे या दोघांना शिक्षा सुनावली.

या प्रकरणात सरकार पक्षाच्या बाजूने अतिरिक्त सरकारी अभियोक्ता रत्ना घाटे यांनी साक्षीदारांचे जबाब आणि युक्तिवाद केला. पोलीस निरीक्षक प्रशांत पांडे यांनी प्रकरणाचा तपास केला. पैरवी अधिकारी किशोर आप्तुरकर यांनी साक्षीदारांना न्यायालयात हजर केले.

आईच्या हत्ये प्रकरणी बापलेकास आजन्म कारावासाची शिक्षा सुनावण्यात आली आहे. याशिवाय 25 हजार रुपये दंड, आणि दंड न भरल्यास एक वर्ष सश्रम कारावास तसेच कलम 201 भादंविनुसार 7 वर्षे सश्रम कारावास आणि 10 हजार रुपये दंड, तसंच दंड न भरल्यास 6 महिने सश्रम कारावासाची शिक्षा ठोठावण्यात आली.

संबंधित बातम्या :

तीन आठवड्यांपासून बेपत्ता, पालघरमध्ये इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्याचा कुजलेला मृतदेह सापडला

लंडनमध्ये भारतीय वंशाच्या तरुणीची हत्या, 22 वर्षीय बॉयफ्रेण्डला अटक

बारावीची परीक्षा द्यायला जेलबाहेर आला आणि रोहन नाईकचा खून केला!

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें