लॉजचं दार वाजवलं, बाळ बोठेने उघडताच म्हटलं, मी पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव, गडबड करायची नाही, वाचा थरार

बाळ बोठेला पकडताना कसा एखाद्या चित्रपटाप्रमाणे थरार रंगला होता, याचा अनुभव स्वतः टीम प्रमुखांनी सांगितला (Chandrashekhar Yadav Bal Bothe)

  • कुणाल जायकर, टीव्ही 9 मराठी, अहमदनगर
  • Published On - 12:05 PM, 15 Mar 2021
लॉजचं दार वाजवलं, बाळ बोठेने उघडताच म्हटलं, मी पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव, गडबड करायची नाही, वाचा थरार
आरोपी बाळ बोठे (डावीकडे), पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव

अहमदनगर : यशस्विनी महिला ब्रिगेडच्या अध्यक्षा रेखा जरे हत्याप्रकरणी (Rekha Jare Murder Case) फरार असलेला मुख्य आरोपी बाळ बोठेला (Bal Bothe) अटक करणाऱ्या पोलिसांचा अहमदनगरमध्ये सत्कार करण्यात आला. पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांनी प्रशस्तीपत्र देऊन पोलीस अधिकारी आणि टीमचं अभिनंदन केलं. पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव, पोलीस निरीक्षक संभाजी गायकवाड तसेच पोलीस निरीक्षक राजेंद्र सानप यांच्या विशेष टीमने ही कामगिरी केली. यावेळी बाळ बोठेला नेमकं कसं पकडलं, या मिशनमध्ये किती आणि कशा अडचणी आल्या, बोठे पोलिसांना कसा चकवा द्यायचा, बाळ बोठेला पकडताना कसा एखाद्या चित्रपटाप्रमाणे थरार रंगला होता, याचा अनुभव स्वतः टीम प्रमुखांनी सांगितला. (Rekha Jare Murder Case PI Chandrashekhar Yadav tells how Main Accuse Mastermind Bal Bothe found in Hyderabad)

सामाजिक कार्यकर्त्या रेखा जरे यांच्या हत्या प्रकरणातील मुख्य सूत्रधार बाळ बोठे (Bal Bothe) याला पोलिसांनी शनिवारी पहाटे अटक केली. बाळ बोठे साडेतीन महिने पोलिसांना गुंगारा देत होता. रेखा जरे यांची गाडी अहमदनगर जवळील जातेगावच्या घाटात अडवून 30 नोव्हेंबर रोजी धारदार शस्त्राने हत्या करण्यात आली होती.

वरिष्ठ पोलिसांकडून कमालीची गुप्तता

सुरुवातीला सहा जणांचं पथक रवाना झाल्याचं पोलीस निरीक्षक राजेंद्र सानप यांनी सांगितलं. “अहमदनगरहून आधी सोलापूर आणि मग आम्ही हैदराबादला गेलो. हळूहळू माहिती मिळत गेली. आपण कोणतं काम करायला निघालो आहोत, हे आम्हाला नंतर समजलं, इतकी गोपनीयता बाळगण्यात आली होती. तिथे पोहोचल्यावर एक दिवस प्लॅन वर्कआऊट केला” असं सानपांनी सांगितलं.

आणि एक चूक झाली…

“झोपडपट्टीतील दोन आरोपी बाळ बोठेला मदत करत होते. ते दोघे रेकॉर्डवरील गुन्हेगार होते. हैदराबाद पोलीसही त्या दोघांना शोधत होते. आधी त्या दोघांना ताब्यात घेतलं. बाळ बोठे कोणाच्या आश्रयाला हे समजलं, त्यानंतर प्लॅन तयार केला. आमची एकच चूक झाली, आणि आम्ही पोहोचणार तोच पाच मिनिटाआधी बाळ बोठे फरार झाला. तो एरिआ आम्हाला नवीन होता, त्यामुळे गडबड झाली” असं सानप म्हणाले.

“आम्ही दुसऱ्या तयारीला लागलो. तो जिथे राहत होता, तो भाग सील केला. एसपींनी पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव सरांची टीम रवाना केली. गायकवाड यांची टीम आली. प्रत्येक तासाने लोकेशन चेक केलं जात होतं. वरिष्ठ रात्रंदिवस बाळ बोठेचा ठावठिकाणा शोधत होते. महिला वकील त्याला मदत करत होती” असंही सानप यांनी सांगितलं.

बाळ बोठेला पहिल्यांदा बेड्या ठोकणाऱ्या पोलिसाचा अनुभव

पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांनी बाळ बोठेला सर्वप्रथम अटक केली. “आरोपीला समजलं होतं की पोलीस मागावर आहेत. बाळ बोठेला मदत करणाऱ्या वकिलाच्या नातेवाईकांना पोलीस स्टेशनला बोलावलं. त्यामुळे वकील येताच त्याला अटक केली. बाळ बोठेचे ठिकाणे समजले. हैदराबादपासून तो वीस किमी अंतरावर असल्याचं समजलं. तो दाटीवाटीचा परिसर होता. चार कर्मचाऱ्यांच्या दोन टीम करुन पेईंग गेस्ट रुम चेक केल्या” असं पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांनी सांगितलं. (Rekha Jare Murder Case PI Chandrashekhar Yadav tells how Main Accuse Mastermind Bal Bothe found in Hyderabad)

लॉजच्या रजिस्टरवर बाळ बोठेचं नाव

“आम्हाला संशय असलेला लॉज पाहिला. तिथे रजिस्टरमध्ये बाळ बोठेचं नाव सापडलं. आम्ही खुश झालो. पण तितक्यात रुमची चावी तिथेच दिसली. त्यामुळे हा रुमला लॉक करुन बाहेर गेला की काय, असा संशय आम्हाला आला. पण बाळ बोठे हा एक पाऊल पुढे असलेला आरोपी आहे. तो एका रुमला लॉक लावून दुसऱ्या रुममध्ये लपून बसला होता.” असं यादवांनी सांगितलं.

“आम्हाला खात्री पटताच आधी गेट लॉक केला. कर्मचाऱ्याने बाळ बोठेचा दरवाजा वाजवला. पाच सेकंदात त्याने दरवाजा उघडला, मी पटकन आत शिरुन म्हटलं, मी पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव, अहमदनगरहून आलोय… काही गडबड करायची नाही. त्यानंतर एसपींनी त्याच्याशी फोनवर बातचित केली आणि का पळतोयस, असं विचारलं. त्यानंतर बाकीचे पोलीस कर्मचारीही घटनास्थळी आले” अशी माहिती पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांनी दिली.

VIDEO | बाळ बोठेला पकडणाऱ्या टीमच्या तोंडून ऐका थरार

संबंधित बातम्या :

कॅमेरा, लेखणी ते चाकू, रेखा जरे हत्याकांडातील बाळ बोठे जातेगावच्या घाटात व्हिलन कसा झाला?

रेखा जरे हत्या प्रकरणाचा सूत्रधार सापडला, बाळ बोठेला हैदराबादमध्ये बेड्या

साडेतीन महिने पोलिसांना गुंगारा, ‘त्या’ तिघांनी तोंड उघडलं नि बाळ बोठे हैदराबादमध्ये सापडला

(Rekha Jare Murder Case PI Chandrashekhar Yadav tells how Main Accuse Mastermind Bal Bothe found in Hyderabad)