तीन महिन्यांपूर्वी दुसरा विवाह, 28 वर्षीय महिलेची दुसऱ्या पतीकडून हत्या

सोलापूर जिल्ह्यातल्या बार्शीत राहणाऱ्या रुकसार अलीम मुलाणी या 28 वर्षीय महिलेची दुसरा पती रिहानने हत्या केली (Lady killed by Second Husband)

  • रोहित पाटील, टीव्ही 9 मराठी, सोलापूर
  • Published On - 11:07 AM, 11 Apr 2021
तीन महिन्यांपूर्वी दुसरा विवाह, 28 वर्षीय महिलेची दुसऱ्या पतीकडून हत्या
सोलापुरात महिलेची दुसऱ्या पतीकडून हत्या

सोलापूर : सोलापुरात राहणाऱ्या 28 वर्षीय महिलेची दुसऱ्या पतीने हत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. पहिल्या पतीच्या दारुच्या व्यसनाला कंटाळून महिलेने दुसरा विवाह केला होता. मात्र क्षुल्लक वादातून दुसऱ्या पतीने तिला जीवे मारल्याचं समोर आलं आहे.  सोलापूर जिल्ह्यातल्या बार्शी येथील उपळाई रोड येथे राहणाऱ्या रुकसार अलीम मुलाणी या 28 वर्षीय महिलेची रिहान उर्फ ख्वाजा मुलाणी याने हत्या केली. आरोपी मुलाणी सध्या फरार आहे. (Solapur Lady killed by Second Husband)

पहिल्या नवऱ्याच्या व्यसनाधीनतेमुळे माहेरी

रुकसार मुलाणी हिचे दहा वर्षांपुर्वी बारंगुळे प्लॉट येथील अलीम नजीर मुलाणी याच्यासोबत लग्न झाले होते. त्याच्यापासून रुकसारला अब्बास मुलाणी (10 वर्षे) आणि उमेरा मुलाणी (8 वर्षे) अशी दोन मुलं झाली. फिर्यादीप्रमाणे पहिला पती अलीम मुलाणी हा कामधंदा न करता दारुचे व्यसन करत होता. त्याचप्रमाणे पत्नी रुकसारवरही संशय घेत होता. त्यामुळे ती माहेरी राहायला आली होती.

तीन महिन्यांपूर्वी रिहानशी प्रेमसंबंध

तीन महिन्यांपूर्वी रुकसार सांगोला येथे हॉटेलमध्ये धुणे-भांड्याचे काम करण्यासाठी गेली होती. त्यावेळी तिचे रिहानशी प्रेमसंबंध जुळले. रिहानने ट्रक ड्रायव्हर असल्याचे सांगून दोन्ही मुलांना संभाळायला तयार असल्याचे सांगितले. त्यानंतर ते दोघेही लग्न करुन बार्शीतील शंभर फूटी रोड उपळाई रोड येथे राहण्यासाठी आले.

संशयातून पती-पत्नीत वाद

दोन्ही मुलांना महाबळेश्वर येथील मदरशामध्ये टाकण्यात आले. 8 एप्रिल रोजी सकाळी 11 वाजता जेवणाच्या कारणावरुन पती-पत्नीमध्ये वाद झाले. त्यावेळी रुकसारने आपल्या आईला रिहान हा फोन वापरु देत नाही आणि संशय घेत असल्याचे सांगितले. त्यानंतर आई वाद मिटवून त्यांच्या गाडेगाव रोड येथील घरी गेली.

दुसऱ्या पतीकडून महिलेची हत्या

दुसऱ्या दिवशी, 9 एप्रिल रोजी सायंकाळी 7.30 वाजता आई मुलगी रुकसारकडे गेली. त्यावेळी बाहेरुन दाराला कडी लावल्याचे दिसले. कडी उघडून आत गेल्यानंतर किचनमध्ये त्यांना आपली मुलगी पडलेली दिसली. तिच्या नाका तोंडातून रक्त येत होते. शरीराची काहीच हालचाल होत नव्हती. (Solapur Lady killed by Second Husband)

आईने नातेवाईकांना बोलवून घेऊन सरकारी दवाखान्यात नेले. त्यावेळी रुकसार ही मृत असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. त्यानंतर आईने रिहान उर्फ ख्वाजा मुलाणी याच्याविरुद्ध मुलीच्या हत्येची तक्रार दिली. आरोपी मुलाणी सध्या फरार आहे.

संबंधित बातम्या :

तीन कोटींच्या विम्याची हाव, महिलेने पतीला कारमध्ये जिवंत जाळलं

संशयाची सुई, त्यानं बायकोवर भर रस्त्यात चाकुचे सपासप वार केले, लोक काय करत होते?

(Solapur Lady killed by Second Husband)