नऊ वर्षांच्या चिमुरड्याची निर्घृण हत्या, सीसीटीव्ही फूटेजने बिंग फोडलं

आपल्या घरी तक्रार केल्यामुळे ओरडा पडला, त्याच रागातून आपण 9 वर्षांच्या मुलाची तलावात बुडवून हत्या केली, अशी धक्कादायक कबुली मुलाने दिली. पोलीसही हे ऐकून अवाक झाले. त्यांनी आरोपी मुलाला ताब्यात घेऊन त्याची रवानगी बाल सुधारगृहात केली आहे.

नऊ वर्षांच्या चिमुरड्याची निर्घृण हत्या, सीसीटीव्ही फूटेजने बिंग फोडलं
संग्रहित छायाचित्र.

चेन्नई : अंगाचा थरकाप उडवणारी एक घटना तामिळनाडूतील (Tamilnadu) विरधूनगरमधून समोर आली आहे. अवघ्या 13 वर्षांच्या मुलाने खून केला. ज्याची हत्या झाली, त्या बालकाचं वय केवळ 9 वर्ष होतं. खेळताना झालेल्या भांडणाच्या रागातून ही हत्या झाल्याचा आरोप आहे. नऊ वर्षांच्या चिमुरड्याला तलावाजवळ नेऊन पाण्यात बुडवून जीवे ठार मारल्याचं समोर आलं आहे.

काय आहे प्रकरण?

तामिळनाडूतील विरधूनगरात राहणारा 13 वर्षीय मुलगा आपल्या 9 वर्षांच्या मित्रासोबत नेहमीप्रमाणे खेळत होता. त्यावेळी कुठल्याशा क्षुल्लक कारणांवरुन दोघांमध्ये वादावादी झाली. हे भांडण इतक्यावरच थांबलं नाही. तर नऊ वर्षांच्या मुलाने ते आपल्या घरी जाऊन वडिलांना सांगितलं. त्यामुळे त्याचे वडील 13 वर्षांच्या मुलाच्या घरी गेले आणि त्याच्या वडिलांकडे तक्रार केली.

तलावात बुडवून ठार मारलं

घरापर्यंत तक्रार आल्यामुळे 13 वर्षांच्या मुलाचे वडील चिडले आणि त्यांनी लेकाची चांगलीच खरडपट्टी काढली. त्यामुळे संबंधित मुलगा चांगलाच चिडला होता. त्याने 9 वर्षांच्या मित्राला पोहण्याच्या बहाण्याने तलावाजवळ नेलं. तिथे त्याने त्याला पाण्यात बुडवून ठार मारले. या हत्येनंतर जणू काही घडलंच नाही, अशा थाटात तो घरी आला.

कुटुंबीयांची शोधाशोध

9 वर्षांचा मुलगा संध्याकाळी उशिरापर्यंत घरी परत न आल्यामुळे त्याचे कुटुंबीय चिंतीत झाले होते. त्यांनी जवळपास मुलाचा शोध घेण्यास सुरुवात केली. मात्र त्याचा कुठेच थांगपत्ता लागत नसल्यामुळे त्यांनी पोलिसात तक्रार देण्याचा निर्णय घेतला. कुटुंबीयांसोबत पोलिसही चिमुरड्याचा शोध घेत होते. त्याचवेळी पोलिसांना तलावात एका मुलाचा मृतदेह तरंगताना आढळला. पोलिसांनी मृतदेह बाहेर काढून त्याची ओळख पटवली आणि तो शवविच्छेदनासाठी पाठवला.

सीसीटीव्ही फूटेजमुळे उलगडा

पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही फूटेज तपासण्यास सुरुवात केली. त्यावेळी 13 वर्षीय मुलगा आपल्या 9 वर्षांच्या मित्रासोबत तलावाजवळ फिरताना आढळला. फूटेजच्या आधारावर पोलिसांनी त्याला चौकशीसाठी ताब्यात घेतलं, तेव्हा या प्रकरणाचा उलगडा झाला.

आपल्या घरी तक्रार केल्यामुळे ओरडा पडला, त्याच रागातून आपण 9 वर्षांच्या मुलाची तलावात बुडवून हत्या केली, अशी धक्कादायक कबुली मुलाने दिली. पोलीसही हे ऐकून अवाक झाले. त्यांनी आरोपी मुलाला ताब्यात घेऊन त्याची रवानगी बाल सुधारगृहात केली आहे.

संबंधित बातम्या :

किरकोळ वादातून मित्राचा खून, रक्तरंजित चाकू घेऊन आरोपी थेट पोलीस ठाण्यात

मुंबईत भांडी विकणाऱ्या महिलेची दहशत, फिल्मी स्टाईलने गुंगीचे औषध लावून तीन महिन्याच्या बाळाची चोरी

रस्त्याच्या कडेला टोळकं दबा धरुन बसलं, गाडीतून उतरताच लाठ्याकाठ्यांनी महिलेला बदडलं, पोलिसात तक्रार

Published On - 7:57 am, Thu, 2 December 21

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI