डाव पलटला, काँग्रेस आता भाजपला सुरुंग लावणार?; ‘त्या’ दोन नेत्यांशी साधणार संपर्क
लोकसभा निवडणुकीचे कल हाती येत आहेत. त्यात इंडिया आघाडी आणि एनडीएमध्ये प्रचंड चुरस दिसत आहे. आपणही सरकार बनवू शकत असल्याचा आत्मविश्वास इंडिया आघाडीला बळावला आहे. त्यामुळेच आता इंडिया आघाडीने नवे मित्र पक्ष जोडण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत.

तब्बल दहा वर्षानंतर काँग्रेसला अच्छे दिन आले आहेत. काँग्रेस मुक्त भारत करणाऱ्या भाजपला यंदा मतदारांनी आस्मान दाखवलं आहे. सुरुवातीच्या कलांमध्ये भाजप आघाडीवर असली तरी काँग्रेसनेही जोरदार मुसंडी मारली आहे. त्यामुळे काँग्रेसचा उत्साह वाढला आहे. आपण केंद्रात सरकार बनवू शकतो असं काँग्रेसला वाटू लागल्याने आता काँग्रेसनेही हालचाली सुरू केल्या आहेत. सरकार स्थापनेसाठी काँग्रेस आता भाजपच्या एनडीए आघाडीलाच सुरुंग लावण्याच्या तयारीत आहे. टीडीपीचे नेते चंद्राबाबू नायडू आणि जेडीयूचे नेते नितीश कुमार यांच्याशी काँग्रेस संपर्क साधण्याच्या हालचाली काँग्रेसने सुरू केल्या आहेत. त्यामुळे भाजपचं टेन्शन वाढणार आहे.
लोकसभेच्या 542 जागांचे कल हाती आले आहेत. त्यापैकी 289 जागांवर भाजपच्या नेतृत्वातील एनडीए आघाडीवर आहे. तर इंडिया आघाडी 233 जागांवर आघाडीवर आहे. दोन्ही आघाड्यांमध्ये चुरशीची लढत सुरू आहे. 21 जागा इतरांच्या खात्यात जाताना दिसत आहेत. आजच्या निवडणूक कलांमुळे इंडिया आघाडीचा प्रचंड आत्मविश्वास वाढला आहे. या कलांचं निकालात रुपांतर झालं तर इंडिया आघाडी सरकार स्थापन करण्यासाठी मजबूत हालचाली करू शकते. त्यासाठी त्यांना सर्वाधिक गरज जेडीयू आणि टीडीपीची भासणार आहे.
टीडीपी आणि जेडीयूच का?
इंडिया आघाडीला आपण सत्तेत येऊ असं वाटतंय. बहुमतासाठीचा 272 च्या आकड्यापासून इंडिया आघाडी दूर आहे. इंडिया आघाडीला बहुमत गाठण्यासाठी 30 जागांची गरज पडू शकते. एनडीएला तोडूनच मतांची ही बेगमी केली जाऊ शकते. त्यामुळेच इंडिया आघाडीने आता टीडीपी आणि जेडीयूला संपर्क साधण्यास सुरू केला आहे. या दोन्ही पक्षांना सोबत घेऊन सत्तेचा डाव मांडण्याचा त्यांचा प्रयत्न असल्याचं सूत्रांनी सांगितलं. बिहारमध्ये जेडीयूला चांगलं यश मिळालं आहे. जेडीयू बिहारमधील सर्वात मोठा पक्ष ठरला आहे. जेडीयू जवळपास 16 जागांवर आघाडीवर आहे. तर टीडीपी 15 जागांवर आघाडीवर आहे.
खरगेंचा दावा काय?
लोकसभा निवडणुकीच्या सातव्या आणि शेवटच्या टप्प्यात काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी दिल्लीत इंडिया आघाडीची बैठक बोलावली होती. या बैठकीला आघाडीतील सर्वच पक्ष उपस्थित होते. या बैठकीनंतर मल्लिकार्जुन खरगे यांनी मीडियाशी संवाद साधला होता. तसेच इंडिया आघाडी कमीत कमी 295 जागांवर विजयी होत असल्याचं सांगितलं होतं. काँग्रेसने तर कोणत्या राज्यात किती जागा जिंकू हे सुद्धा सांगितलं होतं. तर काँग्रेसच्या माजी अध्यक्ष सोनिया गांधी यांनीही एक्झिट पोल चुकीचे ठरणार असल्याचं म्हटलं होतं.
