रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा निकाल 2024 : ठाकरे गटाला मोठा धक्का, नारायण राणे यांची मुसंडी
रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघात ठाकरे गटाला मोठा धक्का बसताना दिसतोय. या मतदारसंघात गेल्या 10 वर्षांपासून खासदार असलेले ठाकरे गटाचे उमेदवार विनायक राऊत यांना भाजपचे उमेदवार नारायण राणे यांनी चांगलाच धक्का दिला आहे. नारायण राणे यांचा विजय आता जवळपास निश्चित झाला आहे.

रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघ हा या निवडणुकीतला अतिशय महत्त्वाचा मतदारसंघ ठरला आहे. कारण या मतदारसंघात महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री तथा केंद्रीय कॅबिनेट मंत्री नारायण राणे यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. या मतदारसंघात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे विनायक राऊत हे विद्यमान खासदार आहेत. गेल्या 10 वर्षांपासून या मतदारसंघात ते खासदार आहेत. विनायक राऊत 2014 आणि 2019 च्या लोकसभा निवडणुकीनंतर विजयी झाले होते. पण गेल्या दोन लोकसभा निवडणुकांवेळची परिस्थिती आणि आताची परिस्थिती ही वेगळी आहे. कारण शिवसेना पक्षात मोठी फूट पडलेली आहे. त्यामुळे स्थानिक राजकारणावर त्याचा मोठा परिणाम पडला आहे. रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातील 6 विधानसभा मतदारसंघाचं पक्षीय बलाबल पाहता वेगवेगळे दावे केले जात आहेत. पण आता नेमकं कोण जिंकणार ते आज स्पष्ट होत आहे.
रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघात गेल्या दोन निवडणुकांमध्ये शिवसेनेचा उमेदवार जिंकून आला तेव्हा वेगळी राजकीय परिस्थिती होती. कारण त्यावेळी शिवसेना आणि भाजप पक्षाची महायुती होती. पण आता शिवसेना पक्षात फूट पडली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील शिवसेना पक्ष हा भाजपसोबत आहे. या मतदारसंघात 2009 मध्ये शिवसेनेतून काँग्रेसमध्ये गेलेले निलेश राणे खासदार म्हणून निवडून आले होते. पण त्यानंतर पुढच्या दोन लोकसभा निवडणुकांमध्ये शिवसेनेचे विनायक राऊत जिंकून आले आहेत.
रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळूण, रत्नागिरी आणि राजापूर हे तीन विधानसभा मतदारसंघ आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवली, कुडाळ आणि सावंतवाडी हे तीन विधानसभा मतदारसंघ रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघात आहेत. या मंतदारसंघाची 2008 मध्ये स्थापना झाली. यानंतर 2009 मध्ये येथे पहिली लोकसभा निवडणूक झाली. या मतदारसंघात 13,67,361 मतदार आहेत.
सहा विधानसभा मतदारसंघातील पक्षीय बलाबल काय?
रत्नागिरी लोकसभा मतदारसंघातील कुडाळ विधानसभा मतदारसंघात ठाकरे गटाचे आमदार आहेत. वैभव नाईक हे तिथले विद्यमान आमदार आहेत. तर राजापूर येथे देखील ठाकरे गटाचे आमदार आहेत. राजन साळवी हे ठाकरे गटाचे तिथले विद्यमान आमदार आहेत. तर सावंतवाडी येथे शिंदे गटाचे दीपक केसरकर आणि रत्नागिरी येथे उदय सामंत हे आमदार आहेत. दोन्ही नेते हे शिंदे गटाचे ताकदवान नेते आहेत. ते महाराष्ट्रीच्या कॅबिनेटमध्ये मंत्री आहेत. चिपळूण विधानसभा मतदारसंघात अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शेखर निकम हे आमदार आहेत. तर कणकवली विधानसभा मतदारसंघात भाजपचे नितेश राणे हे आमदार आहेत. ते स्वत: नारायण राणे यांचे पुत्र आहेत. या मतदारसंघात पक्षीय बलाबल पाहता शिंदे गटाचे 2, ठाकरे गटाचे 2, अजित पवार गटाचा एक आणि भाजपचा एक असे आमदार आहेत. असं असलं तरी महायुतीचा विचार करता इथे महायुतीचे 4 आणि महाविकास आघाडीचे केवळ 2 आमदार आहेत. त्यामुळे या मतदारसंघात कोण जिंकणार? याबाबतची उत्सुकता शिगेला आहे.
