लता मंगेशकर यांचं 63 वर्षांपूर्वीचं गाणं, ऐकताच पंडित नेहरुंच्या डोळ्यात आलेले पाणी, आजही ऐकताना अंगावर येतो काटा
लता मंगेशकर यांनी 63 वर्षांपूर्वी या गाण्याला गाण्यास दिलेला नकार. पण काही दिवसांनंतर होकार देताच गाणं ठरलं प्रचंड सुपरहिट. ऐकताच पंडित नेहरुंच्या डोळ्यात आलेले पाणी. आजही त्यांचा आवाज ऐकला तरी अंगावर येतो काटा.

ऑगस्ट महिना सुरू झाला की स्वातंत्र्यदिनाची चाहूल लागते. 15 ऑगस्टच्या कार्यक्रमांमध्ये देशभक्तीपर गाणी आवर्जून ऐकायला मिळतात. यामध्ये लता मंगेशकर यांनी गायलेले ‘ऐ मेरे वतन के लोगों’ हे गाणं आजही विशेष लोकप्रिय आहे. हे गाणं ऐकताना अनेकांच्या मनात देशभक्तीची भावना जागृत होते. विशेष म्हणजे, हे गाणं पहिल्यांदा ऐकल्यानंतर तत्कालीन पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या डोळ्यांत अश्रू आले होते.
‘ऐ मेरे वतन के लोगों’ हे गाणं 27 जानेवारी 1963 रोजी लता मंगेशकर यांनी सादर केले होते. 1962 च्या भारत-चीन युद्धात शहीद झालेल्या भारतीय जवानांना समर्पित असलेल्या या गाण्याचे बोल कवी प्रदीप यांनी लिहिले होते तर संगीतकार सी. रामचंद्र यांनी त्याला संगीत दिले होते.
दिल्लीतील कार्यक्रमात लता मंगेशकर यांनी हे गाणं सादर केले. त्यावेळी कार्यक्रमाला तत्कालीन पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. लता मंगेशकर यांचा आवाज आणि गाण्यातील भावनिक शब्द ऐकून नेहरूंचे डोळे पाणावले.
लता मंगेशकरांनी आधी दिला होता नकार
विशेष म्हणजे, लता मंगेशकर सुरुवातीला हे गाणं गाण्यास तयार नव्हत्या. पंतप्रधान आणि राष्ट्रपतींसमोर हे गाणं सादर करण्याबाबत त्यांना संकोच वाटत होता. शिवाय हे गाणं तयार करण्यासाठी वेळही कमी होता. मात्र, कवी प्रदीप यांचा लतादीदींच्या आवाजावर पूर्ण विश्वास होता.
लतादीदींनी हे गाणं आपण आणि आपली बहीण आशा भोसले यांनी मिळून सादर करावे, अशी सूचना केली होती. मात्र प्रदीप यांना हे गीत एकलगीत म्हणूनच हवे होते. अखेर लता मंगेशकर यांनी ते गाण्यास होकार दिला.
गाणे संपल्यानंतर नेहरूंनी घेतली भेट
लता मंगेशकर यांनी एका मुलाखतीत या प्रसंगाची आठवण सांगितली होती. 27 जानेवारीला कार्यक्रमस्थळी पोहोचल्यानंतर त्यांनी ‘अल्लाह तेरो नाम’ हे भजन आणि त्यानंतर ‘ऐ मेरे वतन के लोगों’ हे गाणं सादर केले. मेहबूब खान यांनी नेहरूंना लतादीदींच्या गाण्याबद्दल विचारले. त्यावर नेहरूंनी लतादीदींचे कौतुक करत, ‘खूप चांगले. माझ्या डोळ्यांत पाणी आले,’ अशी प्रतिक्रिया दिल्याचे लतादीदींनी सांगितले होते.
