‘या’ लोकप्रिय मालिकेत मिलिंद गवळींची होणार एण्ट्री; साकारणार राजकीय व्यक्तिरेखा
'आई कुठे काय करते' या मालिकेत अनिरुद्धची भूमिका साकारलेले अभिनेते मिलिंद गवळी लवकरच एका लोकप्रिय मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. काही दिवसांपूर्वीच त्यांची मालिका बंद झाली होती. त्यानंतर त्यांना पुन्हा छोट्या पडद्यावर पाहण्यासाठी प्रेक्षक उत्सुक होते.

स्टार प्रवाह वाहिनीवरील ‘आई कुठे काय करते’ या मालिकेला प्रेक्षकांचं भरभरुन प्रेम मिळालं. या मालिकेतील प्रत्येक पात्र प्रेक्षकांच्या मनात घर करुन आहे. या मालिकेतील लोकप्रिय पात्र अनिरुद्ध म्हणजेच अभिनेते मिलिंद गवळी लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. ‘लग्नानंतर होईलच प्रेम’ या मालिकेत माजी समाजकल्याण मंत्री यशवंतराव भोसलेंची भूमिका ते साकारणार आहेत. मालिकेत सध्या पार्थ-नंदिनीच्या लग्नाची धामधूम सुरु आहे. या धामधुमीत यशवंतराव भोंसलेंच्या एण्ट्रीने कथानकात नवा ट्विस्ट येणार आहे.
या भूमिकेविषयी सांगताना मिलिंद गवळी म्हणाले, “जवळपास तीन महिन्यांनंतर पुन्हा एकदा सेटवरचं वातावरण अनुभवतोय. अनिरुद्ध या पात्रावर प्रेक्षकांनी मनापासून प्रेम केलं. आजही प्रेक्षक या पात्राला विसरलेले नाहीत. लग्नानंतर होईलच प्रेम मालिकेतली भूमिका खूप वेगळी आहे. माजी समाजकल्याण मंत्र्याची भूमिका मी साकारत आहे. यशवंतराव भोसलेच्या येण्याने मालिकेत नेमका कोणता धमाका होणार हे प्रेक्षकांना लवकरच कळेल. मी सुद्धा हे पात्र साकारण्यासाठी प्रचंड उत्सुक आहे.”




View this post on Instagram
“सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ‘लग्नानंतर होईलच प्रेम’ मालिकेचे निर्माते शशांक सोळंकी आणि मी एका कॉलेजमध्ये शिकलो. कॉलेजपासूनची ही मैत्री आजपर्यंत घट्ट आहे. जवळच्या मित्राच्या मालिकेत ही खास भूमिका साकारायला मिळतेय याचा आनंद वेगळा आहे. सोबतच स्टार प्रवाहसोबत एक वेगळं जिव्हाळ्याचं नातं आहे. त्यामुळे ही भूमिका खूपच स्पेशल आहे,” असं त्यांनी सांगितलं. ‘लग्नानंतर होईलच प्रेम’ ही मालिका संध्याकाळी 7 वाजता स्टार प्रवाह वाहिनीवर प्रेक्षकांच्या भेटीला येते.
याआधी ‘आई कुठे काय करते’ मालिकेतील लाडकी अरुंधती पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला आली होती. ‘आई आणि बाबा रिटायर होत आहेत’ या मालिकेत स्वीटी आणि मकरंदच्या लग्नात अरुंधतीने खास हजेरी लावली होती. “साधारण दीड महिन्यापूर्वी आमच्या मालिकेने निरोप घेतला. प्रेक्षकांप्रमाणेच मी देखिल अरुंधतीला खूप मिस करत होते. सेटवरची लगबग, हातातली स्क्रिप्ट, कॅमेरा या सगळ्या गोष्टी खूप दिवसांनंतर अनुभवायला मिळत आहेत,” अशा शब्दांत मधुराणी प्रभुलकरने आनंद व्यक्त केला होता.