आधी माझी आई आणि आता पत्नी..; घटस्फोटाच्या चर्चांवर अभिषेकचं मोठं वक्तव्य
ऐश्वर्यासोबतच्या घटस्फोटाच्या चर्चांवर अभिषेकने ही प्रतिक्रिया दिली आहे. गेल्या काही महिन्यांपासून या दोघांच्या वैवाहिक आयुष्याबद्दल बऱ्याच चर्चा होत आहे. अशातच एका मुलाखतीत अभिषेकने त्यावर मौन सोडलं आहे.

बच्चन कुटुंब हे बॉलिवूड इंडस्ट्रीतील सर्वांत चर्चेतलं कुटुंब आहे. या कुटुंबातील चार सदस्यांनी आपल्या दमदार अभिनयकौशल्याने इंडस्ट्रीत विशेष छाप सोडली आहे. अमिताभ बच्चन, जया बच्चन, अभिषेक बच्चन आणि ऐश्वर्या राय बच्चन यांनी बॉक्स ऑफिसवर एकापेक्षा एक दमदार कामगिरी केली आहे. परंतु गेल्या काही महिन्यांपासून याच कुटुंबातील अभिषेक आणि ऐश्वर्याच्या घटस्फोटाच्या जोरदार चर्चा आहेत. या दोघांच्या संसारात सर्वकाही आलबेल नसून ते लवकरच विभक्त होणार आहेत, अशा चर्चांना उधाण आलं होतं. इतकंच नव्हे तर ऐश्वर्या अभिषेकपासून वेगळी राहत असल्याचंही म्हटलं गेलं. या सर्व चर्चांवर अखेर अभिषेक बच्चनने मौन सोडलं आहे.
नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत अभिषेक म्हणाला, “मी कामानंतर एका आनंदी कुटुंबाच्या घरात परत येतो. एक गोष्ट तर पक्की आहे, आधी माझी आई (जया बच्चन) आणि आता माझी पत्नी (ऐश्वर्या).. या दोघी बाहेरच्या जगाला घरात आणू देत नाहीत. मी या फिल्म इंडस्ट्रीत मोठा झालोय. त्यामुळे मला एक गोष्ट माहीत आहे की कोणत्या गोष्टीकडे गांभीर्याने पाहायचं आणि कोणत्या नाही. मी सोशल मीडियावरील गोष्टींमुळे प्रभावित होत नाही.”
अभिषेक आणि ऐश्वर्याने 2007 मध्ये लग्न केलं होतं. त्यानंतर 2011 मध्ये ऐश्वर्याने मुलीला जन्म दिला. गेल्या काही महिन्यांपासून या दोघांच्या घटस्फोटाच्या चर्चांना उधाण आलं आहे. मात्र त्यावर अद्याप कोणीच प्रतिक्रिया दिली नव्हती. ऐश्वर्या आणि अभिषेकला बऱ्याच काळापासून एकत्र पाहिलं गेलं नव्हतं. अंबानींच्या लग्नालाही ते दोघं वेगवेगळे आले होते, म्हणून या चर्चांना आणखी हवा मिळाली होती. इतकंच नव्हे तर अभिषेकचं नाव अभिनेत्री निम्रत कौरशीही जोडलं गेलं होतं. एक्स्ट्रा मॅरिटल अफेअरच्या चर्चांवर बच्चन कुटुंबाच्या एका जवळच्या व्यक्तीने असं म्हटलं होतं की अभिषेक त्याच्या पत्नीची फसवणूक कधीच करणार नाही. अभिषेक त्याच्या नात्यात नेहमीच प्रामाणिक राहिला आहे. त्यामुळे सध्या ज्या काही चर्चा होत आहेत, त्यात काहीच तथ्य नाही.