Nana Patekar: नाना पाटेकर महाराष्ट्र सोडणार? केंद्रीय मंत्र्यासमोर केलेल्या विधानाने खळबळ
Nana Patekar: ज्येष्ठ अभिनेते आणि सामाजिक कार्यकर्ते नाना पाटेकर यांनी नुकताच एका कार्यक्रमात केलेल्या विधानाने सर्वांचे लक्ष वेधले आहे. आता ते नेमकं काय म्हणाले जाणून घ्या...

नुकताच नागपूरमध्ये जलक्रांती परिषद घेण्यात आली. या कार्यक्रमासाठी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, अभिनेते नाना पाटेकर, मकरंद अनासपुरे यांनी हजरी लावली. जलक्रांती परिषदेच्या मंचावरून ज्येष्ठ अभिनेते आणि सामाजिक कार्यकर्ते नाना पाटेकर यांनी केलेल्या एका विधानाने संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष वेधून घेतले आहे. “मी आता महाराष्ट्र सोडावा का असा विचार करत होतो,” असे म्हणत त्यांनी उपस्थितांना चक्रावून सोडले. मात्र, त्यांच्या या विधानापाठीमागे कोणतीही राजकीय नाराजी नसून, दुर्गम भागातील लोकांसाठी काहीतरी करण्याची तीव्र तळमळ असल्याचे स्पष्ट झाले. “डोंगर खेड्यात काही करता येईल का? तिथेच आपले चार खांदे शोधावे आणि त्यांच्यासाठी काहीतरी करावे, असा विचार मनात येतोय,” अशा भावनिक शब्दांत त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.
विदर्भासह महाराष्ट्राच्या अनेक भागांत सुरू असलेल्या कामांचा उल्लेख करत नाना पाटेकर यांनी सामूहिक प्रयत्नांचे महत्त्व अधोरेखित केले. एकट्याने केलेल्या कामापेक्षा सर्वांनी एकत्र येऊन केलेले काम नेहमीच मोठे असते. आपल्याकडे अनेक संस्था आहेत, त्यांनी आता हेवेदावे विसरून एकत्र येण्याची गरज आहे.
मकरंद अनासपुरे आणि स्वतःच्या सुरुवातीच्या प्रयत्नांची आठवण सांगताना ते म्हणाले, “माणूस म्हणून आपले काही कर्तव्य आहे, याच भावनेतून मी सुरुवातीला दीड कोटी रुपये जमा केले आणि आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबांना प्रत्येकी १५ हजार रुपये देण्यास सांगितले. पण जेव्हा आम्ही ‘नाम फाउंडेशन’ची स्थापना केली, तेव्हा अवघ्या ३ महिन्यांत जनतेने ६० कोटी रुपयांची मदत दिली. हा महाराष्ट्राच्या दातृत्वाचा आणि विश्वासाचा मोठा पुरावा आहे.”
“शहरातील भिंती कबरीसारख्या वाटतात…”
आपल्या शेतीवरील आणि निसर्गावरील प्रेमाविषयी बोलताना नाना पाटेकर भावुक झाले. “मी शहरात जास्त काळ राहूच शकत नाही. तिथे मला शहरातील भिंती कबरीसारख्या वाटू लागतात. माझे मन गाई, कुत्रे आणि शेतात रमते. आज कोरडवाहू शेतकऱ्याला किती अतोनात त्रास सहन करावा लागतोय, याचा आपण विचार केला पाहिजे. आपण जन्मापासून मोफत श्वास घेतोय, निसर्गाने कधी एक रुपयाही मागितला नाही, याचे भान ठेवले पाहिजे. म्हणूनच आता मी केवळ गावागावात भटकत राहण्याचे ठरवले आहे” असे नाना पाटेकर म्हणाले.
राजकारण आणि समाजकारण यातील फरक
“आपण कोणी राजकीय पक्ष नाही. सरकारला जे करायचे आहे ते ते ठरवतील,” असे स्पष्ट करत त्यांनी स्वामिनाथन आयोगाची अंमलबजावणी अजूनही केवळ अंशतः सुरू असल्याकडे लक्ष वेधले. भाजप असो वा काँग्रेस, दोन्ही पक्ष आणि त्यांच्या विचारसरणी वेगवेगळ्या असल्या, तरी सामाजिक प्रश्नांवर आपण सर्व नागरिक म्हणून एकच आहोत. चळवळी या केवळ भाषणापुरत्या मर्यादित न राहता, प्रत्यक्षात कृतीत उतरल्या पाहिजेत, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
एकत्र येऊया, एकत्र काम करूया!
“लहान गावांमध्ये राहणारी मुले आज मोठी शहरे सांभाळत आहेत, ग्रामीण भागात खूप काम करण्याची गरज आहे,” असे सांगत नानांनी भाषणाचा शेवट सर्वांना एकत्र येण्याचे आवाहन करून केला. तात्पुरते सुख-दुःख क्षणिक असते, पण एकत्र येऊन काम केले तर मोठे बदल घडवता येतात, हा संदेश त्यांनी या जलक्रांती परिषदेच्या माध्यमातून दिला.
