सायली संजीवसोबत शशांक केतकरचा रोमान्स; व्हिडीओची तुफान चर्चा
मराठी चित्रपट 'कैरी'मधील 'नारळी पोफळीच्या बागा' हे गाणे सायली संजीव आणि शशांक केतकर यांच्या रोमँटिक केमिस्ट्रीमुळे चर्चेत आहे. राष्ट्रीय पुरस्कार विजेते दिग्दर्शक शंतनू गणेश रोडे यांच्या या चित्रपटातील गाण्याचे चित्रीकरण निसर्गरम्य कोकणात झाले आहे.

सध्या मराठी सिनेसृष्टीत हटके विषयांवर चित्रपट आणि गाणी प्रदर्शित होताना दिसत आहेत. त्यातच आता मराठी सिनेसृष्टीतील दोन लोकप्रिय चेहरे म्हणजेच अभिनेत्री सायली संजीव आणि अभिनेता शशांक केतकर पुन्हा एकदा मोठ्या पडद्यावर एकत्र आले आहेत. नुकतंच सायली संजीव आणि शशांक केतकर यांचे काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. नॅशनल अवार्ड विनिंग दिग्दर्शक शंतनू गणेश रोडे यांच्या आगामी कैरी या चित्रपटातील एका गाण्यात त्यांची रोमँटिक केमिस्ट्री पाहायला मिळत आहे. सध्या या व्हिडीओची सोशल मीडियावर तुफान चर्चा आहे.
कोकणच्या वातावरणात शूटींग
कैरी या चित्रपटातील ‘नारळी पोफळीच्या बागा’ या पहिल्याच गाण्यात त्यांची अत्यंत रोमँटिक आणि फ्रेश केमिस्ट्री प्रेक्षकांना पाहायला मिळत आहे. या गाण्याने सायली आणि शशांक यांचा पडद्यावर रोमँटिक प्रवास पाहायला मिळत आहे. सध्या या व्हिडीओची सोशल मीडियावर तुफान चर्चा आहे. ‘नारळी पोफळीच्या बागा’ या गाण्याची सर्वात मोठी खासियत म्हणजे याचे निसर्गरम्य चित्रीकरण असल्याचे दिसत आहे. हे गाणे सुंदर आणि हिरव्यागार कोकणच्या वातावरणात शूट करण्यात आले आहे.
या गाण्यात शशांक आणि सायली एकमेकांच्या प्रेमात बेधुंद झालेले एक जोडपे दाखवले आहे. त्यांच्या प्रेमातील गोड क्षण आणि त्यांच्या संसाराची सुरुवात या गाण्यातून अत्यंत हळुवारपणे प्रेक्षकांपर्यंत दाखवण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. सायली आणि शशांकचा सहज, सुंदर आणि निरागस अभिनय या रोमँटिक गाण्याला अधिक आकर्षक बनवतो. या दोन प्रतिभावान कलाकारांनी पडद्यावर आणलेला रोमान्स प्रेक्षकांच्या विशेष पसंतीस उतरत आहे.
View this post on Instagram
मधुर संगीत आणि गीतांमुळेही प्रेक्षकांच्या मनात घर
हे गाणे केवळ व्हिज्युअल्समुळेच नव्हे, तर त्याच्या मधुर संगीत आणि गीतांमुळेही प्रेक्षकांच्या मनात घर करत आहे. या गाण्याचे शब्द मनोहर गोलांबरे यांनी लिहिले आहे. तर निषाद गोलांबरे यांनी या गाण्याला संगीतबद्ध केले आहे. अल्पावधीतच या नव्या रोमँटिक गाण्याने रसिकांच्या मनावर राज्य करायला सुरुवात केली आहे. कोकणच्या वातावरणात शूट झालेले हे गाणे सध्या अनेक प्रेक्षकांना आपल्या गावाकडची आठवण करून देत आहे.
‘कैरी’ हा चित्रपट केवळ सायली-शशांकच्या जोडीमुळेच नाही, तर त्याच्या तगड्या स्टारकास्टमुळेही चर्चेत आहे. या चित्रपटात अभिनेते सुबोध भावे, सिद्धार्थ जाधव, अरुण नलावडे, आणि सुलभा आर्या हे दिग्गज कलाकार मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. उन्हाळ्याच्या कैरीची चव हिवाळ्यात देणारा हा रोमँटिक थ्रिलर सिनेमा येत्या १२ डिसेंबरला सिनेमागृहात प्रदर्शित होणार आहे. मात्र प्रदर्शनापूर्वीच नारळी पोफळीच्या बागा या गाण्यामुळे कैरीबद्दलची उत्सुकता आता शिगेला पोहोचली आहे.
