Aishwarya rai : 72 तासांच्या आत तो कंटेंट काढून टाका..; ऐश्वर्या रायला कोर्टाकडून मोठा दिलासा
Aishwarya rai : अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चनने तिच्या व्यक्तिमत्त्व अधिकारांचं संरक्षण करण्याच्या मागणीसाठी दिल्ली उच्च न्यायालयात धाव घेतली होती. याप्रकरणी न्यायालयाने गुरुवारी महत्त्वाचे आदेश दिले आहेत. हे नेमकं प्रकरण काय आहे, ते जाणून घ्या..

Aishwarya rai : अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चनला दिल्ली उच्च न्यायालयाने मोठा दिलासा दिला आहे. कोणत्याही परवानगीशिवाय तिचे फोटो, आवाज, कंटेंट यांचा वापर करणं म्हणजे सन्मानाने जगण्याच्या अधिकाराचं उल्लंघन असल्याचं म्हटलं आहे. इतकंच नव्हे तर न्यायालयाने ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म, गुगल यांना नोटीससुद्धा बजावली आहे. त्याचप्रमाणे ऐश्वर्याने तिच्या तक्रारीत ज्या URL चा उल्लेख केला आहे, त्या 72 तासांच्या आत काढून टाकण्याचे, डिॲक्टिव्हेट करण्याचे आणि ब्लॉक करण्याचे अंतरिम निर्देश दिले आहेत. इलेक्ट्रॉनिक्स आणि आयटी मंत्रालय, आयटी विभाग यांना अशा सर्व URL ब्लॉक आणि डिॲक्टिव्हेट करण्यासाठी आवश्यक सूचना जारी करण्यास न्यायालयाने सांगितलं आहे.
ऐश्वर्याने तिच्या याचिकेत कॉपीराइट्सचं उल्लंघन, कलाकारांचे हक्क, प्रसिद्धी किंवा व्यक्तिमत्त्व अधिकारांचा गैरवापर, काही वेबसाइट्स, कंपन्या आणि अज्ञात व्यक्तींकडून अशा व्हायरल केल्या जाणाऱ्या तिच्या कोणत्याही कंटेंटवर बंदी घालण्याची मागणी केली होती. सोप्या शब्दांत सांगायचं झालं तर, ऐश्वर्याने तिच्या परवानगीशिवाय इंटरनेटवर तिचे फोटो, बनावट फोटो, प्रसिद्धीचे व्हिडीओ आणि बनावट ऑडिओचा बेकायदेशीर वापर करण्याबद्दल न्यायालयात धाव घेतली होती.
View this post on Instagram
दिल्ली उच्च न्यायालयात याप्रकरणी गुरुवारी सुनावणी झाली. सुनावणीनंतर दिलेल्या आदेशात कोर्टाने म्हटलंय की जेव्हा एखाद्या प्रसिद्ध व्यक्तीची ओळख त्यांच्या संमतीशिवाय वापरली जाते, तेव्हा त्यामुळे व्यावसायिक नुकसान होऊ शकतं. यामुळे त्यांच्या सन्मानाने जगण्याच्या अधिकारावरही परिणाम होऊ शकतो. ऐश्वर्याचं नाव, फोटो आणि तिच्या व्यक्तिमत्त्वाशी संबंधित इतर घटकांचा गैरवापर स्पष्टपणे उल्लंघन करणारा आहे. एआय तंत्रज्ञानाचा वापर करून तिचे फेक व्हिडीओ बनवले जात आहेत. यामुळे केवळ तिचं आर्थिक नुकसान होत नाही तर तिच्या प्रतिष्ठेला आणि विश्वासार्हतेला धक्का पोहोचतोय.
एआयच्या मदतीने तिच्या फोटोंमध्ये छेडछाड केली जातेय, अशी तक्रार ऐश्वर्याने तिच्या याचिकेतून केली होती. इतकंच नव्हे तर डीपफेक व्हिडीओसारखे अश्लील कंटेंटसुद्धा बनवले जात असल्याचं तिने म्हटलंय. ऐश्वर्यापाठोपाठ तिचा पती आणि अभिनेता अभिषेक बच्चननेही न्यायालयात याच कारणासाठी धाव घेतली आहे.
