घटस्फोट होईपर्यंत अभिनय करणार नाही..; प्रसिद्ध अभिनेत्याचा मोठा निर्णय, सासरच्या मंडळींवर गंभीर आरोप
प्रसिद्ध तमिळ अभिनेता जयम रवीने पत्रकार परिषद घेत पत्नी आणि सासरच्या मंडळींवर गंभीर आरोप केले आहेत. इतकंच नव्हे तर घटस्फोट होईपर्यंत चित्रपटसृष्टीत काम करणार नसल्याचं त्याने जाहीर केलं आहे. यामुळे चाहत्यांनाही धक्का बसला आहे.

अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चनसोबत ‘पोन्नियिन सेल्वन’ या चित्रपटात भूमिका साकारलेला प्रसिद्ध तमिळ अभिनेता रवी मोहन, ज्याला चाहते जयम रवी या नावानेही ओळखतात, तो सध्या त्याच्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत आहे. जयम रवीने शनिवारी चेन्नईमध्ये एक पत्रकार परिषद घेत आपल्या भावना व्यक्त केल्या. वैयक्तिक आयुष्य आणि घटस्फोटाभोवती सुरू असलेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर त्याने त्याच्या वेदना बोलून दाखवल्या. इतकंच नव्हे तर पत्रकार परिषदेत भावूक होत जयम रवीने घोषणा केली की, जोपर्यंत त्याची पत्नी आरती रवी हिच्यापासून अधिकृतपणे घटस्फोट होत नाही, तोपर्यंत तो चित्रपटांमध्ये काम करणार नाही. गेल्या काही काळापासून प्रसिद्ध गायिका आणि अध्यात्मिक थेरपिस्ट केनिशा फ्रान्सिससोबत जयम रवीच्या अफेअरच्या चर्चा सुरू होत्या. त्यावरही आता त्याने मौन सोडत अनेक खळबळजनक खुलासे केले आहेत.
गायिका केनिशा फ्रान्सिसने सोशल मीडियावर एक पोस्ट लिहित जयम रवीसोबतचं नातं संपवण्याचा आणि कायमचं चेन्नई सोडून जाण्याचा इशारा दिला होता. त्यानंतर पत्रकार परिषदेत त्याचं भावनिक रुप पहायला मिळालं. “तुम्ही लोकांनी अखेर केनिशाला दूर पाठवलंच. मी तिच्या चांगल्या आयुष्यासाठी प्रार्थना करतो,” असं तो दु:खद भावनेनं म्हणाला. त्यानंतर त्याने पत्नी आरती आणि तिच्या कुटुंबीयांवर गंभीर आरोप केले. अनेक वर्षांपासून त्याला सासरच्या मंडळींकडून विनाकारण अपमान आणि छळ सहन करावा लागत असल्याचं तो म्हणाला. याबद्दल आता मी आणखी गप्प बसू शकत नाही, असंही त्याने सांगितलं.
“गेल्या दोन वर्षांपासून माझ्यावर असलेल्या लोकांच्या सततच्या नजरांमुळे आणि इंटरनेवरील ट्रोलिंगमुळे मी मानसिकदृष्ट्या खचून गेलो आहे. जोपर्यंत माझा कायदेशीर घटस्फोट होत नाही, तोपर्यंत मी कोणत्याही चित्रपटात काम करणार नाही. ज्या दिवशी माझा घटस्फोट होईल, त्यादिवशी माझं आयुष्य पुन्हा रुळावर येईल. हे ट्रोलिंग थांबताच मी पुन्हा कॅमेरासमोर येईन. लोक अनेकदा माझ्या सरळ आणि शांत स्वभावाचा गैरफायदा घेतात, पण आता माझा संयम संपला आहे. माझी पत्नी आणि सासरचे लोक मला गुलाम म्हणून ठेवत असल्याचेही सर्व पुरावे माझ्याकडे आहेत”, असे धक्कादायक आरोप जयम रवीने केले आहेत.
In an emotional press meet, Ravi Mohan announced a break from his acting career until his ongoing divorce is cleared. He shared his immense pain over relentless cyberbullying and negative PR campaigns that have shattered his mental peace.pic.twitter.com/3rDRstP1wu
— George 🍿🎥 (@georgeviews) May 16, 2026
जयम रवीच्या पत्रकार परिषदेच्या आधी त्याची पत्नी आरती रवीने इन्स्टाग्रामवर एक मेसेज लिहिला होता. माझ्या मौनाला माझा कमकुवतपणा समजू नका, असं तिने त्यात म्हटलं होतं. इतकंच नव्हे तर माझ्या मुलांचा आत्मसन्मान जपण्यासाठी गरज पडल्यास मी लवकरच संपूर्ण सत्य समोर आणेन, असाही इशारा तिने दिला होता. तर दुसरीकडे जयम रवीन त्याच्या पत्रकार परिषेदत मुलांना भेटू देत नसल्याचा आरोप केला.
सप्टेंबर 2024 मध्ये जयम रवीने सोशल मीडियावर पत्नीपासून विभक्त होत असल्याची पोस्ट लिहिली होती. तेव्हापासून हा वाद सुरू आहे. त्याचवेळी रवी आणि केनिशा यांच्या अफेअरच्या अफवा पसरल्या होत्या. केनिशाने एका मुलाखतीत अफेअरचे सर्व दावे स्पष्टपणे नाकारले होते.
