‘बाहुबली’फेम अभिनेत्याच्या पत्नीचा गळफास, पती सिनेमात काम करत असल्याने आत्महत्या

दाक्षिणात्य टीव्ही मालिका आणि बाहुबली चित्रपटात छोटेखानी भूमिका केलेला अभिनेता मधु प्रकाशच्या पत्नीने गळफास घेऊन आत्महत्या केली होती.

  • टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम
  • Published On - 15:06 PM, 7 Aug 2019
'बाहुबली'फेम अभिनेत्याच्या पत्नीचा गळफास, पती सिनेमात काम करत असल्याने आत्महत्या

मुंबई : दाक्षिणात्य टीव्ही अभिनेता मधु प्रकाश (Madhu Prakash) याच्या पत्नीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. भारती यांनी हैदराबादमध्ये मंगळवारी रात्री हे टोकाचं पाऊल उचललं. अभिनेता प्रभासची मुख्य भूमिका असलेल्या, राजमौली दिग्दर्शित ‘बाहुबली’ चित्रपटात मधु प्रकाशने छोटेखानी भूमिका केली होती.

मधु आणि भारती यांचा विवाह 2015 मध्ये झाला होता. भारती एका खाजगी कंपनीत नोकरी करत होती. हैदराबादमधील पंचवटी कॉलनीमध्ये भारती पती मधु आणि सासरच्या मंडळींसोबत राहत होती.

मधु हा मनोरंजन विश्वात काम करत असल्याचं भारतीला पसंत नव्हतं. पती रोज रात्री उशिरा घरी येत असल्यामुळे भारती कंटाळलेली होती. या मुद्द्यावरुन पती-पत्नीमध्ये वारंवार खटकेही उडत असत.

मधु मंगळवारी सकाळी दहा वाजताच्या सुमारास जिमला गेला. तिथूनच तो थेट मालिकेचं शूटिंग करण्यासाठी निघून गेला. त्यामुळे चिडलेल्या भारतीने त्याला फोन केला आणि ताबडतोब घरी निघून येण्याचा इशारा दिला. घरी न आल्यास जीवाचं बरं-वाईट करुन घेण्याची धमकीही तिने दिली, मात्र मधुने त्याकडे दुर्लक्ष केलं.

मधु संध्याकाळी साडेसात वाजताच्या सुमारास घरी परतला, तेव्हा त्याला भारतीचा मृतदेह पंख्याला लटकलेल्या अवस्थेत आढळला. हे दृश्य पाहून मधुला प्रचंड मानसिक धक्का बसला. त्याने तात्काळ रायदुर्गम पोलिसांना घटनेची माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळी येऊन त्याचा जबाब नोंदवला.

मधु प्रकाशने काही कन्नड टीव्ही मालिकांमध्ये भूमिका केली आहे. बाहुबली चित्रपटात त्याने छोटीशी व्यक्तिरेखाही साकारली होती.