… म्हणून मी राजकारणात आलो नाही : सुनील शेट्टी

... म्हणून मी राजकारणात आलो नाही : सुनील शेट्टी

मुंबई : देशात लोकसभा निवडणुका सुरु आहेत यामध्ये अनेक दिग्गज नेतेमंडळी प्रचारासाठी रस्त्यावर उतरले आहेत. यामध्ये बॉलिवूड कलाकारांनीही राजकारणात उडी मारली आहे. गेल्या काही महिन्यामध्ये अभिनेत्री उर्मिला मातोंडकरने काँग्रेस पक्षात प्रवेश करत मुंबईतून लोकसभा निवडणूक लढवली होती. तसेच अभिनेता सनी देओलही भाजपात प्रवेश करत पंजाबमधून लोकसभा निवडणूक लढवत आहे. अशामध्येच अभिनेता सुनील शेट्टीही राजकारणात एण्ट्री मारणार असल्याची चर्चा गेले काही दिवस सुरु आहे.

सुनील शेट्टी राजकारणात एण्ट्री करणार असल्याच्या चर्चेने राजकारणातही अनेक तर्क वितर्क सुरु झाले होते. यासोबतच सुनील शेट्टीच्या चाहत्यांमध्येही यावर उत्सुकता लागली होती. मात्र सुनील शेट्टीने हे वृत्त खोडून काढले आहे. मुंबईतील एका कार्यक्रमात सुनील शेट्टीने माध्यमांशी बोलतना म्हटले, “मला राजकारणात जाण्याची ईच्छा नाही”.

सुनील शेट्टी म्हणाला, “जर मला राजकारणात प्रवेश करायचा असता, तर माझे वय कमी असताना मी प्रवेश केला असता. मला कधी नेता होण्याची ईच्छा नाही. कारण मी खोटे दात लावून बोलू शकत नाही”

“जर मी नेता झालो आणि विरोधी पक्षाने माझ्यावर टीका केली असती, तर ते मला आवडले नसते. यामुळे मी या सर्व गोष्टीपासून लांब राहतो. मला स्वस्थ आणि फिट राहणे आवडते. राजकारणात तरुण आणि हुशार लोकांनी सहभागी होणे गरजेचे आहे”, असंही सुनील शेट्टी म्हणाला.

दरम्यान, सुनील शेट्टीची मुलगी आथिया शेट्टीनंतर आता आहान शेट्टी लवकरच बॉलिवूड इंडस्ट्रीमध्ये डेब्यू करणार आहे. आहान शेट्टी साऊथचा सुपरहिट सिनेमा आरएक्स 100 च्या हिंदी रीमेक सिनेमातून आपल्या करिअरची सुरुवात करणार आहे. या सिनेमात अभिनेत्री तारा सुतारिया काम करणार असल्याचे म्हटलं जात आहे.

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI