Bigg Boss 19 : रेकॉर्डब्रेक ओपनिंग, पहिल्याच दिवशी धमाकेदार व्ह्यूज, ‘बिग बॉस 19’ ठरणार सुपरहिट?
'बिग बॉस 19'ची सुरुवात धमाकेदार झाली असून ओटीटीवर त्याला जबरदस्त प्रतिसाद मिळाला आहे. या शोच्या ओपनिंग एपिसोडला ओटीटीवर रेकॉर्डब्रेक व्ह्यूज मिळाले आहेत. जिओ हॉटस्टार या ओटीटी प्लॅटफॉर्मवर हा शो स्ट्रीम होतोय.

छोट्या पडद्यावरील अत्यंत लोकप्रिय आणि तितकाच वादग्रस्त शो ‘बिग बॉस’चा 19 वा सिझन रविवारी 24 ऑगस्टपासून सुरू झाला. यंदाच्या सिझनमध्ये 16 स्पर्धक सहभागी झाले आहेत. या सिझनचा थीमसुद्धा ‘घरवालों की सरकार’ असा अनोखा होता. त्यामुळे प्रेक्षकांची उत्सुकता ताणली गेली होती. याचाच सकारात्मक परिणाम या शोच्या व्ह्यूजवर झाला. कलर्स टीव्हीसोबतच जिओ हॉटस्टार या ओटीटी प्लॅटफॉर्मवरही या शोचा प्रीमिअर पार पडला. या प्रीमिअरला रेकॉर्डब्रेक व्ह्यूज मिळाले आहेत. ‘बिग बॉस 19’ हा देशभरात ओटीटीवरील सर्वांत मोठा ओपनिंग करणारा शो ठरला आहे. या शोच्या पहिल्या दिवसाच्या व्हिडीओला सर्वाधिक व्ह्यूज मिळाले आहेत.
‘बिग बॉस 19’च्या लाँच एपिसोडला गेल्या वर्षाच्या तुलनेत 2.3 पटीने अधिक ‘रिच’ (reach) आणि 2.4 पटीने अधिक ‘वॉच-टाइम’ (watch-time) मिळाला आहे. ‘बिग बॉस 18’च्या लाँचच्या तुलनेत कमाल ‘कन्करंसी’ (peak concurrency) दुपटीने वाढली आहे. याविषयी जिओस्टारचे आलोक जैन म्हणाले, “बिग बॉसच्या ओपनिंगला प्रेक्षकांकडून जो प्रतिसाद मिळाला आहे, तो पाहून आम्ही थक्क झालो आहोत. या शोचा सर्वांत मोठा ओटीटी लाँच झाला असून पहिल्या दिवसाच्या व्हिडीओला रेकॉर्डब्रेक व्ह्यूज मिळाले आहेत. यावरून प्रेक्षक बिग बॉसशी किती जोडला गेलाय, हे स्पष्ट होतंय.”
View this post on Instagram
जिओ हॉटस्टारवर बिग बॉसचा हा सिझन पाहताना प्रेक्षकांना काही नवी फिचर्ससुद्धा अनुभवता येणार आहेत. यामध्ये लाइव्ह चॅट्स, पोल्स, 24×7 लाइव्ह फीड इत्यादींचा समावेश आहे. सलमान खानच्या सूत्रसंचालनालाही प्रेक्षकांकडून भरभरून प्रतिसाद मिळतो. यंदाच्या सिझनमध्ये गौरव खन्ना, आवेज दरबार, अमाल मलिक, अशनूर कौर, झीशान कादरी, नेहल चुडासमा, अभिषेक बजाज, बसीर अली, नतालिया जानोस्झेक, नीलम गिरी, कुनिका सदानंद, मृदुल तिवारी, प्रणित मोरे, फरहाना भट्ट, नगमा मिराजकर आणि तान्या मित्तल यांचा समावेश आहे. हा सिझन नेहमीप्रमाणे तीन महिन्यांचा नसून पाच महिन्यांचा असेल, असं म्हटलं जातंय. परंतु सलमान खान फक्त पहिल्या तीन महिन्यांचं सूत्रसंचालन करणार असल्याचं कळतंय. बिग बॉसचा हा सिझन पहिल्या दिवसापासून चर्चेत आहे. गौरव खन्ना, तान्या मित्तल, कुनिका सदानंद यांसारखे स्पर्धक सोशल मीडियावर चर्चेत आहेत.
