संगीतकार प्रीतम चक्रवर्तींच्या ऑफिसमध्ये चोरी, ऑफिस बॉय 1 – 2 लाख नाही तर, इतकी रोकड घेवून फरार
Pritam Chakraborty: प्रसिद्ध संगीतकार प्रीतम यांच्या ऑफिसमध्ये चोरी, 1 - 2 लाख नाही तर, इतके लाख रुपये घेवून ऑफिस बॉय फरार, पोलिसांचा तपास सुरु... चोरी झाल्यामुळे सर्वत्र खळबळ

बॉलिवूड फिल्म इंडस्ट्रीचे प्रसिद्ध संगीतकार प्रीतम चक्रवर्तींच्या ऑफिसमध्ये चोरी झाल्याची माहिती समोर येत आहे. याप्रकरणी पोलीस प्रीतम यांच्या ऑफिसमध्ये काम करणाऱ्या एका कर्मचाऱ्याच्या शोधात आहेत. ज्याच्यावर ऑफिसमधील 40 लाख रुपयांची रोकड लंपास केल्याचे आरोप आहे. सांगायचं झालं तर, प्रीतम यांच्या स्टुडिओमध्येच त्यांचं ऑफिस देखील आहे. चोरी करणारी व्यक्ती दुसरी तिसरी कोणी नसून ऑफिस बॉय असल्याची माहिती समोर येत आहे. त्यामुळे पोलीस आता ऑफिस बॉयच्या शोधात आहेत.
कोण आहे चोरी करणारी व्यक्ती?
एफआयआरनुसार, गोरेगाव-मालाड लिंक रोडवर असलेल्या रुस्तमजी ओझोन बिल्डिंगमध्ये असलेल्या युनिमस रेकॉर्ड्स प्रायव्हेट लिमिटेडमध्ये चोरीचं प्रकरण समोर आलं आहे. चोरी 4 फेब्रुवारी 2025 रोजी दुपारी 2 च्या सुमारास घडली. एक व्यक्ती दुपारी स्टुडिओमध्ये प्रवेश करते आणि निर्माता मधु मंटेना यांच्या नावाने वर्क ऑर्डर देत 40 लाख रुपये असलेली बॅग घेऊन निघून जाते.
आशिष सायल असे या व्यक्तीचे नाव असून, त्याच्याविरुद्ध भारतीय न्यायिक संहितेच्या कलम 306 अंतर्गत चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्रीतम यांचा स्टुडिओ आणि घर एका बिल्डिंगमध्ये आहे. चोरी झाली तेव्हा प्रीतम त्यांच्या घरी होते.
स्टुडिओत एका बॅगेत 40 लाख रुपये ठेवले होते. ही बॅग मॅनेजर विनीत छेडा यांनी ठेवली होती. त्यावेळी अहमद खान, कमल दिशा आणि आशिष सायल नावाचे तिघेजण त्या ठिकाणी उपस्थित होते. याप्रकरणी आशिष सायल हा संशयित असून तो फरार आहे.
प्रीतम यांच्याबद्दल सांगायचं झालं तर, ते बॉलिवूड फिल्म इंडस्ट्रीतील एक उत्तम संगीतकार आहेत आणि त्यांनी अनेक सुपरहिट गाण्यांचे सूर तयार केले आहेत. धूम, भागमभाग, गँग्सटर, लाइफ इन अ मेट्रो, ढोल, जब वी मेट, रेस, जन्नत, मौसम, ऐ दिल है मुश्किल, बजरंगी भाईजान, छिछोरे आणि दंगल यांसारख्या अनेक सिनेमांचा महत्त्वाचा भाग आहेत. उत्कृष्ट कार्यासाठी प्रीतम यांना फिल्मफेअर आणि राष्ट्रीय पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आलं आहे.