Dhurandhar : ‘धुरंधर’वर बजरंग बलीची कृपा! मंगळवारी छप्परफाड कमाई
Dhurandhar Collection Day 5: मल्टिस्टारर 'धुरंधर' हा चित्रपट प्रेक्षक-समीक्षकांच्या पसंतीस उतरला आहे. मंगळवारी या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर बंपर कमाई केली. तर पहिल्याच वीकेंडमध्ये या चित्रपटाने कमाईचे विक्रम रचले आहेत.

Dhurandhar Collection Day 5: आदित्य धर दिग्दर्शित ‘धुरंधर’ हा चित्रपट सध्या बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालतोय. थिएटरमध्ये हा चित्रपट प्रेक्षकांची पहिली पसंत बनला आहे. उत्तम कथानक, दिग्दर्शन आणि कलाकारांचं दमदार अभिनय याच्या जोरावर ‘धुरंधर’ने प्रेक्षक-समिक्षकांची मनं जिंकली आहेत. ओपनिंग वीकेंडलाच कमाईचा 100 कोटींचा टप्पा पार करून या चित्रपटाने हे सिद्ध केलंय की येत्या काही दिवसांत तो बॉक्स ऑफिसवर अक्षरश: वादळ आणणार आहे. केवळ वीकेंडच नाही तर मधल्या वारीसुद्धा या चित्रपटाची कमाई जोरदार सुरू आहे. मंगळवारी पुन्हा एकदा या चित्रपटाने बंपर कमाई केली. या चित्रपटाविषयी प्रेक्षकांमध्ये प्रचंड उत्सुकता होती. थिएटरमध्ये प्रदर्शित झाल्यानंतर माऊथ पब्लिसिटीचा त्याला बराच फायदा झाला.
‘सॅकनिल्क’ने दिलेल्या वृत्तानुसार, मंगळवारी ‘धुरंधर’ने जवळपास 25 कोटी रुपयांपेक्षाही अधिक कमाई केली आहे. कोणतीही सुट्टी किंवा वीकेंड नसतानाही कमाईचा हा आकडा थक्क करणारा आहे. त्यामुळे मंगळवारी या चित्रपटावर बजरंग बलीच्या कृपेनं धनवर्षा झाल्याची चर्चा आहे. पाचव्या दिवसाची कमाई जोडली तर या चित्रपटाने आतापर्यंत 155 कोटी रुपयांची कमाई केली आहे. प्रदर्शनाच्या पहिल्या पाच दिवसांत झालेली ही कमाई सर्वोत्तम आहे. याच गतीने ही कमाई सुरू राहिली तर येत्या वीकेंडपर्यंत हा आकडा 200 ते 300 कोटी रुपयांपर्यंतही पोहोचू शकतो.
‘धुरंधर’ची आतापर्यंतची कमाई
पहिला दिवस- 28.60 कोटी रुपये दुसरा दिवस- 33.10 कोटी रुपये तिसरा दिवस- 44.80 कोटी रुपये चौथा दिवस- 24.30 कोटी रुपये पाचवा दिवस- 25 कोटी रुपये एकूण कमाई- 155.80 कोटी रुपये
‘छावा’, ‘सैयारा’ आणि ‘कांतारा: चाप्टर 1’ यांसारख्या सर्वाधिक कमाई करणाऱ्या चित्रपटांच्या यादीत आता ‘धुरंधर’चाही समावेश होणार आहे. या चित्रपटात रणवीर सिंह, अक्षय खन्ना, आर. माधवन, अर्जुन रामपाल, संजय दत्त, सारा अर्जुन आणि राकेश बेदी यांच्या भूमिका आहेत. या चित्रपटाच्या दमदार कथेनं आणि कलाकारांच्या जबरदस्त अभिनयकौशल्याने ‘धुरंधर’ला यशस्वी बनवलं आहे. या चित्रपटाचा बजेट 280 कोटी रुपये असल्याचं समजतंय. हा चित्रपट रणवीर सिंहच्या करिअरमधील टॉप 5 सर्वाधिक कमाई करणाऱ्या चित्रपटांमध्ये समाविष्ट झाला आहे.
सर्वाधिक कमाई करणारे रणवीर सिंहचे चित्रपट
पद्मावत- 302.15 कोटी रुपये सिम्बा- 240.3 कोटी रुपये बाजीराव मस्तानी- 184.3 कोटी रुपये रॉकी और रानी की प्रेम कहानी- 153.55 कोटी रुपये
