कराची, एक फोटो अन् एक झेंडा, त्या सीनमुळे पाकिस्तानला लागली मिरची; चिडून केली मोठी मागणी!
रणवीर सिंग आणि आदित्य धर यांच्या 'धुरंधर'ने बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला, पाकिस्तानातील कराची न्यायालयात PPP आणि कराचीच्या प्रतिमेला धक्का लागल्याबाबत केस दाखल करण्याची मागणी, खाडी देशांमध्ये चित्रपटावर बंदी

शैलेंद्र वांगू-रणवीर सिंग आणि आदित्य धर यांचा ‘धुरंधर’ हा चित्रपट सध्या चांगलाच चर्चेत आहे. बॉक्स ऑफिसवर हा चित्रपट धुमाकूळ घालत असताना त्याचा परिणाम पाकिस्तानवरही दिसत आहे. अक्षय खन्ना, संजय दत्त आणि अर्जुन रामपाल यांसारख्या स्टार्सनी सजलेल्या ‘धुरंधर’ने पाकिस्तानला इतके डिवचले आहे की थेट प्रकरण न्यायालयात पोहोचले आहे. शिवाय ‘धुरंधर’च्या निर्मात्यांवर केस दाखल करण्याची मागणी करण्यात आली आहे. तर चला, जाणून घेऊया नक्की कोणत्या कारणामुळे पाकिस्तानमधील लोकांना ‘धुरंधर’ने त्रास झाला आहे आणि राग काढण्यासाठी न्यायालयात गेले आहे.
भारतीय चित्रपट ‘धुरंधर’बाबत पाकिस्तानातील कराचीच्या एका जिल्हा न्यायालयात अर्ज दाखल करण्यात आला आहे. या अर्जात चित्रपटाच्या दिग्दर्शक, निर्माता आणि इतर टीम सदस्यांविरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात आली आहे.
‘धुरंधर’मुळे पाकिस्तानमधील लोक चिडले
अर्जदार मोहम्मद आमिरने दावा केला आहे की तो पाकिस्तान पीपल्स पार्टी (PPP) चा कार्यकर्ता आहे. त्याने आरोप लावला की चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये PPPला दहशतवादाबद्दल सहानुभूती दाखवणारा पक्ष म्हणून दाखवण्यात आले आहे. तसेच कराचीच्या ल्यारी भागाला “दहशतवादी युद्धक्षेत्र” म्हणून दाखवले आहे, जे चुकीचे आणि भडकाऊ आहे. अर्जात असेही म्हटले आहे की चित्रपटात माजी पंतप्रधान बेनझीर भुट्टो यांच्या फोटो, PPPचा झेंडा आणि रॅलीचे दृश्य कोणत्याही कायदेशीर परवानगीशिवाय वापरले आहेत.
खाडी देशांमध्ये ‘धुरंधर’वर बंदी
‘धुरंधर’ केवळ देशातच नव्हे तर जगभरात चांगली कामगिरी करत आहे. मात्र या चित्रपटाला खाडी देशांमध्ये बंदी घालण्यात आली आहे. बहरीन, कुवेत, ओमान, कतार, सौदी अरब ते UAE पर्यंत ‘धुरंधर’ला रिलीजची परवानगी मिळाली नाही. यापूर्वीही अनेकदा पाकिस्तानशी संबंधित थीम असलेल्या चित्रपटांना खाडी देशांनी बंदी घातली आहे. पण इतर देशांमध्ये चित्रपट चांगली कमाई करताना दिसत आहे.
धुरंधर चित्रपटाविषयी
आदित्य धर दिग्दर्शित धुरंधर खऱ्या घटनांपासून प्रेरित आहे. यात १९९९ IC-814 हायजॅक, २००१ संसद हल्ला, २००८ मुंबई हल्ला, २०१२ बनावट चलन संकट, रॉचे ऑपरेशन ल्यारी आणि क्राइम सिंडिकेट्सवर कारवाई यांचा समावेश आहे. रणवीर सिंग भारतीय स्पाय हमजा अली मजारीच्या भूमिकेत आहे, अक्षय खन्ना पाकिस्तानी गँगस्टर रहमान डकैत, आर. माधवन आयबी डायरेक्टर अजय सान्याल, अर्जुन रामपाल आयएसआय मेजर इकबाल आणि संजय दत्त एसपी चौधरी असलमच्या भूमिकेत आहेत.
