Dhurandhar : धुरंधरवर पाकिस्तानातून प्रतिक्रिया, ल्यारीच्या गँगवॉरवरुन पाकिस्तानी इतके का खवळले?
Dhurandhar : सध्या तिकीट खिडकीवर धुरंधर हा चित्रपट गर्दी खेचत आहे. या चित्रपटावर आता पाकिस्तानातून प्रतिक्रिया येऊ लागल्या आहेत. हा मल्टी स्टारर चित्रपट भारतात हिट ठरत आहे. खूप दिवसांनी एक चांगली स्टोरी असलेला हिंदी सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे.

आदित्य धर दिग्दर्शित धुरंधर चित्रपटाला बॉक्स ऑफिसवर दमदार ओपनिंग मिळाली आहे. पहिल्या तीन दिवसातच या चित्रपटाने 100 कोटीच्या जवळ मजल मारली आहे. या मल्टी स्टारर चित्रपटाचं प्रेक्षकांकडून कौतुक होत आहे. या चित्रपटातील प्रत्येक कलाकाराने आपली भूमिका चोख बजावली आहे. महत्वाचं म्हणजे धुरंधर चित्रपटाला एक स्टोरी आहे. बऱ्याच काळापासून हिंदी सिनेमामध्ये दक्षिणेतल्या हिट चित्रपटांचे रिमेक सुरु होते. आदित्य धरच्या धुरंधर चित्रपटाने प्रेक्षकांना तिकीट खिडकीवर खेचून आणण्यासाठी एक चांगली कथा दिली आहे. भारत-पाकिस्तानमधील क्षेत्रीय राजकारण, हेरगिरी या चित्रपटाची पार्श्वभूमी आहे. पण यावेळी हेरगिरी दाखवातना दिग्दर्शकाने गँगवॉरचा तडका दिला आहे.
पाकिस्तानच्या कराची शहरात ल्यारी नावाच एक भाग आहे. तिथल्या गँगवॉरमधून भारताच्या राष्ट्रीय सुरक्षे संदर्भात गुप्त माहिती कशी गोळा केली जाते? ते दिग्दर्शकाने मोठ्या खुबीने दाखवलं आहे. पाकिस्तानी गँगवार, राजकारणात जी खरीखुरी माणसं होती, त्यांचे रोल अक्षय खन्ना, संजय दत्त आणि अर्जुन रामपाल यांनी पडद्यावर साकारले आहेत. हेरगिरीवर हा चित्रपट असला, तरी नेहमीपेक्षा त्याची मांडणी वेगळी आहे.
गँगवॉर, राजकारण असं सर्व त्यामध्ये
अक्षय खन्नाने गँगस्टर रेहमान डकैतची भूमिका वठवली आहे. संजय दत्तने एसपी चौधरी अस्लम रंगवला आहे. अक्षय खन्ना ल्यारीचा डॉन आहे. संजय दत्त ही गुंडगिरी मोडून काढण्यासाठी त्याच्या मागे लागतो. अर्जुन रामपाल मेजर इक्बालच्या रोलमध्ये आहे. पाकिस्तानी दहशतवादी इलियास काश्मिरीशी मिळती-जुळती त्याची व्यक्तीरेखा आहे. 2008 च्या मुंबई 26/11 हल्ल्याचा तो मास्टर माइंड होता. धुरंधरमध्ये खऱ्या आयुष्यातील पात्रच पडद्यावर दाखवलेली नाहीत. कराचीवर राज्य करणाऱ्या ल्यारीमधील गँगवॉर, राजकारण असं सर्व त्यामध्ये आहे.
पाकिस्तानी समीक्षकांनी काय म्हटलं?
आदित्य धर या भारतीय दिग्दर्शकाने मोठ्या खुबीने हे सर्व पडद्यावर मांडलं आहे. वास्तविक ही कथा पाकिस्तानची आहे, पण एका भारतीय दिग्दर्शकाने याची इतकी सुंदर गुंफण केली आहे. हे पाहून पाकिस्तानातील विचारवंतांचा जळफळाट झाला आहे. आपल्यासमोर हा विषय असून आपण हे करु शकलो नाही ही खंत त्यांना आता जाणवत आहे. पाकिस्तानच्या इतिहासातील एका महत्वाच्या चॅप्टरकडे आमच्या फिल्ममेकर्सनी दुर्लक्ष केलं आणि बॉलिवूडने शांतपणे दोन भागांमध्ये त्यावर चित्रपट बनवला ही खंत पाकिस्तानी समीक्षकांनी बोलून दाखवली.
