लाइव्ह कॉन्सर्टदरम्यान प्रसिद्ध गायिकेसोबत घडली नको ती गोष्ट, नेटकरी म्हणाले ‘लज्जास्पद’
प्रसिद्ध गायिका कनिका कपूरसोबत लाइव्ह कॉन्सर्टदरम्यान अत्यंत धक्कादायक गोष्ट घडली. या घटनेचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असून त्यावर नेटकऱ्यांकडून विविध प्रतिक्रिया येत आहेत. ही घटना लज्जास्पद असल्याचं अनेकांनी म्हटलं आहे.

‘बेबी डॉल’ आणि ‘चिट्टियाँ कलाइयाँ’ यांसारख्या सुपरहिट गाण्यांची गायिका कनिका कपूरसोबत एका लाइव्ह कॉन्सर्टदरम्यान अत्यंत धक्कादायक घटना घडली. कॉन्सर्टदरम्यान स्टेजवर चढून एका चाहत्याने तिच्यासोबत बळजबरी करण्याचा प्रयत्न केला. चाहत्याचं हे कृत्य कॅमेऱ्यात कैद झालं असून त्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. हा व्हिडीओ पाहून युजर्स तीव्र संताप व्यक्त करत आहेत. त्याचप्रमाणे कॉन्सर्टमधील सुरक्षाव्यवस्थेवरही प्रश्न उपस्थित केले जात आहेत. रविवारी आयोजित करण्यात आलेल्या मेघालयमधील मेगोंग फेस्टिव्हलमध्ये कनिका परफॉर्म करत होती.
सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या या व्हिडीओमध्ये स्पष्ट पहायला मिळतंय की, स्टेजवर जेव्हा कनिका गाणं गात असते, तेव्हा अचानक एक मुलगा सुरक्षारक्षकांना न जुमानता स्टेजवर चढतो. संबंधित चाहता आधी कनिकाच्या दोन्ही पायांना पकडून तिला उचलण्याचा प्रयत्न करतो, परंतु कनिका लगेचच त्याला झटकते आणि दूर ढकलते. यानंतरही तो चाहता थांबत नाही. तो पुढे येऊन कनिकाला मिठी मारण्याचा प्रयत्न करतो, तेव्हा सुरक्षारक्षक पुढे येऊन त्याला बाजूला करतात.
View this post on Instagram
चाहत्याचं हे कृत्य पाहून कनिका आधी थोडं घाबरते, परंतु ती स्टेजवर गाणं थांबवत नाही. ती तिचा परफॉर्मन्स सुरूच ठेवते. कनिकाने अत्यंत शांतपणे परिस्थिती हाताळली, असं म्हणत नेटकरी तिचं कौतुक करत आहेत. परंतु अनेकांनी संबंधित चाहत्यावर कारवाईची मागणी केली आहे. ही घटना अत्यंत लज्जास्पद असल्याची टीका नेटकऱ्यांनी केली आहे. ‘जर हजार लोकांमध्येही महिला सुरक्षित नसेल, तर विचार करा एकटी असताना तिला किती असुरक्षित वाटत असेल’, असा सवाल एकाने केला. तर ‘आपल्या मुलांना चांगली शिकवण द्या, हाच यावर उपाय आहे’, असं दुसऱ्याने म्हटलंय.
कनिकाने आजवर अनेक सुपरहिट गाणी गायली आहेत. तिच्या खासगी आयुष्याबद्दल बोलायचं झाल्यास, 1988 मध्ये तिने वयाच्या 18 व्या वर्षी राज चंद्रलोकशी लग्न केलं होतं. परंतु 2012 मध्ये त्यांनी घटस्फोट घेतला. कनिकाला तीन मुलं असून अयाना, समारा आणि युवराज अशी त्यांची नावं आहेत. घटस्फोटाच्या दहा वर्षांनंतर कनिकाने 2022 मध्ये बिझनेसमन गौतम हाथीरमानीशी दुसरं लग्न केलं.
