आम्ही वाढदिवसाच्या शुभेच्छाही देत नाही..; दीपिकाला अनफॉलो केल्याच्या चर्चांवर अखेर फराहने सोडलं मौन
दीपिका पादुकोण आणि फराह खान यांनी एकमेकींना इन्स्टाग्रामवर अनफॉलो केल्याच्या चर्चांना उधाण आलं होतं. त्यावर आता फराह खानने मौन सोडलं आहे. दीपिकाला तिने आठ तासांच्या शिफ्टवरून टोमणा मारला होता का, याचंही उत्तर तिने दिलं आहे.

अभिनेत्री दीपिका पादुकोण आणि कोरिओग्राफर-दिग्दर्शिका फराह खान यांच्यात वाद निर्माण झाल्याच्या जोरदार चर्चा आहेत. दीपिकाने 8 तासांच्या शिफ्टची मागणी केल्यानंतर फराहने तिच्या एका व्लॉगमध्ये त्यावरून मिश्किल टिप्पणी केली होती. त्यानंतर दोघींनी एकमेकींना इन्स्टाग्रामवर अनफॉलो केल्याचं म्हटलं गेलं. या चर्चांवर आता फराहने प्रतिक्रिया दिली आहे. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत फराह खानने दीपिकासोबतच्या वादाच्या चर्चांवर मौन सोडलं आहे. आम्ही इन्स्टाग्रामवर कधीच एकमेकींना फॉलो करत नव्हतो, असंही तिने स्पष्ट केलंय.
‘पिंकविला’ या वेबसाइटला दिलेल्या मुलाखतीत फराह खान म्हणाली, “खरं तर आम्ही एकमेकींना याआधीही इन्स्टाग्रामवर फॉलो करत नव्हतो. ‘हॅपी न्यू इअर’ या चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान आम्ही ठरवलं होतं की आम्ही इन्स्टाग्रामद्वारे नाही तर थेट मेसेज किंवा कॉलद्वारे एकमेकींशी संपर्क साधू. आम्ही इन्स्टाग्रामवर एकमेकींना वाढदिवसाच्या शुभेच्छा देणाऱ्या पोस्टही लिहित नाही, कारण दीपिकाला ते आवडत नाही.” यावेळी फराहने 8 तासांच्या शिफ्टबद्दल केलेल्या टिप्पणीवरही स्पष्टीकरण दिलं. तो दीपिकाला टोमणा नव्हताच, असं ती म्हणाली.
“आठ तासांच्या शिफ्टबद्दल मी जे काही बोलले, तो टोमणा नव्हताच. मी फक्त दिलीपसाठी तसं म्हटलं होतं. आता मीसुद्धा आठ तास काम करेन, अशी कबुली त्याने द्यावी, म्हणून मी त्याला डिवचत होती. कारण खरंतर तो फक्त दोन तासच काम करतो. कोणाला ही गोष्टसुद्धा माहीत नाही की, जेव्हा दुआचा जन्म झाला, तेव्हा सर्वांत आधी दीपिकाची भेट मीच घेतली होती. प्रत्येक गोष्ट इन्स्टाग्राम आणि पापाराझींसाठी केली जात नाही”, असं फराहने सांगितलं.
फराहचं हे स्पष्टीकरण एका पोस्टद्वारे इन्स्टाग्रामवर शेअर करण्यात आलं. त्यावर नंतर दीपिकानेही प्रतिक्रिया दिली. ‘आमेन’ असं म्हणत तिने हात जोडलेला इमोजी पोस्ट केला आहे. याआधी एका चित्रपटाच्या स्क्रिनिंगदरम्यान अभिनेता आयुष शर्माला फराहने दुर्लक्ष केल्याचीही टीका झाली होती. परंतु गर्दीत मी त्याला पाहिलंसुद्धा नव्हतं, असं तिने नंतर स्पष्ट केलं. “सध्या प्रत्येक गोष्ट एका फेक कॉन्ट्रोव्हर्सीमध्ये रुपांतरित करण्याचा नवीन ट्रेंडच आला आहे”, असं ती त्यावेळी म्हणाली होती.
