स्वामींच्या तारकमंत्राने घडणार मायेचा अलौकिक उद्धार
कलर्स मराठी वाहिनीवरील 'जय जय स्वामी समर्थ' या मालिकेत सध्या स्वामींच्या तारकमंत्राचा अलौकिक महिमा पहायला मिळतोय. तारकमंत्राने अनाथ गौरीच्या झालेल्या उद्धाराची अत्यंत भावनिक कथा प्रेक्षकांना आगामी भागात पहायला मिळणार आहे.

कलर्स मराठी वाहिनीवरील ‘जय जय स्वामी समर्थ’ या मालिकेत सध्या स्वामींच्या तारक मंत्राचा अलौकिक महिमा उलगडतो आहे. मुंबईच्या गोविंद मंत्री यांना स्वामींनी दिलेल्या पादुकांची दिव्य गोष्ट उलगडताना मंत्री यांच्या मुलाचा असाध्य डांग्या खोकला स्वामींनी बरा केला. ही गोष्ट स्वामींच्या अलौकिक धन्वंतरी रूपाने पूर्णत्वाला आली. त्याच क्षणाला तारकमंत्राच्या लीला महात्म्याला सुरुवात झाली. याचाच पुढचा टप्पा स्वामींच्या तारकमंत्राने घडणार आहे. मायेचा अलौकिक उद्धार येत्या आठवड्यात प्रेक्षकांना पाहता येईल.
तान्ही असताना खंडोबा मंदिरात पायरीपाशी सोडलेल्या अनाथ गौरीच्या तारकमंत्राने झालेल्या उद्धाराची ही अत्यंत भावनिक गोष्ट आहे. त्याला मायेचा पदर आहे. आता बारा वर्षाच्या असलेल्या या अनाथ गौरीशी प्रचंड गट्टी झालेले स्वामी तिला तारकमंत्र शिकवतात. यापुढे कुठलंही काम करत असताना मोठमोठ्याने तारकमंत्राचे उच्चारण करायचे ज्याच्या कानावर पडेल त्या प्रत्येकाचा उद्धार होईल असं सांगतात. तर दुसरीकडे नर्मदा नामक वेडगळ ठरवून घरातच बंदिवान असलेल्या स्त्रीची सुटकेसाठी झटापट सुरु आहे. ती स्वामींचा धावा करत ‘माझी हरवलेली गोष्ट मला मिळवून द्या, स्वामी’ अशी विनंती करत आहे. तिच्या घराच्या बाजूने गौरी पाणी भरण्यासाठी जात असताना तारकमंत्र म्हणत जाते. हा तारकमंत्र नर्मदाच्या कानावर पडतो आणि या कथानकाला अनपेक्षित कलाटणी मिळते.
View this post on Instagram
नर्मदा आणि गौरीची भेट होणार का? पुढे काय घडणार? नर्मदा आणि गौरीमध्ये नक्की काय नाते आहे? तारकमंत्र म्हणवून घेण्याचे स्वामींचे प्रयोजन काय या सर्व प्रश्नांची उत्तर प्रेक्षकांना या मालिकेच्या आगामी भागात मिळतील. ‘जय जय स्वामी समर्थ’ ही मालिका दररोज रात्री 8 वाजता कलर्स मराठी वाहिनीवर प्रसारित होते.
काही दिवसांपूर्वीच या मालिकेत स्वामींच्या दिव्य तारकमंत्राच्या दीक्षेची कथा पहायला मिळाली. मनुष्याच्या जगण्याला बळ देणाऱ्या आणि जगणे समृद्ध करणाऱ्या तारकमंत्राची स्वामींनी जगाला दिलेली दीक्षा भव्यदिव्य स्वरूपात प्रेक्षकांना अनुभवता आली. प्रत्येक घराघरात दररोज ऐकला, बोलला आणि लिहिला जाणाऱ्या या तारकमंत्राची महती जय जय स्वामी समर्थ या मालिकेत उलगडण्यात आली. या संपूर्ण महिन्याची स्वामी भक्त उत्सुकतेने वाट पाहात होते.
