‘लालबागचा राजा’च्या दर्शनासाठी पोहोचली जान्हवी कपूर, पण त्या गर्दीत..
अभिनेत्री जान्हवी कपूरचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चर्चेत आला आहे. 'लालबागचा राजा'च्या दर्शनासाठी ती अभिनेता सिद्धार्थ मल्होत्रासोबत पोहोचली होती. परंतु तिथली गर्दी पाहून ती काहीशी घाबरली होती. तिच्या चेहऱ्यावर भीतीचे भाव स्पष्ट दिसत होते.

अभिनेत्री जान्हवी कपूर आणि सिद्धार्थ मल्होत्रा यांचा ‘परम सुंदरी’ हा चित्रपट नुकताच थिएटरमध्ये प्रदर्शित झाला आहे. गेल्या काही दिवसांपासून विविध शहरांमध्ये सिद्धार्थ आणि जान्हवी त्यांच्या चित्रपटाचं जोरदार प्रमोशन करत आहेत. अशातच चित्रपटाच्या प्रदर्शनापूर्वी दोघांनी ‘लालबागचा राजा’चंही दर्शन घेतलं. त्यांचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. परंतु या व्हिडीओमध्ये जान्हवीच्या चेहऱ्यावरील हावभाव पाहून नेटकऱ्यांनी विविध प्रतिक्रिया दिल्या आहेत. ‘लालबागचा राजा’च्या दर्शनासाठी दरवर्षी भाविकांची मोठी गर्दी होते. त्या गर्दीतून वाट काढत पुढे जाताना जान्हवीच्या चेहऱ्यावरील संकोचलेपणा, असहजपणा स्पष्ट दिसत होता.
जान्हवी मराठी मुलगी बनून गणपतीच्या दर्शनाला आली होती. यावेळी तिने पैठणी साडी नेसली होती आणि त्यावर नथ, चंद्रकोर असा मराठमोळा लूक केला होता. तिच्यासोबत सिद्धार्थसुद्धा पारंपरिक पोशाखात तिथे उपस्थित होता. जान्हवीच्या मागे उभा राहून तो गर्दीत तिची काळजी घेताना दिसला. मंडपासमोरील गर्दी पाहून जान्हवीच्या चेहऱ्यावरील भावच बदलले होते. तिच्या चेहऱ्यावर भीती आणि काळजी स्पष्ट दिसत होती. यावरून नेटकऱ्यांनी प्रतिक्रिया देण्यास सुरुवात केली. अनेकांनी असं म्हटलंय की, जान्हवी पहिल्यांदाच अशा गर्दीचा सामना करतेय, परंतु असंख्य भारतीय महिलांसाठी हे रोजचं आहे.
View this post on Instagram
‘अशा गर्दीत जायचं तरी कशाला? जर ती इतकी अनकम्फर्टेबल आहे तर’, असा प्रश्न एकाने केला. तर ‘यांना सर्वसामान्यांच्या रांगेतून दर्शनासाठी पाठवा’, असं दुसऱ्याने लिहिलंय. भाविकांच्या गर्दीतून मंडळाच्या कार्यकर्त्यांनी जान्हवी आणि सिद्धार्थसाठी वाट मोकळी केली आणि त्यांना राजाच्या दर्शनासाठी स्टेजवर पाठवलं. ‘लालबागचा राजा’च्या पायावर डोकं टेकून जान्हवीने आशीर्वाद घेतला आणि त्यानंतर सिद्धार्थसोबत तिने फोटोसाठी पोझ दिले. परंतु यावेळीही तिच्या चेहऱ्यावरील भिती स्पष्ट दिसत होती.
तुषार जलोटा दिग्दर्शित जान्हवी आणि सिद्धार्थचा ‘परम सुंदरी’ हा चित्रपट येत्या 29 ऑगस्ट रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे. यामध्ये सिद्धार्थने उत्तर भारतीय तरुणाची आणि जान्हवीने दक्षिण भारतीय तरुणीची भूमिका साकारली आहे. परम आणि सुंदरी ही दोन विरुद्ध टोकाची जोडी एकमेकांच्या प्रेमात कशी पडते आणि त्यात कोणते अडथळे येतात, याची ही कथा आहे.
