‘कांतारा: चाप्टर 1’ फेम अभिनेत्याला घटस्फोटानंतर पूर्व पत्नीवर पुन्हा जडलं प्रेम; 47 व्या वर्षी करणार दुसरं लग्न
'कांतारा : चाप्टर 1' मधील अभिनेत्याला घटस्फोटानंतर त्याच्या पूर्व पत्नीवरच पुन्हा प्रेम जडलं आहे. वयाच्या 47 व्या वर्षी तो दुसऱ्यांदा लग्न करण्याचा विचार करतोय. विभक्त झाल्यानंतर तो त्याच्या पूर्व पत्नीला पुन्हा डेट करतोय.

घटस्फोट झाल्यानंतर बहुतांश प्रकरणांमध्ये मैत्रीचंही नातं टिकून राहत नाही. तर असेही अनेक जोडपी आहेत, जे विभक्त झाल्यानंतरही एकमेकांसोबतची मैत्री कायम ठेवतात. परंतु घटस्फोटानंतर पुन्हा त्याच जोडीदाराच्या प्रेमात पडणारी जोडी तुम्ही पाहिलीये का? ‘कांतारा: चाप्टर 1’मध्ये भूमिका साकारलेला अभिनेता गुलशन देवैया सध्या त्याच्या खासगी आयुष्यामुळे याच कारणासाठी चर्चेत आला आहे. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत तो याविषयी मोकळेपणे व्यक्त झाला. इतकंच नव्हे तर वयाच्या 47 व्या वर्षी दुसरं लग्न त्याच जोडीदारासोबत करण्याचा विचार असल्याचं त्याने म्हटलंय.
आश्चर्याची बाब म्हणजे घटस्फोटानंतर गुलशन आणि त्याच्या पूर्व पत्नीदरम्यान जवळीक अधिक वाढली आहे. इतकंच नव्हे तर दोघं विभक्त झाल्यानंतर एकमेकांना डेट करू लागले आहेत. गुलशनने 2012 मध्ये कल्लिरोई या परदेशी महिलेशी लग्न केलं होतं. लग्नाच्या 8 वर्षांनंतर 2020 मध्ये त्यांनी घटस्फोट घेतला. परंतु कदाचित दोघांच्या नशिबाला त्यांचं विभक्त होणं नामंजूर होतं. याविषयी ‘स्क्रीन’ला दिलेल्या मुलाखतीत गुलशन म्हणाला, “मी माझ्या पूर्व पत्नीलाच पुन्हा डेट करू लागलो आहे. हे सर्व यामुळे शक्य झालं कारण मी स्वत:ला समजून घेण्यास सुरुवात केली, आयुष्यात पुढे गेलो आणि समजूतदारपणे गोष्टी समजून घेतल्या. परंतु हे सर्व कपल थेरपी घेतल्यानंतरच झालं.”
View this post on Instagram
या मुलाखतीत त्याने दुसऱ्या लग्नाविषयी सांगितलं, “अर्थातच मी दुसऱ्या लग्नाचा नक्की विचार करेन. मला वैवाहिक जीवन जगायला आवडतं, परंतु त्यात मी यशस्वी ठरलो नाही ही दुर्दैवाची बाब आहे. तरीही मला लग्नव्यवस्थेवर पूर्ण विश्वास आहे. मला लग्नाची संकल्पना खूप आवडते. लग्न माझ्यासाठी बनलेलंच नाही, असं बोलणाऱ्या लोकांपैकी मी नाही.”
घटस्फोटाच्या तीन वर्षांनंतर गुलशन त्याच्या पूर्वी पत्नीला पुन्हा डेट करू लागला. 2023 मध्ये गुलशनने पूर्व पत्नीसोबत रिलेशनशिपमध्ये असल्याचं जाहीर केलं होतं. इतकंच नव्हे तर या नात्याकडे एका वेगळ्या दृष्टीकोनातून पाहत असल्याचं त्याने स्पष्ट केलं होतं. “आम्ही दोघं एकमेकांवर खूप प्रेम करतो आणि अजूनही आमच्यात दृढ नातं आहे. हे नातं कायम अबाधित असेल. परिस्थितीमुळे आम्ही सुरुवातीला ते टिकवू शकलो नव्हतो. परंतु आता आमची परिस्थिती एकसारखी नाही. आम्हीसुद्धा एकसारखे नाही आहोत. आम्ही दोघं वैयक्तिकरित्या प्रगती करतोय. त्यासाठी कदाचित विभक्त होणं महत्त्वाचं होतं”, असं त्याने सांगितलं होतं.
