माझ्या मुलाची हत्या..; करिश्मा कपूरच्या पूर्व पतीच्या मृत्यूप्रकरणी सासूचे खळबळजनक आरोप
अभिनेत्री करिश्मा कपूरचा पूर्व पती संजय कपूरचा मृत्यू नैसर्गिक किंवा अपघाती नव्हता तर तो एका वाईट कटाचा परिणाम होता, असा संशय त्याची आई राणी कपूर यांनी व्यक्त केला आहे. याबाबत त्यांनी ब्रिटिश सरकारकडे चौकशीची मागणी केली आहे.

अभिनेत्री करिश्मा कपूरचा पूर्व पती आणि बिझनेसमन संजय कपूरच्या निधनानंतर सुरू झालेल्या ‘सोना कॉमस्टार’ कंपनीच्या वादाला नाट्यमय वळण मिळालं आहे. आता संजयची आई राणी कपूर यांनी त्यांच्या मुलाच्या मृत्यूची चौकशी करण्याची विनंती ब्रिटिश सरकारकडे केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, संजयची आई आणि सोना कॉमस्टारच्या माजी अध्यक्षा राणी कपूर यांनी याप्रकरणी ब्रिटिश अधिकाऱ्यांशी औपचारिकरित्या संपर्क साधला आहे. लंडनमध्ये त्यांच्या मुलाच्या अकस्मात मृत्यूच्या गूढ परिस्थितीची व्यापक चौकशी व्हावी, अशी मागणी त्यांनी केली आहे. इतकंच नव्हे तर ब्रिटिश अधिकाऱ्यांकडे गुन्हेगारी तक्रार दाखल करण्यात आल्याची माहिती समोर येत आहे.
मुलाच्या मृत्यूवर प्रश्नचिन्ह
राणी कपूर यांनी दाखल केलेल्या तक्रारीत रहस्यमय परिस्थितीचा हवाला देत संजय कपूरच्या अकस्मात मृत्यूच्या स्वरुपावर प्रश्न उपस्थित करण्यात आलं आहे. या प्रकरणी ब्रिटिश कायदा अंमलबजावणी संस्थांनी त्वरित हस्तक्षेप करावा अशी मागणी करण्यात आली आहे. कपूर कुटुंबातील जवळच्या व्यक्तीने सांगितलं की, “संजयच्या मृत्यूच्या अवतीभवती घडलेल्या घडामोडी अत्यंत चिंताजनक आहेत. त्यामुळे ब्रिटिश अधिकाऱ्यांना या प्रकरणात त्वरित आणि सविस्तर कारवाई करण्यास सांगितलं आहे.” संजय अमेरिकन नागरिक होता, त्यामुळे अमेरिकन अधिकारी आधीच या संपूर्ण परिस्थितीवर आधीपासूनच लक्ष ठेवून असल्याचंही कळतंय.
कंपनीच्या भविष्याबाबत चिंता व्यक्त
मुलाच्या मृत्यूनंतर राणी कपूर यांनी एका मुलाखतीत या संपूर्ण प्रकरणावर मौन सोडलंय. या मुलाखतीत त्यांनी त्यांच्या दिवंगत पतीसोबत स्थापन केलेल्या सोना कॉमस्टार या कंपनीच्या भविष्याबद्दलची चिंता व्यक्त केली. “माझ्या मुलाचं काय झालं, हे मला अजूनही माहीत नाही. माझं आता वय झालं आहे. परंतु या जगातून जाण्यापूर्वी मला मानसिक शांती हवी आहे”, अशा शब्दांत त्यांनी भावना व्यक्त केल्या आहेत. तर दुसरीकडे सोना कॉमस्टारने दावा केला की, 2019 पासून राणी कपूर यांचा कंपनीशी प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे कोणताही संबंध नाही.
आईने व्यक्त केली मुलाच्या हत्येची भीती
करिश्माचा पूर्व पती आणि बिझनेसमन संजय कपूरचं 12 जून 2025 रोजी इंग्लंडमध्ये पोलो खेळताना निधन झालं. सुरुवातीला हृदयविकाराच्या झटक्याने त्याचा मृत्यू झाल्याचं म्हटलं गेलं होतं. परंतु नंतर एक धक्कादायक दावा समोर आला की संजयने पोलो खेळताना चुकून मधमाशी गिळली. त्यामुळेच त्याची प्रकृती अचानक बिघडली. मधमाशीने घशात चावा घेतल्याने त्याला श्वास घेण्यात अडचण निर्माण झाली आणि हृदयविकाराचा झटका आला. निधनानंतरही संजय कपूरचं नाव आणि त्याचं कुटुंब सतत चर्चेत आहे. याचं मुख्य कारण म्हणजे त्याची 30 हजार कोटी रुपयांची संपत्ती. संपत्तीच्या वाटणीचा वाद सुरू असतानाच संजयच्या आईने मुलाच्या हत्येची भीती व्यक्त केली आहे. संजयचा मृत्यू नैसर्गिक किंवा अपघाती नव्हता तर तो एका वाईट कटाचा परिणाम होता, असं राणी कपूर मानतात.
