“विकृतीकरण करणं योग्य नाही..”; ‘छावा’च्या वादाबद्दल देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले..
लक्ष्मण उतेकर दिग्दर्शित 'छावा' या चित्रपटातील लेझीम नृत्याच्या प्रसंगावर वाद निर्माण झाला आहे. या वादावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे. येत्या 14 फेब्रुवारी रोजी हा चित्रपट थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे.

छत्रपती संभाजी महाराजांच्या शौर्याचा इतिहास मांडणारा बहुप्रतिक्षित ‘छावा’ या हिंदी चित्रपटाच्या ट्रेलरवरून वाद निर्माण झाला आहे. या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाल्यानंतर विविध स्तरांतून छत्रपती संभाजी महाराज आणि महाराणाी येसूबाई यांच्या लेझीम नृत्या करतानाच्या प्रसंगावर आक्षेप घेण्यात आला होता. या प्रसंगावर संभाजीराजे छत्रपती यांनीही आक्षेप घेतला होता. तसंच उदयनराजे भोसले यांनीही दिग्दर्शक लक्ष्मण उतेकर यांना फोन करून इतिहासतज्ज्ञांना विचारात घेऊन संबंधित प्रसंगामध्ये आवश्यक बदल केल्यास वाद संपेल, असं सांगितलं होतं. आता याप्रकरणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
‘छावा’ या चित्रपटाच्या वादाच्या पार्श्वभूमीवर सरकारची काय भूमिका आहे, असा प्रश्न फडणवीसांना विचारण्यात आला होता. त्यावर ते म्हणाले, “सरकारची यात काही भूमिका नाही. पण छत्रपती संभाजी महाराजांचा इतिहास योग्य दाखवला जावा, असं आम्हाला वाटतं. विकृतीकरण करणं योग्य नाही. छत्रपती संभाजी महाराजांबद्दल सर्वांच्याच मनात सन्मान आहे, प्रेम आहे. त्याला कुठेही ठेच पोहोचला कामा नये. क्रिएटीव्हीटी असली पाहिजे, पण त्याचसोबत सेन्सिटीव्हीटी सुद्धा असायला हवी.”
दरम्यान या वादाच्या पार्श्वभूमीवर दिग्दर्शक लक्ष्मण उतेकर यांनी सोमवारी मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची भेट घेऊन त्यांच्यासोबत चर्चा केली. या चर्चेनंतर आणि राजकीय मंडळींसह अनेकांनी या प्रसंगाला घेतलेला आक्षेप विचारात घेऊन चित्रपटातील वादग्रस्त लेझीम नृत्याचा प्रसंद काढला जाणार असल्याचं उतेकर यांनी स्पष्ट केलं. तसंच हा चित्रपट प्रदर्शनाआधी इतिहासतज्ज्ञांनाही दाखवण्यात येणार असल्याचं त्यांनी सांगितलं.




“हा चित्रपट शिवाजी सावंत यांच्या ‘छावा’ या कादंबरीवर आधारित आहे. या कादंबरीचे अधिकृतरित्या हक्क घेऊन चित्रपटाची निर्मिती केली. या कादंबरीत लिहिलंय की संभाजीराजे होळीचा उत्सव साजरा करायचे आणि होळीच्या आगीतून नारळ बाहेर काढायचे. तसंच लेझीम हा आपला पारंपरिक नृत्यप्रकार असल्यामुळे छत्रपती संभाजी महाराज यांनी उत्सव साजरा करताना लेझीम नृत्य केलं असल्याचा विचार आपसूकच मनात आला. छत्रपती संभाजी महाराज आणि महाराणी येसूबाई यांच्या लेझीम नृत्याचा प्रसंग दाखवून कोणाच्याही भावना दुखावण्याचा हेतू नव्हता. लेझीम नृत्यांचा प्रसंग महाराजांपेक्षा मोठा नाही, त्यामुळे आम्ही निश्चितच हा प्रसंग चित्रपटातून वगळणार आहोत”, असं लक्ष्मण उतेकर यांनी सांगितलं.