‘महावतार नरसिम्हा’ची डरकाळी; बॉक्स ऑफिसवर रचला इतिहास, इतकी क्रेझ का?
'महावतार नरसिम्हा' या चित्रपटाने कमालच केली आहे. बॉक्स ऑफिसवर तगडी कमाई करणारा हा पहिला भारतीय ॲनिमेटेड चित्रपट ठरतोय. लहानांपासून मोठ्यांपर्यंत.. प्रत्येक वयोगटातील प्रेक्षकांना हा चित्रपट खूप आवडतोय.
अश्विन कुमार दिग्दर्शित ‘महावतार नरसिम्हा’ या ॲनिमेटेड चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर अक्षरश: डरकाळी फोडली आहे. भारतीय ॲनिमेशन विश्वात या चित्रपटाने एक नवा विक्रम रचला आहे. अपेक्षेपेक्षाही खूप चांगली कामगिरी करणाऱ्या या चित्रपटाने भारतात अवघ्या 10 दिवसांत 91.25 कोटी रुपयांची कमाई केली आहे. प्रल्हादाची भक्ती आणि आपल्या भक्तासाठी नरसिंहाच्या अवतारात धावून येणारे भगवान विष्णू यांची ही पौराणिक कथा प्रेक्षकांच्या मनाला खूप भावली. म्हणूनच सध्या थिएटरमध्ये आणि सोशल मीडियावरही या एका चित्रपटाची जोरदार चर्चा आहे. ॲनिमेटेड चित्रपट म्हटलं की, याआधी भारतीयांकडून हॉलिवूड चित्रपटांनाच अधिक पसंती मिळायची. परंतु आता ‘महावतार नरसिम्हा’ने संपूर्ण खेळ पालटला आहे.
‘होम्बाले फिल्म्स’ या प्रसिद्ध कन्नड प्रॉडक्शन हाऊसने या चित्रपटाची निर्मिती केली आहे. हिंदीतल्या ‘सैयारा’ या चित्रपटाची त्सुनामी झेलत ‘महावतार नरसिम्हा’ बॉक्स ऑफिसवर ब्लॉकबस्टर बनतोय. कमाईच्या बाबतीत या चित्रपटाने ‘द काश्मीर फाइल्स’लाही मागे टाकलं आहे. ‘महावतार नरसिम्हा’च्या यशाबद्दल बोलायचं झाल्यास, पहिल्या दिवशी फक्त 1.75 कोटी रुपयांचा गल्ला जमवण्यात आला होता. परंतु सकारात्मक माऊथ पब्लिसिटीच्या जोरावर वीकेंडच्या कमाईत अधिक भर पडली आणि हा आकडा थेट 16 कोटींवर पोहोचला. नंतर आठवड्याच्या मधल्या वारीही प्रेक्षकांकडून दमदार प्रतिसाद मिळत गेला आणि दररोज कमाईची सरासरी 7 कोटी रुपये टिकवून ठेवली.
View this post on Instagram
‘महावतार नरसिम्हा’ने कमाईचा 100 कोटींचा टप्पा पार केला आहे. यामुळे हा भारतातील सर्वाधिक कमाई करणारा ॲनिमेटेड चित्रपट ठरला आहे. विशेष म्हणजे, या चित्रपटाने ‘स्पायडर मॅन : इन्टू द स्पायडर वर्स’ आणि ‘कुंग फू पांडा’ यांच्याही भारतातील कमाईला मागे टाकलं आहे.
2D आणि 3D अशा दोन्ही फॉरमॅटमध्ये प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाला तेलुगू, तमिळ, कन्नड, मल्याळम आणि हिंदी अशा पाच भाषांमध्ये डब करण्यात आलं आहे. तेलुगू भाषेतील थ्रीडी व्हर्जनला सर्वाधिक प्रतिसाद मिळत आहे. त्यापाठोपाठ हिंदीतील थ्रीडी व्हर्जन आहे. विविध भाषांमुळे ‘महावतार नरसिम्हा’ला प्रादेशिक सीमा ओलांडण्यास आणि विविध वयोगटातील, भाषेतील प्रेक्षकांना आकर्षित करण्यास मदत झाली आहे.
क्लीम प्रॉडक्शन्स आणि होम्बाले फिल्म्स निर्मित या चित्रपटाचे इतरही काही भाग प्रदर्शित होणार आहेत. भगवान विष्णूच्या विविध अवतारांवर हे चित्रपट आधारित असतील. ‘महावतार नरसिम्हा’नंतर ‘महावतार परशुराम’ आणि ‘महावतार कल्की’ हे चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत.
